दिलीप कांबळेंवर निषेध एसएमएसचा भडिमार
पत्रकारांनी सात हजारांवर एसएमएस पाठविले

मुंबईः महाराष्ट्रातील सात हजारांवर पत्रकारांनी आज सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना निषेधाचा एसएमएस करून आपला संताप तर व्यक्त केलाच पण त्याचबरोबर तुमच्या दमदाटीला राज्यातील पत्रकार घाबरणार नाही असा इशाराही दिला आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने कांबळे यांचा निषेध करणारा एसएमएस पाठविण्याचे आवाहन केले होते.त्याला राज्यभर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.रात्री बारा वाजल्यापासूनच एसएमएस पाठवायाला पत्रकारांनी सुरूवात केली होती.समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी कांबळे यांचा निषेध करणारा एसएमएस पाठविला.या अनोख्या निषेध आंदोलनामुळं नक्कीच कांबळेंचा फोन हँग झाला असणार यात शंकाच नाही.अशा पध्दतीच्या निषेधालाही कांबळे यांना पहिल्यांदाच तोंड द्यावे लागले असेल
शिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलताना दिलीप कांबळे यांनी पत्रकारांना जोडयानं मारलं पाहिजे,मी पत्रकारांना घाबरत नाही,पत्रकार पाकिंटं घेऊन बातम्या देतात असे तारे तोडले होते.त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील माध्यम जगतात संतापाची लाट उसळली.परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने याचा निषेध करून निषेध एसएमएस पाठविण्याचे आवाहन केले होते.
राज्यातील अनेक शहरात पत्रकारांनी आज रविवार असूनही तहसिलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदनं देऊन समाजात चिथावणीखोर वक्तव्य करणार्‍या दिलीप कांबळेंचा बंदोबस्त करा अशी मागणी केली आहे.मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रारी करण्यात आल्या आहेत.पाटोदा,लोणावळा आणि अन्य काही शहरात निषेध सभा घेऊन पत्रकारांनी आपला संताप व्यक्त केला.
पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार दिलीप कांबळे यांच्यावर कारवाई होऊ शकते काय याचीही चाचपणी केली जात आहे.दिलीप कांबळे यांचं वक्तव्य चिथावणी देणारे आणि एका घटकाच्या विरोधात लोकांना भडकविणारे आणि म्हणूनच समाजात तेढ निर्माण करणारे असल्याने त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली जावू शकते.त्यादृष्टीनंही विचार काही तालुक्यात केला जात आहे.एकाच वेळी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या जावू शकतात.काही तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ विचार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here