नितेश राणे आणि बिच्चारे बाळशास्त्री

0
1032

नितेश राणे आणि बिच्चारे बाळशास्त्री

साहित्यिक, कलावंत, विचारवंत, पत्रकार आदिंची स्मारकं उभारायची म्हटलं किंवा एखाद्या प़कल्पाला त्यांचं नाव द्यायचं म्हटलं की, राजकारणी सतरा फाटे फोडतात… पुढारयांची ही जुनी खोड.. त्याचे अनुभव अनेकदा आलेत.. मुंबई – गोवा महामार्गाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तोच अनुभव येतोय.. नव्यानं बांधण्यात येत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला “दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर” यांचं नाव द्यावं अशी मागणी कोकणातील पत्रकारांनी 2012 मध्ये पेण येथे झालेल्या विजय मेळाव्यात केली होती.. सुनील तटकरे तेव्हा उपस्थित होते.. पत्रकारांनी या मागणीचा नंतर सरकार दरबारी पाठपुरावा देखील केला.. डिसेंबर 19 मध्ये सावंतवाडीत झालेल्या पत्रकारांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मुंबई गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशा मागणीचा ठरावही संमत केला गेला.. कोकणातील माध्यमांनी त्याला व्यापक प्रसिध्दी दिली..त्या बातम्या पाहून काही नेत्यांना जाग आली आणि वेगवेगळी नावं समोर आणली जावू लागली.. खा. संभाजीराजे यांनी पत्रक प़सिध्दीस देऊन महामार्गाला “सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे” यांचं नाव देण्याची मागणी केली.. दर्यावर्दी असलेल्या कानहोजींच्या कर्तृत्वाबददल दुमत असण्याचं कारण नाही.. कोकण किनारपट्टीवर स्वतःच्या नावाची जरब निर्माण करून परकीय शत्रूंना कान्हाेजी राजे यांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे कोकणात त्याचं उचित स्मारक होणं आवश्यक ही आहे..मात्र पत्रकारांनी एक नाव समोर आणल्यानंतर त्याला छेद देत पर्यायी नावाचा आग्रह योग्य ठरत नाही.. त्यामुळं आम्ही सूचना अशी केली की, रेवस-रेडी या सागरी महामार्गाला कान्हाेजी राजेंचं नाव द्यावं.. असं केल्यानं दोन्ही महापुरूषांचा उचित सन्मान होईल. कान्हाेजी राजेंचा संबंध सागराशी होता..त्यामुळं सागरी महामार्गाला त्यांचं नाव देणं अधिक योग्य आणि उचित होईल.. त्या संदर्भात आम्ही खासदार संभाजी राजेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवणार होतो.. मात्र लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही..पण नंतर आम्ही त्यांना भेटणारच आहोत..
कान्हाेजी राजेंच्या नावाचा विषय संपलेला नसतानाच आता नितेश राणे यांनी नवा फाटा फोडला आहे.. महामार्गाला ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे…. नानासाहेब धर्माधिकारी हे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील.. त्यांचा मोठा अनुयायी वर्ग कोकणात आहे.. सिंधुदुर्गातही आहे.. या एकगठ्ठा मतांवर सरवपोक्षीयांचा डोळा असतो.. निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येक उमेदवार फोटोग्राफरसह रेवदंडा येथे येऊन तेव्हा नानांचे आणि आता आप्पासाहेबांचे आशीर्वाद घेत असतात.. त्याचे फोटो देखील आशीर्वाद आम्हालाच आहेत हे भासविणयासाठी जाणीवपूर्वक व्हायरल केले जातात.. नितेश राणे यांच्या मागणी मागे अनुयांच्या अनुनयाचं सूत्र असावं.. अन्यथा सिंधुदुर्गचे भूमीपूत्र असलेल्या बाळशास्त्रीचं नाव समोर येताच नानासाहेबांचे नाव नितेश राणे यांनी पुढं केलं नसतं .. बाळशास्त्रींच्या नावाचा आग्रह धरून चार मतंही णिळणार नाहीत हे राणे ओळखून आहेत.. म्हणून पर्याय…
नानासाहेबांचे आध्यात्मिक क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्य नक्कीच मोठे आहे.. वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान यासारखे मोठी कामं धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोकणात उभी राहिली आहेत.. त्यांच्या या कार्याबद्दल नक्कीच आम्हालाही आदर आहे.. तरीही एक नाव समोर आलेलं असताना दुसरं नाव पुढं आणून वाद उभे करणे हा राजकारण्यांचा खेळ असला तरी असे करून आपण दोन्ही महापुरूषांचा अवमान करीत आहोत हे विसरता येत नाही.. नानासाहेबांना महाराष्ट्र भूषण दिला गेला, डॉक्टरेट दिली गेली, रायगडात आणि पुणे मुंबईही अनेक प्रकल्पांना त्यांची नावं दिली गेली.. त्याला कोणी विरोध केला नाही.. तसे करण्याचे काही कारण नाही.. नितेश राणे यांनी नानासाहेबांचे भव्य स्मारक कोकणात ऊभारावे.. आमचं काही म्हणणं नाही.. मात्र राज्यात प़थमच एका पत्रकाराचं नाव महामार्गाला दिलं जाणार असेल तर अपशकून करू नये.. धर्माधिकारी कुटुंबाला ही आमची विनंती आहे की, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव देण्याचा आग्रह धरावा आणि संभाव्य वाद टाळावा.. राजकारणी राजकारण करीतच राहणार आहेत.. त्यांच्या कूटनीतीला बळी पडायचं की नाही ते आपल्याला ठरवावं लागेल..

बाळशास्त्रींच्या नावाचा आमचा आग्रह का?

मुंबई गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव देण्याबाबत आम्ही एवढे आग्रही असण्याचं कारण आहे.. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की, मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी कोकणातील पत्रकार सलग सहा वर्षे लढा देत होते.. शांततेच्या मार्गानं आंदोलनं करीत होते.. हे सुरू असताना नितेश राणे यांच्यासह कोकणातील एकजात सर्व राजकीय नेते मौन धारण करून होते.. त्यांना भिती होती की, रूंदीकरणात अनेकांच्या जमिनी जातील त्यातून मोठा असंतोष कोकणात निर्माण होईल..त्याचा थेट आपल्या मतांवर परिणाम होईल.. त्यामुळे कोणीच काही बोलत नव्हतं.. पण रस्त्यावर जाणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन जनतेनं समजूतदारपणा दाखविला.. फार विरोध झाला नाही.. उलट जनतेनं यंत्रणेला सहकार्यच केलं.. जनता विरोध करीत नाही म्हटलं की, महामार्गाचं श्रेय लाटण्यासाठी सर्वपक्षीय पुढारयात अहमहमिका सुरू झाली.. राणे, भास्कर जाधव, शेकापपासून एकजात सारेच नेते आणि राजकारणी आमच्यामुळंच महामार्ग होतोय हे ढोल बडवत सांगू लागले.. रस्त्यासाठी कोण लढले हे तीनही जिल्हयातील जनलेला माहिती असल्यानं पत्रकारांना आपली टिमकी वाजविण्याची गरज नव्हती.. शिवाय त्यांना मतांचं राजकारण ही करायचं नव्हतं.. कोकणचा रखडलेला विकास व्हावा आणि रस्त्यावरील अपघात थाबावेत एवढीच पत्रकारांची माफक अपेक्षा होती.. ती 2012 मध्ये पूर्ण झाली.. सहा वर्षाच्या लढयाल यश आले.. रस्त्याचं काम सुरू झालं.. केवळ पत्रकारांनी अभूतपूर्व लढा दिल्यानं रस्ता होत असल्यानं या महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी कोकणातील आणि राज्यातील पत्रकारांची मागणी आहे.. ती अनठाई आणि अवास्तव नाही.. तेव्हा सर्वपक्षीय राजकारण्यांना विनंती आहे की, वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या महापुरूषांची नावं समोर करून खिळ न घालता बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाला एकमुखी संमती द्यावी आणि आम्ही साहित्यिक, कलावंत, विचारवंत आणि पत्रकारांचा देखील योग्य तो सन्मान ठेवतो असा संदेश एकदा महाराष्ट्रात जाऊ द्यावा . बाळशास्त्रींच्या नावामुळे काही नेत्यांच्या मतांचं गणित भलेही जुळणार नाही पण एका उपेक्षित भूमीपूत्राला न्याय दिल्याचं समाधान राजकारण्यांना नक्की मिळेल..
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here