रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर ;नम्रता वागळे आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्काराच्या मानकरी
२४ फेब्रु. ला महाडमध्ये प्रेस क्लब सन्मान  सोहोळा 
     रोहा दि. 05 प्रतिनिधि ः- रायगड प्रेस क्लबचे राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीचा आचार्य अत्रे युवा पत्रकार पुरस्कार एबीपी  माझाच्या वरिष्ठ अँकर पत्रकार नम्रता वागळे यांना जाहीर करण्यात आला आहे. रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिनी महाड येथे आयोजित प्रेस क्लब सन्मान सोहोळयात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.  नुकतेच रोहा येथे झालेल्या रायगड प्रेस क्लब कार्यकारिणीच्या महत्वपूर्ण बैठकीत विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये स्व. निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दै. रायगडचा आवाज आणि दै. कोकण की आवाजचे संपादक महंमद शफी पुरकर यांना, पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार दै. शिवतेजचे संपादक विजयसिंह जाधवराव यांना, स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भिड पत्रकार पुरस्कार ग्लोबल टाईम्स, रोहाचे नरेश कुशवाह यांना, युवा पत्रकार पुरस्कार  खोपोली येथील दै. सकाळचे पत्रकार अनिल पाटील, माथेरान येथील संवाद मराठीचे पत्रकार दिनेश सुतार यांना, सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार अलिबाग येथील मानसी चेऊलकर यांना, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार पनवेल येथिल सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी आणि उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार माणगांव येथील दै. पुढारीचे पद्माकर उभारे यांना जाहीर करण्यात आले आहेत. श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये तळायेथील दै. रायगड टाईम्सचे पत्रकार कृष्णा भोसले आणि पनवेल येथील दै. सामनाचे पत्रकार संजय कदम यांना जाहीर झाले आहेत.रायगड प्रेस क्लबचे संस्थापक श्री. एस. एम. देशमुख आणि जिल्हाध्यक्ष विजय मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शक अभय आपटे, मिलिंद अष्टीवकर, संतोष पेरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरचिटणीस अनिल भोळे, उपाध्यक्ष मनोज खांबे, सहचिटणीस शशिकांत मोरे, दरवेश पालकर आदिंच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी आणि तालुकाध्यक्षांनी  पुरस्कार्थींची नावे निश्चित केली.रायगड प्रेस क्लबच्या वर्धापनदिनी २४ फेब्रु. ला महाड येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी ११ वाजता मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख,आजतक वृत्तवाहिनीचे मुंबई विभागिय संपादक साहिल जोशी,परिषदेचे विभागिय सचिव आणि दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. रायगड प्रेस क्लब सन्मान सोहाळयाच्या नियोजनासाठी अध्यक्ष विजय मोकल आणि महाड प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष प्रविण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रेस क्लब आणि महाडचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here