देवडीः जिल्हा परिषदांच्या शाळा म्हणजे कायम हेटाळणीचा विषय..अनेक पालकांसाठी आपला पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो ही गोष्टही अपमान वाटावी अशी..यात पालकांची काही चूक नाही.जिल्हा परिषद शाळांची अवस्थाच तशी आहे.इमारती वगैरे विषय तसे गौण असले तरी शिक्षणाबद्दल आस्था असणारे शिक्षक जिल्हा परिषद शाळांमधून दुर्मिळ झाले आहेत हे वास्तव आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे व्यवसाय हा स्वतंत्र विषय आहे..मात्र आमच्या देवडी गावचे पालक आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नशिबवान यासाठी की,देवडी फाटा येथील शाळेत शिक्षणाबद्दल तळमळ असणारा,मुलं शिकली पाहिजेत अशी तीव्र इच्छा असणारा,मुलांना खासगी शाळांपेक्षा चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे अशी प्रामाणिक इच्छा असणारा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा शिक्षकवृंद लाभला आहे.उत्तम दर्जाचे शिक्षण,सभोवतालचा सुंदर परिसर,खेळाचं साहित्य,शाळेला कंम्पाऊंड आणि शेक्षणिक वातावरण असल्याने आज जिल्हा परिषदेच्या या शाळेकडे पालकांचा ओढा आहे.त्यामुळं पटसंख्या देखील वाढली असून अल्पावधीत शाळेनं केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल शाळेला आयएसओ मानांकन देखील प्राप्त झालं आहे.

शिक्षक प्रयत्न करतात तर त्यांच्या प्रयत्नांना आपणही साथ दिली पाहिजे यासाठी मध्यंतरी आम्ही शाळेला अत्यंत महत्वाची 25 पुस्तकं भेट दिली होती.त्यावेळी झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात शिक्षकांनी मुलांना आधुनिक शिक्षण देता यावं यासाठी कॉम्प्युटर,प्रोजेक्टरची मागणी केली होती.त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मी दिले होते.त्यानुसार आमचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या प्रयत्नातून शाळेला रंगीत टीव्ही,कॉम्युटर, प्रोजेक्टर आदि एक लाख रूपयाचे साहित्य आम्ही दिले आहे.एक लाख रूपयांचा चेक शाळेला दिला असून साहित्य खरेदी देखील करण्यात आली आहे.येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी माझी आई माजी सरपंच सौ.लिलाबाई देशमुख आणि वडिल श्री.माणिकराव देशमुख यांच्या हस्ते हे साहित्य आम्ही शाळेच्या स्वाधिन करणार आहोत.

आमच्या तीनही भावंडाचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंं.मात्र आपण जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा न्यूनगंड आम्हाला कधीच वाटला नाही.शिवाय आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहोत म्हणून आमचं काही नुकसान झालं असंही आम्हाला वाटत नाही..आम्ही तिघांनीही आपआपल्या क्षेत्रात बर्‍यापैकी काम केल आहे.या पार्श्‍वभूमीवर आम्हाला या शाळांबद्दल विशेष आस्था आणि ममत्व असणं स्वाभाविक आहे.त्यामुळंच एक लाख रूपयांचं हे साहित्य आई-वडिलांच्या हस्ते शाळेला देताना आम्हाला नक्कीच आत्मीय समाधान मिळत आहे.गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळा वाढल्या पाहिजेत,त्या चांगल्या चालल्या पाहिजेत ,आधुनिक पध्दतीनं दर्जेदार शिक्षण तेथे मिळालं पाहिजे,ग्रामस्थाचं देखील त्यासाठी योगदान लाभलं पाहिजे म्हणून हा  छोटासा प्रयत्न ..( एस.एम।) 

LEAVE A REPLY