पत्रकारांचे आता एसएमएस आणि घंटानाद आंदोलन

  0
  613

  13 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस जाणार

    पत्रकारांचे आता एसएमएस आणि घंटानाद आंदोलन

  मुंबई दिनांक 1जुले ( प्रतिनिधी) उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये पत्रकारांच्या झालेल्या निघृण हत्त्या आणि महाराष्ट्रातील पत्रकारांवर दररोज होत असलेले जीवघेणे हल्ले याचा निषेध करण्यासाठी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा या मागणीसाठी राज्यातील पत्रकार येत्या 13 जुलै रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करून पत्रकारांच्या प्रश्‍नांकडं दुर्लक्ष कऱणार्‍या राज्य सरकारबद्दलचा आपला तीव्र संताप व्यक्त करतील. त्याचबरोबर 13 जुलै रोजी  राज्यभरातून हजारो पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांना  एसएमएस करून “पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे” या मागणीचा आग्रह धरतील.30 जून रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती  समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

  महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.गेल्या सात महिन्यात 43 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.2014मधील अशा हल्ल्यांची संख्या 82 होती तर त्या अगोदर 2013 मध्ये 63 पत्रकारांवर समाजकंटकांनी हल्ले केले होते.गेल्या दहा वर्षातील अशा हल्ल्यांची संख्या 800च्यावर असून विविध दैनिकांच्या आणि वाहिन्यांच्या कार्यालयावरील हल्ल्याची संख्या 49 आहे.महाराष्ट्रात 1985 मध्ये पांचगणी येथील तरूण भारतचे पत्रकार अरविंद कराडकर यांची स्थानिक माफियांनी हत्त्या केली होती.त्यानंतर राज्यात 19 पत्रकारांच्या विविध ठिकाणी हत्त्या झालेल्या आहेत.या काळात  पत्रकारांवर हल्ले करणार्‍या एकाही आरोपीला शिक्षा झालेली नसल्याने निर्भय आणि निर्भिडपणे पत्रकारिता कऱणे महाराष्ट्रात उत्तरोत्तर कठीण होत आहेेे.या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने गेली पाच वर्षे आंदोलन करण्यात येत असले तरी पत्रकारांवरील बहुसंख्य हल्लयामध्ये स्थानिक राजकीय पुढार्‍यांचाच हात असल्याने राजकारण्यांनी सातत्यानं या प्रश्‍नाकडं दुर्लक्ष केलेलं आहे.मागच्या सरकारने कायदा करण्यास टाळाटाळ केली आता भाजप -सेना युती सरकारही मागच्याच सरकारचे अनुकरण करीत “या प्रश्‍नावर मतभेद असल्याची” टेप वाजवत निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहे.सरकार पत्रकारांच्या या महत्वाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत असल्यानं राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढत असल्याचे समिती निरिक्षण असल्याचे  पत्रकात नमुद कऱण्यात आले आहे.

  13 जुलै रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीत राज्यभर पत्रकार घंटानाद करून पत्रकारांवर हल्ले होत असताना सरकारने घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेबद्दल आपला रोष व्यक्त करतील.राज्याच्या प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे घंटानाद आंदोलन होईल,त्यानंतर  पत्रकार जिल्हाधिकार्‍यांना निवेदनं देऊन पत्रकार संरक्षण कायदा व्हावा अशी मागणी करतील. मुंबईत आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेऊन विषयाचे गांभीर्य त्यांच्या  लक्षात आणून देत  पत्रकार संरक्षण कायदा करण्याची मागणी केली जाईल.त्याच बरोबर राज्यातील प्रत्येक पत्रकार 13 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना एसएमएस करून आपल्या प्रश्‍नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयन्त करतील.एस.एम.एस आणि घंटनाद आंदोलनात  समितीमध्ये असलेल्या 16 संघटनांसह  अन्य पत्रकार संघटनांनीही सहभागी व्हावे आणि आपली भक्कम  एकजूट सरकारला दाखवून द्यावी असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने एस.एम,देशमुख यांनी केले आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here