मला तो दिवस आजही आठवतोय..एक वीस-बावीस वर्षाचा ,सडपातळ शरीरयष्ठी असलेला तरूण सकाळी सकाळी माझ्याकडं आला ..म्हणाला,’सर मला पत्रकार व्हायचंय,संधी द्या.’काही  अनुभव  ? काम कुठं करतोस’ ? हे  माझे  प्रश्‍न होते .तो एका बिल्डरकडं  काम करायचा..पत्रकारितेची कोणतीही पार्श्‍वभूमी नाही..लिखाणाचाही अनुभव नाही..प्रश्‍न पडला बिल्डरकडं काम करणार्‍या या तरूणाला संधी तरी कशी आणि का द्यावी ? ..तरीही त्याची प्रामाणिक तळमळ आणि इच्छाशक्ती पाहून त्याला मी ‘पंधरा दिवस ये,तुझं काम पाहून पुढील निर्णय घेऊ’ असं सांगितलं.तो रुजू झाला..शुध्द लेखनाच्या नावानं आनंदी आनंद,बातमी लिहायला जमायचे नाही  .पण कमालीचा न्यूजसेन्स..त्याला बातमीचा वास यायचा.असे म्हणा ना की , बातमी त्याच्याकडं चालत यायची…त्यामुळं आठ दिवसातच त्यानं माझा निर्णय चुकला नाही हे दाखवून दिलं.दांडगा जनसंपर्क आणि समोरच्याला क्षणात आपलंस करून घेण्याची कला यामुळं तो अल्पावधीतच  रायगडचा स्टार पत्रकार झाला..रायगड जिल्हयाला हादरे देणार्‍या अनेक बातम्या त्यानं शोधून काढल्या..तो बातमी आणायचा मी ती रिराईट करून घ्यायचो..दुसर्‍या दिवशी स्फोट  व्हायचा ..अलिबाग नजिकचा उंदेरी किल्ला दोन कोटींना विकला गेला.पाच वाजता त्याची रजिस्ट्री झाली..सहा वाजता कागदपत्रांसह बातमी माझ्या टेबलवर होती.एक महिनाभर नंतर आम्ही या बातमीचा फॉलोअप घेत राहिलो ..17 अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाले.मग धमक्या,त्याला आणि मला पोलीस संरक्षण वगैरे सारं झालं..टाइम्स ऑफ इंडियानं या बातमीची दखल घेऊन त्याची मुलाखत छापली.. मला अभिमान आहे की, आमच्यामुळं हा किल्ला एका भांडवलदाराच्या घश्यात जाता जाता वाचला..जनार्दन पाटील असं या पत्रकाराचं नाव..

तो आज अलिबागनजिकच्या कुरूळ या गावचा सरपंच म्हणून निवडून आलाय..जनार्दन हा धडपडया..माझ्याबरोबर काम करीत असतानाच त्यानं एलएलबीला प्रवेश घेतला..त्याला लॉ करण्यासाठी मी पूर्ण मदत केली..तो वकिली पास  झाला .. नंतर मी अलिबाग सोडलं..त्यानंही दैनिक सोडलं..तो वकिली करू लागला ..  तिथे ही तो स्टार बनला  .. .तरूण पिढीतला सर्वात चांगली प्रॅक्टिस असणारा तो आज अलिबागचा वकिल आहे.काही दिवस जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा सरचिटणीसही होता..आता तो राष्ट्रवादीत नाही..

कुरूळची निवडणूक लागली ..तो रिंगणात उतरला आणि शेकापच्या एका बलाढय उमेदवाराच्या विरोधात चांगल्या मतांनी विजयी  झाला..मला भिती होती..जनार्दनचं काय होणार. ? .कारण विरोधक बलाढय होते हा एकटाच होता..पण त्याचा आत्मविश्‍वास दांडगा होता..म्हणाला,’सर वातावरण मला अनुकूल आहे’..मी शुभेच्छा दिल्या..अपेक्षेप्रमाणं आज निकाल लागला..

जनार्दन तुझं मनापासून अभिनंदन..पत्रकार ते सरपंच आणि जन्या ते जनाशेठ हा तुझा प्रवास थक्क कऱणारा आहे..मी त्याचा साक्षीदार आहे .. अनेक अडथळे आले,पत्रकारिता करताना तुझ्यावर हल्ले झाले,आर्थिक अडचणी आल्या पण तू न डगमगता पुढे चालत राहिलास..आज त्याचे फळ तुला मिळाले.. ..शून्यातून सुरूवात केलीस..धडपडत राहिलास..कोणीही गॉडफादर नसताना..कुणाचाही वरदहस्त नसताना,स्वबळावर मोठा झालास….तुझी अशीच प्रगती होत राहो..माझ्या शुभेच्छा नेहमीसाठी तुझ्या बरोबर आहेतच.. (S.M.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here