संजय राऊत यांना राज्यातील ठाकरे सरकार पाडायचंय का ? या प्रश्‍नाचं होकारार्थी उत्तर देता येऊ शकेल अशा दोन-तीन घटना गेल्या दोन दिवसात घडल्या आहेत. “शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं” असा अनाहुत सल्ला संजय राऊत यांनी कॉग्रेसला दिला.राज्यात शिवसेना,कॉग्रेस,राष्ट्रवादीचं आघाडी सरकार असलं तरी शिवसेना युपीएचा घटक पक्ष नाही.ज्या आघाडीचे आपण सदस्यही नाहीत त्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा त्या आघाडीतील घटक पक्षांचाच आहे,तिथं बाहेरच्या व्यक्तीनं लुडबुड करण्याचं खर तर कारण नाही किंवा नव्हतं.ती लुडबुड संजय राऊत यांनी केली.ती करताना त्याचे काय परिणाम होणार आहेत हे संजय राऊत यांना माहिती नसतील किंवा नसावेत असं नाही.अपेक्षेप्रणाणे कॉग्रेसनं संजय राऊतांच्या वक्तव्याला आक्षेप घेत कॉग्रेसचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले यांनी “आमच्या टेकूवर राज्यातलं सरकार चालू आहे” हे विसरू नका अशा अर्थाचा दम  भरला.प्रणीती शिंदे यांनी देखील “सोनिया गांधीच आमच्या नेत्या आहेत आणि आमचं नेतृत्व कोणी करावं हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला असल्याचं” सांगत नाराजी व्यक्त केली.एक गोष्ट तर स्पष्ट आहे की,ज्या पक्षाचं अस्तित्व केवळ महाराष्ट्रापुरतेच आहे आणि ज्या पक्षाचे पाच खासदारही नाहीत अशा पक्षाच्या नेत्याला कॉग्रेसनं काय म्हणून संयुक्त पुरोगामी आघाडीचा नेता करावा ? ते शक्य नाही हे माहिती असतानाही संजय राऊत जर असं बोलत असतील तर त्यामागं निश्‍चित अशी काही योजना असली पाहिजे.

दुसरी घटना आजच्या “सामना’तील ‘रोखठोक बॉम्ब’ची..संजय राऊत यांनी सामनामधून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.शरद पवार आणि संजय राऊत यांचे संबध सर्वऋूत आहेत..असं असतानाही संजय राऊत शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यावर अकार्यक्षमतेचे आरोप करीत असतील आणि अनिल देशमुख अपघातानं गृहमंत्री झाले असं म्हणत असतील तर यामागंही निश्‍चित असं काही तरी सूत्र आहे.एक गोष्ट तर स्पष्टय की,अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांमुळे सरकारची कमी आणि राष्ट्रवादी पक्षाची जास्त बदनामी झाली आहे.अशा स्थितीत त्यांना आहे त्या पदावर ठेवणे म्हणजे राष्ट्रवादीसाठी आणखी खड्डा खोदण्यासारखे आहे.मात्र अनिल देशमुख यांना लगेच बदलले तर त्यांच्यावर पोलीस आयुक्तांनी केलेले आरोप खरे होते असा संदेश जाईल या भितीतून अनिल देशमुख यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही..मात्र “घटक पक्षांकडूनच आता टीका होऊ लागल्याने त्यांना बदलावे लागेल” असं सांगत शरद पवार अनिल देशमुखांची उचलबांगडी करू शकतात.म्हणून म्हणून अशी शंका घेता येऊ शकते की,सामानातील रोखठोख शरद पवार यांच्या कल्पनेतून तर साकारलेला नाही ना ?.चित्र तर तसंच दिसतंय.. याचे पडसाद लगेच उमटायलाही सुरूवात झालीय..संजय निरूपण यांनी ‘गृहमंत्री निष्क्रीय असताल तर मग मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत ? असं वक्तव्य करून आगीत तेल ओतलण्याचं काम केलं आहे.संजय राऊतानी उपस्थित केलेल्या मुद्यावरून महाआघाडीत प्रचंड अंतर्विरोध आणि अतंर्गतकलह असल्याचे चित्र समोर आलं आहे.त्यातच आज शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आली आहे ..कॉग्रेस आणि शिवसेनेची साथ सोडून महाराष्ठ्रात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली नसेल कश्यावरून..? असं होणारच नाही असंही नाही.मागच्या वेळेस भाजपनं न मागता राष्ट्रवादीनं दिलेला पाठिंबा आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेली शपथ या गोष्टी कोणी विसरलेलं नाही… त्यामुळं पुन्हा असा प्रयत्न होणारच नाही असं केवळ राजकीय अज्ञानीच म्हणू शकतात..समजा राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात येणार असं ठरलं तर मग संजय राऊत यांना खलनायक ठरवून ठाकरे सरकार पाडण्याचं पाप त्याच्या माथी मारायला वरील दोन घटना पुरेशा आहेत.संजय राऊत आणि शरद पवार यांचे संबंध आज सुमधुर असले तरी पुढील काळात ते तसे राहतीलच असं थोडंच आहे ?…राजकारणात प्रत्येकजण दुसर्‍याला वापरून घेत असतो.तसं शरद पवार संजय राऊतांना वापरत नसतील कश्यावरून.? .त्यामुळंच शरद पवारांना युपीए अध्यक्षपदाचे उमदेवार जाहीर करणे आणि अनिल देशमुखांवर टीका करणे या दोन्ही गोष्टी संजय राऊतांसाठी अडचणीच्या ठरू शकतात..एकदा जर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तर मग सर्वात जास्त नुकसान हे शिवसेनेचे होईल..आजच ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन विस्कळीत झालं आहे..पक्षाध्यक्षांना सरकार चालविण्याची कसरत करावी लागत असल्याने संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ नाही..तेवढा प्रभाव असलेला दुसरा नेता नसल्याने संघटन उघडं पडलं आहे.शिवाय शिवसेेनेच्या सरकारकडून ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नसल्याने लोकांची नाराजी आहे.शेतकरयांच्या वीज तोडणीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे..आज जर निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे आहेत तेवढे आमदारही निवडुन येतील की नाही ? अशी चर्चा ग्रामीण भागात कार्यकर्तेच करतात..अन ती वस्तुस्थिती देखील आहे..”वाझे आणि माझे”वर लक्ष केंद्रीत केले गेल्यानं या संघटनेकडे किंवा लोकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही..त्याच वेळेस ग्रामीण भागातील शिवसेनेचा प्रबळ विरोधक राष्ट्रवादी पक्ष आपली पकड मजबुत करताना दिसत आहे..शिवसेनेसाठी ही धोक्याची खंटा असल्याने कुठल्याही स्थितीत सेनेला सरकार टिकवावेच लागेल.संजय राऊत यांच्या भूमिका घटक पक्षांना नाराज करणार्‍या असल्याने हे सरकार टिकेल कसे हा प्रश्‍न आहे.कॉग्रेसला भाजप नकोय म्हणून ते महाआघाडीत आहेत..पण त्यांनी एकाबाजुनी राष्ट्रवादीकडून होणारी कोंडी आणि दुसर्‍या बाजुने संजय राऊतांकडून दिले जाणारे अनाहुत सल्ले या कात्रीत ते जास्त दिवस शांत बसू शकणार नाहीत..त्यामुळं राज्यात महाआघाडी सरकार टिकणे ही शिवसेनेची जास्त गरज आहे अन्यथा सेनेचे होणारे हाल सगळ्यांनाच समोर दिसत आहेत..दरबारी राजकारणात माहिर असलेल्या संजय राऊत यांन ही ग्राऊंड रियालिटी कोणीतरी सांगण्याची गरज आहे…

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here