र्वांना निमंत्रण पत्रिका पाठविणं शक्य नव्हतं.तशी अपेक्षाही कोणाची नव्हती.केवळ फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरून आवाहन केलं आणि अडीच  हजारांवर पत्रकार मित्र शेगाव नगरीत एकत्र आले.मराठी पत्रकार परिषदेचं वैशिष्टय असं की,उदघाटक कोण आहे?,समारोप कोणाच्या हस्ते व्हायचाय?,वक्ते कोण आहेत? हे पाहून पत्रकार अधिवेशनास येत नाहीत.ते येतात ते केवळ आणि केवळ मराठी पत्रकार परिषदेवरील प्रेमा पोटी.2013 मध्ये औरंगाबादला अधिवेशन झालं.सरकार पत्रकार संरक्षण कायदा करीत नाही म्हणून सर्वच राजकीय नेत्यांवर आम्ही  बहिष्कार टाकला होता.व्हीआयपी किंवा सेलिब्रेटी कोणीच नव्हतं.तरीही 2200 पत्रकार औरंगाबादला होते.यावळेस आमच्या काही ‘हितचिंतकांनी’ मुख्यमंत्री येणार नाहीतचा मोठा गाजावजा केला.या मित्रांची अपेक्षा अशी होती की,मुख्यमंत्री नाहीत म्हटल्यावर  उपस्थिती कमी होईल.त्यांच्या दुदैर्वानं असं काहीच झालं नाही.मुख्यमंत्री आले नाहीत तरी संख्या कमी झाली नाही।  2५00 पत्रकार उपस्थित होते.काही वक्ते आले नाहीत.त्याचा असुरी आनंद काही पोटदुख्यांना झाला.जे वक्ते आले नाहीत त्या बिचार्‍यांची अडचण मला माहिती आहे.मात्र अडिच हजार पत्रकारांसमोर व्यक्त होण्याची एक सूवर्णसंधी त्यांनी गमविली हे नक्की.शिवाय जे आले नाहीत त्यांची कोणी आठवणही काढली नाही किंवा का आले नाहीत ? असा प्रश्‍नही कुणाला पडला नाही.’परिषद कोणासाठी थांबत नाही’ हेच उपस्थित पत्रकारांनी दाखवून दिलं.जे पत्रकार आले होते ते उभ्या आडव्या महाराष्ट्रातून  आले होते.सावंतवाडी,दापोलीपासून ते गडचिरोली,भंडारापर्यंत आणि जतपासून धुळ्यापर्यंतचे पत्रकार उपस्थित होते.दोन दिवस 2५00 पत्रकार शेगावमध्ये होते.पण कुठं गोंधळ नाही,गडबड नाही.शिस्तीत सारं सुरू होतं.वक्त्यांची भाषणं सुरू असताना एकही पत्रकार जाग्यावरून कधी उठला नाही.वक्त्याचा अवमान होईल किंवा वक्ता डिस्टर्ब होईल असं पत्रकारांनी काही केलं नाही.न्यूजलेस कवितांच्या कार्यक्रमातील कवी एवढे खूष झाले की,’असा ऑडियन्स दुर्मिळ असतो’ अशी प्रतिक्रिया प्रशांतं डिंगणकर आणि श्यामसुंदर सोन्नर यांनी व्यक्त केली.पत्रकार कवींना प्रोत्साहन देताना कोणी टाळ्यांची कंजुषी केली नाही.इतर कार्यक्रमातही हीच रसिकता पत्रकारानी दाखविली.निवास,भोजन व्यवस्था चोख होतीच पण तेथेही कसलीही गडबड नाही,गोंधळ नाही.सारं कसं शिस्तीत सुरू होतं.शेवटपर्यंत सभागृह खचाखच भरलेलं होतं.

अधिवेशनाच्या निमित्तानं पत्रकारांनी माझ्यावरचं जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल त्याचं ऋुण कसं व्यक्त करावं तेच मला समजत नाही.किमान दीड हजार पत्रकारांनी माझ्याबरोबर सेल्फी काढली किंवा फोटो काढले.मी एक कार्यकर्ता पत्रकार आहे.माझ्या स्वभावामुळं संसारातील व्यावहारिक गणितं मला कधी सोडविता आली नाहीत.पण मला याचा अभिमान आहे की,पत्रकारांचं जे प्रेम माझ्या वाटयाला आलं ते अलिकडच्या पिढीत कोणात्याही पत्रकारला  मिळालेलं नाही.त्या अर्थानं मी गर्भश्रीमंत आहे.ज्या आपुलकीनं,आदरानं पत्रकार माझी विचारपूस करीत होते.काहीजण आपलेपणानं गळाभेट घेत होते.हे सारं वातावरण मला भाऊक करणारं होतं.माझ्या भाषणाच्या शेवटी माझा कंठ दाटून आला.’एस.एम.देशमुख आगे बढो’चा जेव्हा गजर झालां तेव्हाही डोळ्याच्या कडा ओलावल्या आणि त्यामुळं शब्दही जड झाले.माझी ही अवस्था उपस्थित मित्रांंच्याही लक्षात आली.माझ्या भाषणात टाळ्यांचा कडकडाट एवढया वेळेस झाला की,प्रत्येक टाळी दूर बसलेल्या माझ्या विरोधकांच्या कानफटात लगावत होती.हे सारे दृश्य पाहून  निशिकांत भालेराव म्हणाला,’एस.एम.तू नशिबवान खराच,तुला पत्रकारांचं एवढं प्रेम मिळालं”.निलमताईंनी आमच्या कामाची मुक्तकंठानं तर तारीफ केलीच पण त्यांनी मला एसेम जोशींच्या रांगेत नेऊन बसविलं.( मला कल्पना आहे की,एसेम जोशींच्या पायाजवळ बसायची माझी पात्रता नाही,मात्र निलमताईंच्या मनाचा मोठेपणा असा की,त्यांनी मला फारच मोठेपण दिलं.ताई धन्यवाद ) गुरूवर्य सुधीर गव्हाणे म्हणाले,एस.एम ‘अन्य कोणाचं संघटन करणं सहज शक्य आहे मात्र पत्रकाराचं संघटन तुम्ही करून दाखविलंत हे अभिनंदनीय आहे’.ज्यांच्याबद्दल पत्रकारांना आदर आहे त्यांच्या या प्रतक्रिया आहेत.यापेक्षा वेगळं मला तरी काय हवंय ?

मित्रांनो,मी तुमचा ऋुणी आहे.साध्या निरोपावर तुम्ही आलात माझ्यावर प्रेम आणि विश्‍वास व्यक्त केलांत.त्यामुळं मला हजार हत्तीचं बळ मिळालं आहे.एक गोष्ट नक्की की,मी शेगावला जाताना  तणावात होतो.मात्र तिथं गेल्यावर आणि सार्‍या पत्रकारांशी भेटल्यावर हा तणाव कुठल्या कुठं पसार झाला.तुमच्या प्रेमाच्या वर्षावानं मी ओलाचिंब झालो.हेच प्रेम,हाच आपलेपणा मला मिळत राहो एवढीच मी गजानन महाराज यांच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो.हे सारं ज्यांनी घडवून आणलं तो बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष,माझा मित्र राजेंद्र काळेचं कसं आभार मानू. ? एकच सांगतो,’मित्रा  तुझं ऋुण मी कायम स्मरणात ठेवील’.अनेक अडथळ्यांवर मात करीत,अवतीःभवती खंजीर घेऊन फिरणार्‍यांच्या नाकावर टिच्चून या पठ्यान अधिवेशन यशस्वी करून दाखविलं.आज सारा महाराष्ट्र राजेंद्रला धन्यवाद देतोय.राजेंद्र तुम्ही खरंच ग्रेट आहात.

येत्या 31 ऑगस्ट रोजी माझी आणि माझ्या कार्यकारिणीची मुदत संपत आहे.म्हणजे 1 सप्टेंबरपासून मी अध्यक्ष नसेल.तरीही मी जो वसा घेतला आहे तो सोडणार नाही.पळ काढणं माझ्या स्वभावात नाही.माझ्या नावात एस.एम. आहे.त्यावरून मला अनेकजण ‘सक्सेसफूल मॅन’ म्हणतात.ते खरंही असावं.कारण जे प्रश्‍न मी हाती घेतले ते सोडविले.मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्‍न आम्ही मार्गी लावला.माझ्या अध्यक्षपदाच्या काळात पत्रकारांचे तब्बल 22 प्रश्‍न मार्गी लावले.पेन्शनचा प्रश्‍न मार्गी लावूनच मी थांबणार आहे हे माझ्या मित्रांनी लक्षात ठेवावं.त्यासाठी मला आपलं असंच प्रेम आणि सहकार्य मिळावं अशी मी अपेक्षा करतो माझ्या दीड वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मी झपाटल्यासारखं काम केलं.या काळात मी तब्बल 35 हजार किलो मिटरचा प्रवास केला.महाराष्ट्रात असा एकही तालुका नसेल की,मी जेथे गेलो नाही.हजारो मित्र जोडले,परिषदेला परत उर्जितावस्था आणून दिली.हे करताना परिषदेचे आर्थिक व्यवहार चोख ठेवले.परिषदेचं स्वतःचं असं कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही.परिषद कोणाकडून देणग्याही घेत नाही.संलग्न जिल्हा संघांची वर्गणी आणि संलग्नता शुल्क यातूनच परिषदेचा गाडा चालतो.अनेकदा पैसे नसल्यानं टेलिफोनही कापला जातो.ही अवस्था आहे.ज्या संस्थेची वार्षिक उलाढाल तीन-चार लाखही नाही त्या संस्थेत कोटयवधींचे आर्थिक घोटाळे झालेत असं कोणी म्हणत असेल तर अशा भंपकबाजांवर विश्‍वास ठेवायचं काऱण नाही हे आमच्या सदस्यांना चांगलं माहिती आहे.एक गोष्ट मात्र खरी की,काही तांत्रिक पूर्तता राहिल्या आहेत.त्याला कोणी घोटाळे असं म्हणत असेल तर म्हणोत बापडे.वस्तुस्थिती अशी आहे की  मी आजही मुंबईला जाताना माझ्या घरून डबा घेऊन जातो.. सार्वजनिक जीवन जगताना काही पथ्ये पाळली आहेत.मी त्याचं कठोरपणे पालन केलं आहे.आरोप करणारे काय,गांधीजींवरही गलिच्छ आरोप करतात.माझ्यावर चार चौघांनी आरोप केल्यानं मी विचलित होत नाही.कारण माझे हात स्वच्छ आहेत. 2010 पासूनचं ऑडिट करून घेतलेलं आहे.परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांना हा हिशोब परिषदेच्या कार्यालयात बघायला मिळेल.( लुच्च्यांना काय वाटतं त्याची पर्वा मला नाही ) परिषदेला मी माझी आई समजतो.आईशी गद्दारी मी केली नाही। करणार नाही. त्यामुळं मी अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवताना कृतार्थ आहे.भरपूर काम केल्याचं समाधान,23 पत्रकारांना 30 लाखांची मदत देऊन त्याचे अश्रू मला पुसता आले त्याचं समाधान,ऋुषीतुल्य पत्रकारांना मला सन्मानित करता आलं त्याच समाधान आणि राज्यातील हजारो पत्रकारांशी मला मैश्री करता आली त्याचं प्रेम मिळविता आंलं ,पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील पत्रकारांना देता आला,आणि मराठी पत्रकार परिषदेची ही चळवळ राज्यातील साडेतीनशे तालुक्यात नेता आली याचं समाधान मला आहे.अर्थात मी निमित्तमात्र होतो.किरण नाईक,सिध्दार्थ शर्मा,यशवंत पवार,मिलिंद अष्टीवकर हे माझे सहकारी,सारे विभागीय सचिव,सारे जिल्हा आणि तालुका अध्यक्ष आणि राज्यातील साडेआठ हजार सदस्य माझ्या सोबत होते म्हणून हे सारं जमलं.या सर्वांचा मी कायम  ऋुणी आहे.

जाता जाता सांगतो ,एक संकल्प आपण सोडलाय.मोठा कॉर्पस फंड आपण जमा करायचं ठरविलं आहे.त्याबाबतची कायदेशीर करवाई दोन महिन्यात पूर्ण कऱण्याचं अभिवचन मी दिलंय.मी आता या कामाला वाहून घेणार आहे. प्रत्येक पत्रकाररानं आपला शेअर म्हणून किंमान एक हजार या फंडात ठेवावेत.त्यातून गरजू पत्रकारांना आपण मदत करणार आहोत.दरवर्षी 25 पत्रकारांना जरी आपण मदत करू शकलो तरी हे फारच मोठं काम होईल.प्रत्येक पत्रकारांचा विमा उतरविला गेला पाहिजे.त्यासाठी जिल्हा संघांची आणि तालुका संघांची बोलणी करून तो निर्णयही घेतला आहे  पेन्शन आणि छोटया वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांबरोबरच मजिठियाचा प्रश्‍नही मराठी पत्रकार परिषद लावून धरणार आहे.हे सारे संकल्प सिध्दीस नेण्यासाठी मला आपल्या सहकार्याची गरज भासणार आहेच.ते मिळेल एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो.

तुमचा

एस.एम.

1 COMMENT

  1. साहेब आपण केलेल काम खरच कौतुकास्पद आहे.आम्ही या पञकार परिषदेला येवू शकलो नाही हे आमचं दुर्दैव समजतो.परंतु पुढच्या वर्षी आम्ही नक्की येणार.
    तुकाराम धायगुडे
    पञकार – दैनिक पुण्यनगरी पलूस जि.सांगली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here