बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले व लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांच्या अंगरक्षकांनी रविवारी पाटणा येथील मतदान केंद्रावर एका माध्यम छायाचित्रकारास बेदम मारहाण केली. तेजप्रताप यांच्या गाडीच्या चाकाखाली या छायाचित्रकाराचा पाय आल्याने त्याने गाडीच्या समोरील काचेवर कॅमेरा मारला होता. यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी माध्यम प्रतिनिधींशी वाद घालत छायाचित्रकारास मारहाण केली.
तेजप्रताप यांनी मतदान केल्यानंतर ते परत निघाले असताना हा प्रकार घडला. मारहाणीची सर्व घटना उपस्थित माध्यम प्रतिनिधींच्या कॅमे-यात कैद झाली आहे. छायाचित्रकाराने कॅमेरा आदळल्याने तेजप्रताप यांच्या गाडीची काच फुटली. यानंतर त्यांचे अंगरक्षक व माध्यम प्रतिनिधींमध्ये वाद झाला.
या घटनेनंतर तेजप्रताप यांनी, आज मतदान केल्यानंतर मी जेव्हा मतदान केंद्राबाहेर पडत होतो तेव्हा माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, ज्यामध्ये माझ्या गाडीचे नुकसान झाले. शिवाय माझ्या वाहनचालकासह अंगरक्षकांना गंभीर दुखापत झाली आहे. अशी ट्वीट करत माहिती दिली. तसेच, याप्रकरणी तेजप्रताप यांच्याकडून पोलीसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.