Thursday, April 22, 2021

‘छळछावणी’तले दिवस

औरंगाबादेच्या ‘छळछावणी’तले दिवस.

कल्पना करा  माझी काय स्थिती झाली असेल ते,मी मॅनेजरला लग्नाची  पत्रिका देण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांनी माझ्या हातावर टर्मिनेशन ऑर्डर ठेवली.ती वाचून मला देव आठवले.पायाखालची जमिन सरकली.कारण लग्नाला अवघे आठ दिवस शिल्लक होते.अगोदरच घरच्यांचा विरोध ,दोन्ही घरात भारत-पाकिस्तान सीमेवर असते तसे वातावरण . ,लग्नासाठी लागणारा दमडाही खिश्यात नाही   आता हे  नवं  झेंगड हे सारं कमी होतं म्हणून की काय  तरूण भारतमधीलच एका हरामखोरानं  एस.एम.ची नोकरी गेलीय ,तुमच्या पोरीच कल्याण व्हावं असं वाटतं असेल तर अजूनही विचार करा असा अनाहुत सल्ला देणारं पत्र सासरवाडीला पाठविलं होतं.हा पत्र रूपी बॉम्ब सासरवाडीत पडला आणि हिराशिमा नागासाकीत जेवढा  हाहाःकार झाला नसेल तेवढा हाहाःकार तिकडं झाला .तरीही लग्न तर झालं पण नंतरच्या दहा महिन्यात तरूण भारतनं माझे जे हाल केले ते आठवले तरी आजही अंगावर काटे येतात.अर्थात आम्हीही तरूण भारतला पुरून उरलो.हक्काची,न्यायाची ही लढाई मी कशी लढलो , या लढाईत मी काय गमवलं आणि काय कमवलं याची ही कथा आहे.आज माझ्या लग्नाचा 26 वर्षे झाली  आहेत मात्र 26 वर्षांपूर्वी जे घाव बसले त्याच्या जखमा आजही भरून आलेल्या नाहीत.नंतरच्या काळात मी अधिक कणखर बनलो यामागं तरूण भारतचाही मोठा हात भार आहे असं आता मी म्हणू शकतो.

———————————                    27 वर्षे झाली आज.1990 मधील 4 मेचा तो दिवस मी आजही विसरलो नाही.नेहमी प्रमाणं सकाळीच कार्यालयात पोहोचलो होतो.आज विशेष खूष होतो.कारणही तसंच होतं.अनेक अडथळ्यांवर मात करीत माझ्या लग्नाचा मुहूर्त ठरला होतां.आज ऑफिसमध्ये पत्रिका वाटायचं ठरविलं होतं..सुरूवात व्ववस्थापकांपासून करावी म्हणून त्यांच्या दालनात गेलो.फडणीस नावाचे व्यवस्थापक होते.भला माणूस,पण हात बांधलेला.मी केबिनमध्ये गेलो तर  तेच माझी वाट बघत असावेत असं त्यांचा चेहरा सांगत होता.पत्रिका दिली.ती त्यांनी न वाचताच बाजूला ठेवली.म्हणाले,”देशमुख व्यवस्थापनानं माझ्यावर एक अवघड जबाबदारी सोपविलीय” त्यांच्यावर काय जबाबदारी सोपविलीय याचा मला अंदाज येत नव्हता.मी म्हटंलं,”साहेब पूर्ण करा तुमची जबाबदारी”.त्यांनी कपाटातून  एक लिफाफा काढला.माझ्यासमोर ठेवला.त्यातून काढलेलं पत्र वाचून माझ्या पायाखालची वाळूच सरकली. सुन्न झालो .काहीच सूचेना.”तुमचं काम समाधानकारक नसल्यानं तुम्हाला सेवामुक्त करण्यात येत आहे” असा मजकूर पत्रात होता. लग्नाची तारीख 13 मे ठरली होती.घरच्यांना लग्न मान्य नसल्यानं घरात भारत पाकिस्तान सीमेवर असते तशी तणावाची स्थिती पैदा झालेली. घरातील एक- एका सदस्याला पटवता पटवता आमच्या दोघांच्याही नाकी नऊ आले होते..त्यातचं हे नव लचांड उदंभवलं होतं.नोकरी जाणं म्हणजे काय असतं याचा पहिला शॉक मी सहन करीत होतो.ंया धक्क्यानं मी  सैरभैर झालो. तरूण भारत परिवाराच्याच्या पुणे,सोलापूर आवृत्त्यात मी सात वर्षे चांगलं काम केलं होतं,माझ्या कामावर खूष होत संपादक  चित्तरंजन पंडितांनी मला चार शाबासकीची पत्रं (Appreciation Letters )    दिली होती.माझ्या उल्लेखनिय कामाबद्दल मला दोन विशेष वेतनवाढी(( Increment ) दिल्या गेल्या होत्या.आज मात्र मला त्याच तरूण भारत परिवारातून ‘काम समाधानकारक नसल्याचं’ अगदीच तकलादू आणि बिनबुडाचं कारण सांगून घरचा रस्ता दाखविला जात होता. मी उद्धट आहे.हट्टी आहे,स्पष्ट बोलतो,अशी कोणतीही कारणं पत्रात असती तर ती मी मान्य केली असती.पण ज्या कामांवर मी पहिल्यापासून निष्ठा ठेवल्या,काम करताना मी कधी वेळेचं भान पाळलं नाही,तहान भूक बधितली नाही रात्रीचा दिवस करीत काम केलं त्याकडं दुर्लक्ष करीत काम समाधानकारक नसल्याचं निमित्त शोधलं गेलं होतं.ते मी मान्य करणे शक्य नव्हते .शिवाय मी स्वतः देवगिरीत आलो नव्हतो.नाना नवले यांनी मला आग्रहानं देवगिरीत आणलं होतं.त्यामुळं माझ्या कामाबद्दल व्यवस्थापनापैकी कोणीही अनभिज्ञ नव्हतं.पहिले सहा महिने मी ते  तिथं सिध्दही करून दाखविलं होतं.

तरूण भारत अजून सुरू व्हायचा होता. तेवढ्यात संपादकांचे वडिल वारले होते.त्यामुळं ते निघून गेले होते.संपादकांच्या अनुपस्थितीत  वार्ताहर नियुक्तीपासून शंभर पानी अंक काढण्याची ,स्टाफ निवडण्याची सारी कामं मीच केली होती.म्हणजे उभारणी माझ्या देखरेखीखालीच झाली होती.हे सारं होत होतं तेव्हा माझ्या कामाबद्दल कोणाला काही  आक्षेप नव्हता.ही काम करून झाल्यानंतर त्याना माझ्या कामात खोट दिसत होती.हे मला अजिबात पटलेलं नव्हतं. व्यवस्थापकाना बोलण्यात अर्थ नव्हता.संपादक मनोहर कुलकर्णी यांच्याकडं गेलो.त्यांच्याबरोबर मी पुणे आणि सोलापूरमध्येही काम केलेलं होतं. त्यांनाही माझं काम माहिती होतं.त्यांनी अपेक्षेप्रमाणे हतबलता दाखविली.मनोहर कुलकर्णी माणूस म्हणून सज्जन.मात्र टीम लिडर म्हणून त्यांनी कधीच सहकार्‍यांची पाठराखण केली नाही.प्रत्येक वेळी ते हात वर करून मोकळे होत. त्यांची ही “नरो वा कुंजरो वा” ची भूमिका त्यांच्याही अंगलट आली .  कालांतरानं त्यांनाही अपमानित होत तरूण भारतमधून बाहेर पडावं लागलं. त्याच्याकडून माझी फार अपेक्षा नव्हतीच. “एक महिना म्हणजे माझं लग्न होईस्तोवर मला सवलत द्यावी ,असं नाही केलं तर माझं लग्न मोडू शकतं .मी 1 जूनला स्वतः राजीनामा देतो ” अशी गयावया त्यांच्याकडं केली.बिचार्‍याला पाझर फुटला नाही.गंभीर चेहरा करून त्यांनी नकारघंटा वाजविली.माझ्यासमोर आता पर्याय राहिला नव्हता किंवा कुणाचा आधारही नव्हता.जड अंत:करणाने  मनोहर कुलकर्णी यांचा निरोप घेतला . शबनम खांदयावर टाकली  अन तरूण भारतच्या बाहेर पडलो. जे ध्यानी मनी नव्हतं ते घडत होतं.लग्न जमेल आणि बेकारीची कुर्‍हाड माझा कपाळमोक्ष करील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.मात्र कधी कधी वास्तव कल्पितापेक्षाही भयंकर असतं याचा मी अनुभव घेत होतो.फक्त अर्धा तास,अन होत्याचं नव्हतं झालं होतं.मी शब्दशः रस्त्यावर आलो होतो.नोकरी जाण्याचा माझा तो पहिलाच अनुभव.नंतर अनेक नोकर्‍या सोडल्या ,धरल्या पण पहिल्या अनुभवानं मी पार खचून गेलो होतो हे नक्की.तासाभरापुर्वी जे घडलंंय  ते सोलापूरला  शोभनाला सांगणं आवश्यक होतं.टेलिफोन बुथवरून तिला फोन केला.”माझी नोकरी गेलीय,आपण लग्न लांबणीवर टाकू या”  असा प्रस्ताव तिला दिला.आणखी एक प्रस्ताव द्यायलाही विसरलो नाही,”तु लग्नाबद्दल पुनर्विचारही करू शकतेस” अर्थातच .दोन्ही प्रस्ताव तिनं फेटाळले.”लग्न ठरलंय त्याच तारखेला करायचं असं तिनं निर्धारानं सांगितलं”.तिचे हे शब्द मला हजार हत्तीचं बळ देणारे ठरले.आता मी कोणत्याही संकटाशी सामना करायला सिध्द होतो.पण ही लढाई वाटते तेवढी सोपी नव्हती.निलंबन पत्र (Termination Letter )  देताना संबंधित कर्मचार्‍याचे सारी देणी (Dues )  दिली  जातात.तभानं असं काही केलं नाही.दर महा सात तारखेला पगार होत.मे 1990 मध्ये मी लग्नाला निघून जाईपर्यंत तरी मला पगार दिला नव्हता.अगोदरच आर्थिक टंचाइग्रर्स्त,त्यात घरचा विरोध आणि आता अगदी एप्रिलचा पगारही नाही.नवरदेवाच्या हातात औरंगाबादहून बीडला जाण्याएवढेही पैसे नव्हते.मित्रांकडून थोडी-फार रक्कम घेतली.10 मे रोजी घरी पोहोचलो.

वडिल लग्नाला आलेच नाहीत

तिकडं फारसा आनंद नव्हताच.वडिल घुश्यातच होते.मुलानं परस्पर लग्न जमविणं हे  हे “देशमुखी शान के खिलाफ” होतं.गावातले लोक त्यावरून त्यांना सारखे डिवचत होते.आम्ही देशमुख आणि जमिनदार असल्याने 27 वर्षापूर्वी किमान एक लाखाच्या हुंडयाचा मी नवरदेव ठरलो असतो.कारण तेव्हा एकराच्या हिशेबात हुंडा मिळायचा.शिवाय पोरगा-शिकला सवरलेला.औरंगाबादला नोकरी करतोय म्हटल्यावर भाव अधिकच आला असता.हा सारा हिशेब गावातले वडिलांना सांगायचे.त्यामुळं पोरानं किमान एक लाखाला घर बुडविलं याचा राग घरच्यांना  होता.त्यामुळं त्यांच्या रागाचा पारा सातत्यानं चढा होता.आई बिचारी मुलाच्या आनंदात आनंद  मानावा म्हणून तयार झाली होती.मामा आणि छोटया भावाने सारी जबाबदारी अंगावर घेतली,बस्ता नाही की,कोणती खरेदी नाही.लग्नाचा सारा खर्च दहा हजार झाला.त्यातही माजलगाव ते सोलापूर प्रवासासाठी पाच-सहा हजार गेले.नवरदेवाला एक जोधपुरी शिवला होता.आईला एक साडी घेतली होती.मुलीच्या आईला दोन साडया घेण्यासाठी एका नातेवाईकाकडं पैसे दिले तर त्या महोदयांनी घरातीलच 200 रूपयांच्या साडया माथी मारल्या.त्यावरूनही लग्नात मोठाच राडा झाला. लग्न म्हणजे सारी गंमत जंमत सुरू होती.आनंदाचं चिन्हंही कुणाच्या चेहर्‍यावर नव्हतें.पाहुणे,नातेवाईक सारेच गंभीर चेहरे करून आपसात कुजबुजत होते.अशा तर्‍हेनं आमचं हे ‘कुजबुज पथक’ 12 मे रोजी सोलापुरात दाखल झालं..त्या अगोदर एक घटना घडली होती.त भा तील एका हरामखोरानं माझ्या  सासर्‍याला पत्र पाठविलं होतं,”एस.एम.ला कामावरून कमी केलंय,तुमच्या मुलीचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर लग्नाचा पुनर्विचार करा” वगैरे अनाहूत  सल्ले त्या पत्रात दिलेले होते.पत्र रूपी या बॉम्बनं हिरोशीमा नागासाकीत जो हाहाःकार झाला नसेल तेवढा आक्रोश सोलापुरात केला गेला.ती मंडळी कर्नाटकी.मुळात त्यांचा आवाजच मोठा.साधं बोलतानाही अनेकजण समोरच्याला ऐकायला येत नाही अशा अविर्भावात बोलत असतात.त्यात असा पत्रस्फोट  घडल्यानं त्यांचा आवाज कोणत्या टिपेला गेला असेल याची आपण कल्पना करू शकतो. नुसती रडारड सुरू होती..लग्नातही हे संतापाचे सूर ठिकठिकाणी व्यक्त होत राहिले.पोरगी हुशार होती.एलएलबी करीत होती.तिला चांगलं स्थळ मिळेल असा शोभनाच्या घरच्यांचा होरा होता.काहीही झालं तरी जावई सरकारी नोकरीवालाच  असावा असा त्यांचा प्रयत्न होता.कोर्टात,बॅेकत,पोस्टात स्थळासाठी त्यांची शोधाशोध सुरू होती.पत्रकार व्हिमजिकल,सर्किट   असतात हे पत्रकारांबद्दलच  सासरेबुवांच मत . शिवाय पत्रकारांची नोकरी म्हणजे आळवावरचं पाणी आज आहे अन उद्या नाही असंही त्याचं म्हणणं होतं.ते परोपरिनं पोरिला समजूनही सांगत होते.हे सारं सांगूनही पोरगी ऐकत नाही म्हटल्यावर पोरगी स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतेय,आगीत उडी घेतेयं असाच सार्‍यांचा समज झाला होता.(त्यातच नोकरी गेल्याचं पत्र बॉम्बसारखं घरात येऊन आदळलं होतं.(पत्रकारांची नोकरी म्हणजे आळवावरचं पाणी हे सासरेबुवाचं म्हणणं लग्नाअधीच खरं ठरले  होतं.) दोन्ही बाजू लग्नाला अनुकुल नव्हत्याच पण आमचा प्रेम विवाह असल्यानं दोन्ही बाजुच्या माता -पित्यांचा नाईलाज झाला..मात्र माझे वडिल एवढे हट्टी की,सार्‍यानी समजावून सांगितल्यानंतरही ते लग्नाला आलेच नाहीत.(वडिल लग्नाला आले नाहीत त्याबद्दल मी किंवा शोभनानं गेल्या 27 वर्षात त्यांना कधीच दोष दिला नाही.कारण आई-वडिलांची काही स्वप्न असतात,मुलांकडून नक्कीच काही अपेक्षा असतात.त्या जर पूर्ण झाल्या नाही तर ते दुखावतात.वडिलांची मानसिकता तेव्हा तशीच होती.आम्ही आमची मनमानी करीत होतो.ते त्यांना आवडत नव्हते आणि आम्ही आम्हाला आमचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असल्याचं मानत आमची मनमानी करीत होतो.हे व्दव्द दोन पिढ्यातील होतं.त्यात दोन्ही बाजू सत्य असतात.त्यामुळं दोष कोणाचाच नसतो.असलाच तर परिस्थितीचा असतो.हे आम्ही तेव्हाही समजून घेतले होते आणि आजही आमची तीच भावना असल्याने वडिल लग्नाला आले नाहीत याबद्दल दोष आम्ही त्यांना कधीच दिला नाही.तेवढ्या क्षणापुरतं वाईट मात्र वाटलं त्याबद्दलची कटुता कधी ना शोभनाच्या मनात राहिली ना माझ्या..)त्यामुळं आणखीनच तणाव.हे सारे वार सहन करीत आम्ही एकदाचे बोहोल्यावर चढलो,13 मे रोजी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या लग्नाचा बार .(?) उडाला.सकाळी साडेनऊच्या सुमारास एकदाच शुभमंगल सावधान झालं.दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि पुढील लढाईसाठी सिध्द झालो.

लग्न उरकून रात्री घरी आलो तरी  वडिलांचा घुस्सा कमी झालेला नव्हताच.जोडीनं पाया पडावं म्हटलं तर त्यासही वडिलांनी विरोध केला.आम्ही गेलेलो असताना कोणी तरी वडिलांच्या कानात आमची नोकरी गेल्यांचं विष ओतलं होतं.त्यामुळं त्यांचा पारा अधिकच चढला होता.शोभनाचा पायगुण चांगला नाहीची धुण त्यांनी वाजवायला सुरूवात केली होती.चांगली चाललेली नोकरी लग्न जमताच जातेच कशी? असा त्यांचा सवाल होता.माझ्याकडंही त्याचं काही उत्तर नव्हतं.लग्न जणल्यानंतर चारच दिवसात नोकरीवर पाणी सोडावं लागलं होतं हे वास्तव होतं.पायगुण सारख्या  भंपक कल्पना मला कधीच मान्य नव्हत्या.पण वडिलांचं समाधान करू शकेल असं प्रभावी उत्तरही माझ्याकडं नव्हतं.त्यामुळं दोघंही शिव्या खात गप्प बसलो.दोन दिवसांनंतरही वातावरणातील तणाव कमी झालेला नव्हता.तिसर्‍या दिवशी मला मुंबईला जायचं होतं.अजून अंगावरची हळदही वाळली नव्हती.आई जाऊ नको म्हणून सांगत होती.पण अगोदरच मी मुंबई मटासाठी अर्ज केलेला होता.तिकडे  17 मे रोजी इंटरव्हयू होता.मुंबईला जायला औरंगाबादहून नाशिकमार्गे जाणारी गाडी पकडली.दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना अशी घटना या प्रवासात  घडली.नाशिकजवळ पहाटे गाडीला अपघात झाला.मी चालकाच्या  मागच्या सिटवर झोपलो होतो.चालकाच्या मागची काच फुटली अन माझ्या अंगावर पडली.वरती माझी लाकडी बॅग होती,ती माझ्या डोक्यावर पडली.खोच  पडली.गंमत अशी की,मी वगळता गाडीत कुणाला खरचंटलही नाही.जखमी अवस्थेत मला सकाळच्या गाडीतून नाशिकला पाठविलं गेलं.डोक्याला पट्टी वगेरे बांधून मी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो.नाशिकहून दुपारी एकच्या सुमारास मटात पोहोचलो.

 इंटरव्हूला गेलो, हात हलवत आलो 

रात्रभर प्रवास,झालेला अपघात,डाक्याला बांधलेली पट्टी,अंघोळ नाही अशा अवस्थेत आमच्या इंटरव्हयूचं  काय होणार हे मला दिसत होतं.झालंही तसंच.माझं सलेक्शन काही झालं नाही.गोविंदराव तळवळकरांनी सांगितलं ‘आम्हाला मुंबईत राहण्याची व्यवस्था असलेला माणूस हवाय.’ मी मुंबईलाच आलो होतो पहिल्यांदा.तरीही मी ठोकून दिलं ,’मी माझी राहण्याची व्यवस्था करतो’.ते कोणी मान्य केलं   नाही.मुंबईला गेलो रिकाम्या हातानं परत आलो.गावी आलो तर माझ्या डोक्याला पट्टी पाहून आईनं हंबरडाच फोडला.त्याचं खापरही शोभनाच्या माझी फोडलं गेलं.लग्न जमल्या जमल्या  नोकरी गेली,आता मोठा अपघात झाला,बयेचा पायगुणच चांगला नसल्याची चर्चा अगोदर घरात आणि नंतर गावात सुरू झाली.आमच्या  दोघांच्याही मनाची घुसमट सुरू होती.त्या वातावरणात जास्त दिवस राहणं शक्य नसल्यानं आईची परवानगी घेऊन परत आम्ही औरंगाबादला आलो.घर चालायचं कसं ? ही विवंचना आमचा पाठलाग करीत होती.4 मे नंतर गेली पंधरा -वीस दिवस मी ज्या अग्निदिव्यातून जात होतो त्यामुळं तरूण भारत व्यवस्थापनावर मी मनातून प्रचंड संतापलेलो होतो.’काहीही झालं तरी या मंडळीला अक्कल शिकवायचीच’ असा निर्धार मी केला होता.ही मंडळी माझ्याशी ज्या क्रुरपणे वागली होती तसं पुन्हा कोण्या पत्रकाराशी वागण्याची हिमत त्यांना होणार नाही असा जमालगोटा देण्याचं मी ठरवलं होतं.औरंगाबादमध्ये काही मित्रांच्या माध्यमातून वकिलांशी चर्चा केली,कागदपत्रं दाखविली.लेबर कोर्टातून टर्मिनेशनला स्टे मिळू शकतो असा सल्ला मिळाल्यानंतर 25 मे रोजी लेबर कार्टात माझी केस दाखल केली.लगेच तरूण भारतच्या टर्मिनेशन ऑर्डरला स्टे मिळाला.त्या पंधरा दिवसातली दिलासा देणारी ही एकमेव घटना  होती.म्हणतात ना आपल्यावर वेळ आल्यावर कोणी आपलं नसतं.मला तसाच अनुभव येत होता.माझी कोणाकडून फार काही अपेक्षा नव्हती.ना पैसे कुणाला मागत होतो ना,अन्य काही मदत.मला कोर्टानं दिलेल्या दिलाश्याची बातमी छापावी एवढीच अपेक्षा होती.ती देखील पूर्ण होत नव्हती. बातमी घेऊन मी एकाकी  दारोदार भटकलो.दैनिक मराठवाडाचा अपवाद वगळता औरंगाबादच्या एकाही दैनिकानं ती बातमी छापली नाही.अग्रलेखातून सामाजिक उत्तरदायीत्वाच्या लंब्या चौडया थापा मारणारे संपादक आपल्याच बिरादरीतील एका तरूणाला कोर्टानं दिलासा दिलाय त्याची बातमी छापायला तयार नव्हते.एरवी सारी दैनिकं परस्परांचे स्पर्धक असतात,हितशत्रू असतात परंतू हितसंबंधांचा विषय येतो तेव्हा ते सारे एक असतात.देशमुखला स्टे मिळाल्याची बातमी आपल्या कर्मचार्‍यांना कळली तर त्याचंही नीती धैर्य वाढू शकते आणि आपल्याकडंही उठून कोणी तरी कोर्टात जाऊ शकते याची धास्ती सार्‍याच वर्तमानपत्रांना असल्यानं माझी बातमी दाबण्याचा प्रयत्न केला गेला.ते स्वाभाविकही होते हे आज मला कळत असले तरी तेव्हा मी जात्यात अडकलो असल्याने नाही म्हटलं तरी सार्‍याच दैनिकावर मी मनोमन संतापलो होतो.मालक-संपादकांचा असा अनुभव आणि कोणतीही संघटना मला आधार द्यायला,माझ्या वेदना समजून घ्यायला पुढं यायला तयार नव्हती. .मॅनेजमेंटच्या विरोधात जाण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा सारेच कातडीबचाव भूमिका घेतात हा अत्यंत विदारक अनुभव तेव्हा मला आला.अर्थात मी देखील कोणापासून काही अपेक्षा ठेवली नव्हती.आपली लढाई आहे,आपणच जिद्दीनं लढायचं हे ठरवूनच मी मैदानात उतरलो होतो. निशिकांत भालेराव यांनी दैनिक  मराठवाडात शेवटच्या पानावर छोटी का होईना बातमी दिली होती.त्यामुळं 26 तारखेला मी तभात जाण्यापुर्वीच व्यवस्थापनाला बातमी कळली होती.या बातमीनं त्यांना नक्कीच धक्का बसला होता.देशमुख एवढ्या टोकाचं पाऊल उचलेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.त्याचं खरंही होतं.इतरांच्या अन्यायाच्या विरोधात शंखनाद करणारे आम्ही पत्रकार वेळ स्वतःवर येते तेव्हा सारं बिनबोभाट सहन करतो  हे तभा व्यवस्थापनालाही माहिती होतं.मी त्यापैकी नव्हतो.देशमुखी ताठा होता.सुंभ जळाला तरी पिळ कायम ठेवण्याची वृत्ती अंगात होती.त्यामुळं मला गृहित धरणं त्यांना महागात पडलं होतं.माझ्यासाठीही हे सारं सहज सोपं नव्हतंच.कोर्टाची ऑर्डर घेऊन जाणं,त्यांचा विरोध असताना तिथं काम करणं वाटतं तेवढं सहज नसतं.पण म्हणतात ना मेलेलं कोंबडं आगीला भित नाही,मी त्याच मनोवस्थेत होतो.भय,मान-अपमान या पलिकडे मी गेलो होतो.मी तेव्हा सुडानं पेटलेला एक तरूण होतो.बस्स.त्यामुळं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची माझी भक्कम तयारी होती..तेव्हा मी त्या अवस्थेत होतो.कोर्टाची ऑर्डर घेऊन तभात गेलो.मॅनेजमेट बधणारे सारे महाभाग एकत्र बसून विचारविनिमय करीत होते.मी गेल्यानंतर मला प्रवचन दिलं गेलं. “तुम्ही सात वर्षे परिवारात होता” याची आठवण करून दिली.कोर्ट-कचेर्‍यांनी मार्ग निघत नसतात हे सांगितलं गेलं आणि तुम्ही एका मोठ्या व्यवस्थापनाशी पंगा घेताय अशी भितीही दाखविली गेली.मात्र त्यानी माझ्या आयुष्यावर असा आघात केलेला होता की,त्यांच्या प्रवचनाचा काडीचाही परिणाम माझ्यावर होणं शक्य नव्हतं.माझा निर्धार झालेला होता.’तुम्हाला काय करायचं ते करा आता माघार घेणार नाही’ हे मी त्यांना निक्षूण बजावलं.मला तेव्हा कश्याचीच पर्वा नव्हती.’नोकरी गमविली होती आणि आता  गमविण्यासारखंही माझ्याजवळ काहीच शिल्लक नव्हतं’.त्यामुळं कुणाच्या बा ला घाबरण्याची मला गरजच नव्हती. मी ऐकत नाही म्हटल्यावर मला अगोदर ऑपरेटरच्या जवळच्या खुर्चीवर बसायला जागा दिली गेली.मी काम काही करायचं नाही असे मला सांगितले गेले. मला  कोणीही बोलायचं नाही अशी तंबी सार्‍यांनाच दिली.थोडक्यात मला वाळित टाकलं गेलं.कालपर्यंत जे माझ्या हाताखाली काम करीत होते,मला सर सर करीत होते,ते ही माझ्याकडं न बघताच पुढं सरकत  होते .दिवसभर मला चहा-पाणी देखील कोणी द्यायचं नाही.मला कोणी बोलत नव्हतं तरी कामगारांच्या मनात एक अस्वस्थतः नक्कीच होती.मॅनेजमेंट कामगारांशी अत्यंत उर्मटासाऱखी वागायची.पगाराच्या नावानं सारा आनंदी आनंद असायचां.बहुतेक पोरं ‘परिवारातली’ असली तरी प्रश्‍न पोटा पाण्याचा असल्यावर त्या गोष्टी गौण ठरतात.शिवाय माझ्यावर अन्याय झालाय हे ही सार्‍याना दिसत होतं.माझ्यावर अन्याय झालाय हे सार्‍यांनाच उमजत होतं.मात्र नोकरीच्या धास्तीनं कोणी तसं बोलण्याची हिंमत करायचं नाही.सारे चिडीचूप असायचे.ते स्वाभाविकही होतं.शेवटी आम्ही सारे पापभिरू,पोटार्थीच होतो.मुलं आपसात कुजबुज करायची.मॅनेजमेंटचे खबरे  व्यवस्थापनांना हे सारं सागायचे.माझ्यामुळं ऑफीसमध्ये सुरू असलेली ही अस्वस्थतः मॅनेजमेंटला परवडणारी नव्हती.याच काळात माझ्याकडून एक प्रमाद घडल्याचं मॅनेजमेंटला वाटत होतं. भाजपचे नेते स्व.प्रमोद महाजन आणि स्व.गोपीनाथ मुंडे सुभेदारी रेस्टहाऊसवर आलेले होते.माझे बालमित्र माजलगावचे सुरेश बजाज याचं गोपीनाथरावांशी चांगलं सख्य होतं.सुरेशच्या आग्रहाखातर माझी  कैफियत  प्रमोद महाजन आणि गोपीनांथरावाचंया कानावर घालण्यासाठी आणि माझ्यावर कसा अन्याय झालाय ते त्यांना सांगण्यासाठी आम्ही त्यांना भेटलो होतो.त्यांनी आमचं जरूर ऐकून घेतलं.त्यातून निष्पण्ण काहीच झालं नाही .  ही भेट तभा मॅनेजमेंटला कळली.ती गोष्ट त्यांना आवडणं शक्यचं नव्हती.त्यातून ते अधिकच कठोर बनले आणि देशमुखपासून सुटका मिळाली पाहिजे या जाणिवेतून त्यांनी अधिकच जालीम उपाय शोधून काढला. त्यामागं माझं मानसिक,शारीरिक आणि आर्थिक खच्चीकरण व्हावं आणि मी ही लढाई अर्ध्यावर सोडून पळून जावं असा डाव होता.

माझी “छळछावणीत” रवानगी

तरूण भारतच्या मुख्य इमारती समोर असलेल्या मैदानात एक चहाची टपरी होती.त्याला लागूनच आणखी चार पत्रं टाकली गेली.तिथं एक जुनाट टेबल आणि गोडाऊनमध्ये पडलेली एक लाकडी खुर्ची आणून ठेवली गेली.झोपडीवर “विस्तारीत संपादकीय विभाग” असा बोर्ड लावला गेला.एक दिवस मी बरोबर दहा वाजता डयुटीवर आलो तेव्हा मॅनेजरनं बोलावून सांगितलं ‘मी आजपासून विस्तारित कक्षात बसायचं’.मी विस्तारित कक्षात गेलो.तो विस्तारित कक्ष कसला?  ती छळछावणीच होती. तेथील सारं दृश्य पाहूनच मला भोवळ यायची वेळ आली. सर्वत्र कचरा पसरलेला होता.टेबलवर धुळ साचलेली.खुर्ची एका पायानं लंगडी,त्यावर बसायचं कसं हा प्रश्‍न होता.डोक्यावर पंखाही नव्हता.मराठवाड्यातला मे मधील पारा चाळीसच्या वर गेलेला.एका पेपरच्या मदतीनं साफ-सफाई केली.खुची भिंतीला टेकवून ती कलंडणार नाही अशा पध्दतीनं बसलो.उन्हामुंळं जिवाची लाही होत होती.अक्षरशः रडकुंडीला आलो होतो.हातातील पेपरचा पंखा करून दिवसभर हवा खात राहिलो  .त्याचा फार काही उपयोग होत नव्हता. हालअपेष्टा इथंच संपत नव्हत्या.विस्तारित संपादकीय विभागाला दरवाजा नव्हता.ते मुक्तव्दार कक्ष होते.पश्‍चिमेला तोंड असल्याने दुपारी तीन नंतर सारं उन झोपडीत यायचं.म्हणजे बसणं शक्यच नव्हतं.अशा वातावरणात देशमुख जास्त दिवस टिकाव धरणार  नाही असा व्यवस्थापनाचा होरा होता.सारी परिस्थितीही अंत पाहणारी.नव्या व्यवस्थेमागं आणखी एक उदेदश होता,मला सगळ्यापासून तोडून ऑफीसमध्ये जी कुचबुज सुरू होती ती थांबवायची होती.त्यात व्यवस्थापनाला थोडं यश आलं होतं. कारण नंतर  कोणी माझ्या दिशेनं फिरकत नव्हतं. बोलत नव्हतंच,आता माझं अस्तित्वही कुणाला जाणवत नव्हतं.सकाळी दहा वाजता येताना लोक मला पाहायचे आणि सायंकाळी 5 वाजता  सायकलवरून जातान मी कधीेतरी कोणाच्या तरी दृष्टीस पडायचो.  मॅनेजमेंटचा मात्र माझ्यावर बरोबर वॉच असायच. मी किती वाजता येतो,किती वाजता जातो याचं रेकॉर्ड तयार असायचं..ऑफिसपासून घर किमान दहा किलो मिटरवर  होतं.सायकलवरून यायचो.घामाघुम व्हायला व्हायचं.उन्हात सायकल चालविणं नको वाटायचं. तरूण भारतचं कार्यालय एमआयडीसी परिसरात होतं .ऑफिसात येताना रेल्वे रूळ ओलांडून यावं लागायचं.एके दिवशी मी येताना एक मालगाडी आल्यानं फाटक बंद झालं.परिणामतः मला दहा मिनिटं उशीर झाला.त्या दिवसाची माझी अनुपस्थिती दाखवून माझा एक दिवासाचा पगार कापला गेला.नंतर मात्र मी कधी उशीर केला नाही. होऊ दिला नाही.

थोडक्यात मी नजरकैदेची शिक्षा भोगत होतो.बरं या शिक्षेचं काऱणही कधी मला सांगितलं गेले  नाही.पण मी जो  अदाज लावला त्याची दोन कारणं असावीत.पहिलं म्हणजे तरूण भारतच्या आवारातच सायं शाखा लावली जायची.मी कधी या शाखेवर जायचो नाही.शिवाय दैनिकाच्या आवारात अशी शाखा लावायला माझा विरोध होता.  दैनिक हे कोणत्याही विचाराचं असलं तरी ते जर जनतेचं व्यासपीठ असेल तर त्या ठिकाणी असं काही होता कामा नये जेणेकरून हे व्यासपीठ केवळ विशिष्ट विचारांच्या लोकांसाठीच आहे असं जनतेला वाटेल.माझी ही भूमिका मी कधी तरी कुणाजवळ तरी बोललो.ते मॅनेजमेंट पर्यंत गेलं आणि मी व्यवस्थापनाच्या बॅडबुक्संमध्ये गेलो..दुसरं एक काऱण असावं. जालना जिल्हयातील एका कारखान्यात साखर काऱखान्यात वार्षिक सर्वसाधारण सभेत गोळीबार झाला होता.ती बातमी दुसर्‍या दिवशी तरूण भारत सोडून सार्‍याच वर्तमानपत्रात आलेली होती.अंबडला तरूण भारतचे वार्ताहर म्हणून एक संघ स्वयंसेवक काम करीत होते.वृध्द ग्रहस्थ होते.त्यांना बदला आणि हवा तर संघ विचारांचाच एखादा तरूण पत्रकार तेथे नियुक्त करा असं मी चार वेळा व्यवस्थापनाला सांगितलं होतं.पण ते झालं नाही.ही बातमी जेव्हा चुकली तेव्हा मॅनेजमेंटच्या सार्‍यांनी मिळून माझी कातडी सोलून काढली.तेव्हा मी ही स्पष्टपणे सांगितलं की,ती बातमी ेदणं वार्ताहराचं काम आहे.ते त्यांनी केलं नाही.त्यांना जाब विचारा.जिल्हा प्रतिनिधीला विचारा. वृत्तसंपादक म्हणून माझा या प्प्रश्नी  काही दोष नाही.मी माझी बाजू आवेशानं मांडत होतो ते व्यवस्थापनाला पटलं नाही.त्याची शिक्षा त्यांनी मला दिली असावी.हे दोन् गुन्हे (?)  सोडले तर काहीच घडलेलं नव्हतं.माझ्या कामाबद्दल तर माझा कट्टर शत्रू देखील कधी आक्षेप घेऊ शकत नाही.काम हाच इश्‍वर मानून मी प्रत्येक ठिकाणी वागलो आहे.त्यामुळं वरील दोन कारणांमुळं मला ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ दिली जात असावी असा माझा तेव्हा आणि आजही समज आहे.मात्र मला आजही वाटतं मी काही गुन्हाच केला नसताना मला शिक्षा दिली जात होती.माझं एकूण वर्तन व्यवस्थापनाला मान्य नसेल तर त्यांनी मला बोलावून विश्‍वासानं सांगितलं असतं तर मी लगेच राजीनामा दिला असता.मात्र आम्ही कोणालाही कोणत्याही क्षणी कामावरून काढू शकतो हे अन्य कर्मचार्‍यांना दाखविण्यासाठी आणि माझा खांदा वापरून त्यांच्या मनात दहशत बसविणयसाठी व्यवस्थापन ही उपाययोजना करीत होते.ते ही केव्हा तर मी लग्नाच्या बोहोल्यावर उभा राहायच्या तयारीत असताना.हा खेळ फक्त माणुसकी या शब्दांशी ज्यांचा परिचय नाही अशाच व्यक्ती करू शकतात..व्यवस्थापनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात हे जरी खरं असलं तरी वेळ-काळेचं भान हे त्यांनाही ठेवावं लागतं इथं माणुसकीचीच हत्त्या केली जात होती.माझा जो छळ सुरू होता तो कोणालाच मान्य नव्हता पण कोणीही उघडपणे प्रतिक्रिया देऊ शकत नव्हतं.तरूण भारतमध्ये एकच व्यक्ती अशी होती की,ती व्यवस्थापनाचे कान उघडणी करू शकत होती.ती व्यक्ती म्हणजे संतोष महाजन. व्यवस्थानकाडून माझा सुरू असलेला छळ पाहून सहसंपादक संतोष महाजन अस्वस्थ व्हायचे.’हे अती होतंय’ याची त्यानी अनेक वेळा व्यवस्थापनाला देखील जाणीव करून दिली होती.मात्र व्यवस्थापन कश्याचीच पर्वा करीत नव्हतं.आख्या तरूण भारतमध्ये नजरकैदेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याशी बोलण्याची हिंमत केवळ संतोष महाजन दाखवत होते.काऱण माझ्या कामाची पध्दत त्यांना माहिती होती.त्याच्या हाताखाली मी लोकमतमध्ये काही दिवस काम केलेलं होतं.स्पष्ट बोलणारे,अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार म्हणून संतोष महाजन तेव्हा परिचित होते.केवळ तत्वांसाठी त्यांनी काही ठिकाणच्या नोकर्‍या सोडलेल्या होत्या.तरूण भारतनंही त्यांनी आग्रह करून बोलावून घेतलं होतं.संतोष महाजन तभामध्ये पुरवणीचं काम पाहायचे.त्यामुळं मला त्यांचा आधार वाटायचा.कंटाळा आला तर एखादया रविवारी त्यांच्या घरीही जायचो.माझ्या विषयावरून त्यांच्याही मनाची घालमेल सुरू असायची.परंतु संधी मिळत नव्हती.संधी आली तेव्हा आम्ही दोघांनी सारे उट्टे काढले.माझ्या अडचणीच्या काळात मला मानसिक आधार दिल्याबद्दल आजही संतोषभाऊंबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेचीच भावना आहे.

सारं व्यवस्थापन चुकीच्या पध्दतीनं चालू असल्यानं नंतर फार काळ देवगिरी तरूण भारत चालू शकला नाही.चागल्या पत्राचा अकाली अंत  झाला.योग्य मॅनेजमेंटचा अभाव हे त्याचं एकमेव कारण आहे असं आजही माझं ठाम मत आङे.तरूण भारत बंद पडल्याचं जेव्हा मला कळलं तेव्हा तिथं मी अनन्वित हाल सहन केले असले तरी मला आनंद झाला नाही.मला दुःखच झाल.कारण विचार कोणतेही असोत विचारांना वाहिलेली वृत्तपत्रे चालली पाहिजेत, टिकली पाहिजेत अशी माझी धाऱणा आहे.मराठवाडा आणि तरूण भारत दोन्ही वृत्तपत्रे बंद झाली हे चांगलं झालेलं नाही,मात्र मिस मॅनेजमेंट हेच याचं कारण होतं हे नक्की.

अन मी हंबरडा फोडला..

 तरूण भारतने जे  हाल माझे केले ते सहनशीलतेच्या पलिकडे होते. पण मी ते सारं निर्धारानं सहन करीत होतो.एका दिवशी मात्र माझी सहनशक्ती संपुष्टात आली आणि मी अक्षरशःओक्साबोक्सी रडलो.घडलं तसंच होतं.वर सांगितलंच आहे की,माझ्या बसण्याची व्यवस्था ज्या झोपडीत केली होती त्या विस्तारित कक्षाला दरवाजा नव्हता.ते मुक्तव्दार कक्ष होत.त्यामुळं रात्री भटकी कुत्री,मांजरं तिथं विश्रांतीसाठी येत.बर्‍याचदा मी डयुटीवर येईपर्यंत ती तेथे  पहुडलेली असत. एक दिवस गंमत झाली.मी सकाळी झोपडीकडं आलो मात्र एक कुत्री मला आत येऊच द्यायला तयार नव्हती.मी आत जाण्याचा प्रयत्न करायचो की ती गुरगुरत  माझ्या अंगावर यायची.मग माझ्या लक्षात आलं तीनं काही पिलांना तिथं जन्म दिला होता आणि त्यांच्या काळजीनं ती मला आत प्रवेश देत नव्हती.आता काय करावं मला उमगेना.बाहेर बसावं तर बसायलाही जागा नाही.शिवाय माणूस भाजून काढणारं उन.दहा-पंधरा मिनिटे मी तसाच  निःशब्द राहिलो.नंतर मात्र एकाएकी मी हंबरडाच फोडला. .माझ्या रडण्याचा आवाज एकून काही जण मुख्य इमारतीच्या दारात आले पण त्यापैकी कोणाचीही काय झालंय,मी का कोकलतोय हे जाणून घेण्यासाठी माझ्यापर्यंत येण्याची हिमत झाली नाही . अखिल हिंदुंना एकत्र करायला निघालेली ही मंडळी,एका हिंदुशीच किती निष्ठूरपणे वागू शकते  त्याचा अनुभव मी घेत होतो .ते दुरूनच तमाश्या बघत राहिले.पाच-सात मिनिटानंतर माझा भावनावेग ओसरला.मी डोळे पुसले.बाटलीतलं पाणी घेऊन तोंडावर मारलं.थोडं हलकं वाटायला लागलं.रडण्याचं महत्वही मला तेव्हा कळून चुकलं.रडून झालं की माणसाला थोडं ओझं उतरल्यासारखं होतं. माझंही तसंच झालं.सांत्वन करायला कोणीच नव्हतं.माझं मी सांत्वन केलं. ‘रडून चालणार नाही,आपण पत्रकार आहोत असं परिस्थितीला शरण जायचं नाही रडायचं नाही,लढायचं”  असा निर्धार करून मी माझ्या मनाची समजूत काढली. त्या दिवशी पाच वाजेपर्यत तिथंच दारात उन्हात बसून राहिलो..घरी पोहोचल्यावर दिवसभरात घडलेला प्रकार नव विवाहिता शोभनाला सांगितला.त्या रात्री आम्ही दोघांनी डोळ्यातले किती आसवे गाळंली  असतील  ते सांगता येत नाही.नवीन लग्न झालेलं.पण फिरायला जाणं नाही,बागेत हातात हात घेऊन सुखी संसाराची स्वप्न पाहणं नाही,रात्री आइस्क्रीम खाणं नाही की,पिक्चरला जाऊन मजा करणं नाही.दररोज ऑफिसमध्ये  घडणारे हे किस्से एकूण आणि माझी मनोवस्था पाहून शोभना अर्धी झाली होती.तिच्या शरीराचा सापळा झाला होता.उद्याचा दिवस कोणतं नवं संकटं घेऊन उगवणार आहे याची धास्ती मनात घेऊनच आम्ही रात्री झोपायचो. शोभनाच्या एका मावस बहिणीच लग्न आमच्या लग्नाच्या जवळपासच झालं होतं.ते हनिमुनला सीमल्याला गेले होते.आपणही सीमला,मनालीला  जावू असं आम्ही ठरविलंही होतं.ते काही जमलं नाही.सीमला -मनाली सोडाच लग्नानंतर दोघ औरंगाबादेतही कुठं फिरायला गेलोत असं झालं नाही.औरंगाबादची पवनचक्की,बिबी का मकबरा इथंही मी शोभनाला घेऊन जाऊ शकलो नाही.एका पत्रकाराशी लग्न केल्याची ही शिक्षा शोभना भोगत होती.मात्र तिची तक्रार नव्हती.,तिनं कुठल्याही गोष्टीसाठी कधी हट्ट धरला नाही.दागिण्याचा हट्ट धरला नाही.परिस्थिती बदलेल या गोष्टीवर विश्‍वास ठेऊन ती मला साथ देत होती.याचं कारण ती स्वतःही पत्रकार होती.लग्न झालं तेव्हा सामनासाठी सोलापूरचं काम करायची.नंतरही तिनं लोकमत,नवभारत,लोकपत्र,आकाशवाणीसाठी काम केलं.पत्रकार असल्यामुळं पत्रकारांचं आयुष्य,त्यांच्या व्यथा,त्यंांची दुःखं याबद्दल ती अपिरचित नव्हती.पण पत्रकार असला म्हणून काय झालं,पत्रकारालाही भावना असतात,इतरांसारखं आनंदात जगावं,थोडी-फार मौजमजा करावी असं वाटत असतंच.स्वाभाविकपणे शोभनालाही असं वाटत होतं.मात्र परिस्थितीनं आणि होणार्‍या आघातानं तिच्या सार्‍या आशा-आकांक्षा,भावनांची राखरांगोळी झाली होती.त्यामुळं काय घडतंय हे बघत ती दिवस काढत होती.

मी सकाळी साडेनऊलाच घरातून बाहेर पडायचो.तेव्हा आजच्यासारखे मोबाईल नव्हते.त्यामुळं मी घरातून गेलो की,तिचा अन माझा दिवसभरासाठी संपर्क तुटायचा.ऑफीसमध्ये मला कोणी फोन केला तर तो मला देण्याचा प्रश्‍नच नव्हता.त्यामुळं संपर्काचं कोणतंच माध्यम नव्हत.  मी घरातून निघाल्यापासून मी घरी परतेपर्यत शोभनाची नुसती तळमळ सुरू असायची.घरात एकटीच असल्यानं तिलाही वेड लागायची वेळ आली होती.मी ऑफीसमध्ये एकटा आणि ती इकडे एकटी.दोघांच्याही जिवांची नुसती कालवाकालव व्हायची.घरी आलो की,तिला बरं वाटायचं.दुःख असलं तरी आपलं माणूस आपल्याबरोबर असलं तर त्या दुःखाशीही दोन हात करण्याचं बळ मिळतं.आमचं तसं व्हायचं. बरं हे सारं कोणाला सांगायची सोय नव्हती.आमच्या दोघांच्याही घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यानं ‘भोगा आता कर्माची फळं’ अशी उत्तरं अपेक्षित होती.त्यापेक्षा आम्ही जे भोगतोय ते कोणाला कळणार नाही याची  काळजी घेत होतो .दुःख ,वेदना एवढ्या होत्या की,अनेकदा आत्महत्येचाही विचार मनात यायचा.पण दुसरं मन तसं करायची संमती देत नव्हतं.त्यामुळं लढाई लढत होतो. ज्या कंपनीसाठी मी आयुष्यातली सात वर्षे दिली होती त्या कंपनीला मी कोणत्या मनोवस्थेत जगतोय याची जराही पर्वा नव्हती.ते हट्टाला पेटले होते ते काळ सोकावू नये या इर्षेनं.त्यांना भिती होती की,या लढाईत देशमुख जिंकला तर कोणीही उठून कोर्टाचा मार्ग अनुसरेल.ते व्यवस्थापनासाठी कठीण होईल. त्यासाठी मला जेवढा त्रास देता येईल ,माझा जेवढा अवमान करता येईल तेवढा केला  जात होता.मला चेकने पगार दिला जायचा.त्या चेकवर मुद्दाम काही तरी चुका केल्या जायच्या जेणेकरून चेक परत येईल.कधी स्वाक्षरी मॅच व्हायची नाही,कधी पगाराची जी रक्कम अक्षरात लिहिली जायची ती आकड्यात वेगळीच असायची.कधी तारखेत चुका केलेल्या असायच्या.हे हेतुतुः होत होत. त्यामुळं चेक परत यायचे.नतर चेक काढायला पंधरा वीस दिवस सहज जायचे.मिळणारा पगार हेच माझं उत्पन्नाचं एकमेव साधन.ते ही वेळेवर मिळत नसल्यानं घर कसं चालत असेल याचा अंदाज करू शकता.घर भाडे साडेचारशे रूपये असायचे.जवाहर कॉलनीत मी राहायचो.मालकाला मी विश्‍वासात घेऊन सारी स्थिती सांगितली होती.त्यामुळं महिना -दोन महिने तो भाड्यासाठी थांबायचा.हा मोठा दिलासा होता.पण दैनंदिन अडचणी यायच्या.कधी स्टोव्हसाठी रॉकेल आणायला पैसे नसायचे तर कधी चहाला दुधाची पिसवी आणायला खिश्यात दमडी नासायेची .शोभनाला चहाची भारी आवड.माहेरी दिवसातून तीन-तीन ,चार-चार वेळा चहा घ्यायची.चहा समोर आला की,नाही म्हणायची नाही.इथं स्थिती अशी होती की,एक वेळाही चहा मिळायचा नाही. आज खरं वाटत नाही पण नंतर नंतर आम्ही दोघांनीही चहा प्यायचं बंद केलं.चहामुळं अ‍ॅसिडीटी होतेय हे त्याचं कारण नव्हतं तर चहाचा खर्च वाचविण्याचा विचार चहा सोडण्यामागं होता.ती दिवसभर घरी असायची,मी साडेपाचच्या सुमारास आल्यानंतर मी देखील घरीच असायचो,गुलमंडी,पैठणगेटलाही आम्ही कधी गेलो नाहीत कारण आम्हाला फिरायचा कंटाळा होता असं नाही तर रिक्षासाठी सोडाच सिटी बसला लागणार्‍या तिकिटाचे पैसेही आमच्याकडं नव्हते.दीड हजार मिळायचे,तेही वेळेवर नाही त्यामुळं प्रचंड हाल व्हायचे.आज हे कुणाला खरंही वाटणार नाही.मात्र ही वस्तुस्थिती होती.शिवाय अशी वेळ केवळ माझ्यावरच आली होती असंही नाही माझ्या सारखे अनेक पत्रकार व्यवस्थापनाच्या अत्याचाराचे असे शिकार ठरलेेले आहेत.(

मी मॅनेजमेंटला हायकोर्ट दाखविले

आठ-नऊ महिने असेच गेले.एक दिवस बळीराम येरमे यांनी मला बोलावले.लेबर कोर्टाच्या ऑर्डरला स्टे देणारी इन्डस्ट्रीयल कोर्टाची ऑर्डर माझ्या हातावर टेकविली आणि “उद्यापासून आपण यायची गरज नाही” असं मला सुनावलं.इन्डस्ट्रीयल कोर्टानं लेबर कोर्टाच्या ऑर्डरला स्टे दिला होता.माझी चुक एवढीच झाली होती की,मी तिकडं कॅव्हेट दाखल करून ठेवायला हवं होतं.ते केलं नव्हतं.पण तेवढी समज तेव्हा  नव्हती.त्यामुळं इंन्डस्ट्रीयल कोर्टानं खालच्या कोर्टाच्या ऑर्डरला एकतर्फी स्टे दिला होता. आता पुन्हा दोन पर्याय समोर होते.एक सारं संपवायचं आणि दुसऱी नोकरी शोधायची.दुसरा मार्ग होता वरच्या कोर्टात म्हणजे हायकोर्टात जायचं.मी अजून जिंकलो नव्हतो आणि व्यवस्थापनाला अद्यल शिकवायला निघालेलो मी ,स्वतःच छळछावणीतील अनन्वित अत्याचाराचा शिकार झालो होतो.त्यामुळं व्यवस्थापनाला अजून धडा मिळालेला नव्हता.त्यामुळं दुसरा मार्ग निवडायचं ठरलं.म्हणजे हायकोर्टात जायचा निर्णय मी घेतला…त्यासाठी किमान दहा हजार रूपये लागणार होते.माझ्याकडं जिथं चहा प्यायला,रॉकेलला आणि तिखट-मीठासाठी शे-पन्नास रूपये नव्हते तिथं दहा हजार कोठून आणणार ? सुधीर देशपांडे,राजू कोरटकर आणि विश्‍वास रहाटकर या मित्रांचा एक मित्र हायकोर्टात वकील  होता.त्याच्याकडं गेलोत.विश्‍वासनं सारी कथा त्याना ऐकविली.वकिलांनी ‘माझा मेहनताना देऊ नका पण कागदपत्रासाठी जो खर्च लागेल तो द्यावा लागेल’ असं सांगितलं.ती दोन-तीन हजारांची रक्कम मित्रांनीच दिली.अशा प्रकारे आमची केस हायकोर्टात गेली..हायकोर्टानं माझ्याबाजुनं कौल दिला.स्टे मिळाला.नंतर तारखा सुरू झाल्या.हायकोर्टानं मला स्टे दिल्यावर मात्र तरूण भारतचं व्यवस्थापन गलितगात्र झालं.जेवढं छळता येईल तेवढं छळलं तरी हा बाबा माघार घेत नाही म्हटल्यावर व्यवस्थापन हतबल झालं होतं.हायकोर्टाचा अंतिम निर्णय देशमुखच्या बाजुनं लागला तर त्याचे दुरगामी परिणाम होऊ शकतात याची जाणीव त्यांना होती.अगोदरच पुण्याचय आवृत्तीत सीटूची युनियन होती.तसं काही झालं,कर्मचारी संघटीत झाले  तर डोक्याला ताप होऊ शकतो हे व्यवस्थापनाला दिसत होतं.त्यामुळं हा विषय कसाही मिटला पाहिजे यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता.एक दिवस व्यवस्थापनातली सारी मंडळी मला तारखेला हायकोर्टात भेटली.बळीराम येरमे यांनी माझ्या खांदयावर हात ठेऊन  “देशमुख आता संपवा हे सारं अशी विनंती केली,आमची गैरसमजातून चुक झालीय,मात्र दोन्ही बाजुंच्या मनात परस्परांबद्दल एवढा अविश्‍वास आणि कटूता निर्माण झालीय की आता एकत्र काम करणं अवघड आहे. त्यामुळं हा विषय परस्पर सामंजस्यानं मिटवू यात” अशी विनंतीच त्यांनी केली..तुमची सारी देणी द्यायला आम्ही तयार आहोत असंही त्यांनी सांगितलं होतं.मी ही या एकाकी लढाईनं थकलो होतो.जे भोग शत्रूच्याही वाट्याला येऊ नयेत असे वाटते ते सारे भोग मी भोगले होते.राग.चीड जरूर होती पण आतून मी मोडलो होतो.सारं संपवावं असं मलाही वाटत होतं.पण देशमुखी ताठा  असल्यानं माघार घ्यायला तयार नव्हतो.आता शत्रूपक्षाकडूनच तशी सूचना आल्यानं मी देखील जास्त ताणलं नाही.शिवाय  मलाही आता भांडत बसायला वेळ नव्हता.कारण नांदेडला लोकपत्र सुरू होत होतं.संतोष महाजन आणि आमची कमलकिशोर  कदम यांच्याशी बोलणी झाली होती.त्यामुळं इथं अडकून पडत वेळ घालविणं मलाही शक्य नव्हतं.”तुम्ही चुक मान्य करताय ना मला यापेक्षा काही नको” म्हणत मीच त्यांना कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये नेऊन चहा पाजला आणि तरूण भारत या विषयावर एकदाचा पडदा पाडला.मी इर्षेन  पेटलो होतो आणि जिद्दीनं जिंकलो होतो.एका बलाढ्य व्यवस्थापनाला टक्कर दिली होती.त्याचा आनंद मला नक्कीच होता .या आनंदात मी मागचं सारं विसरलो होतो.दुःखाचे दिवस संपत आले होते.आश्‍वासक नवी पहाट होताना दिसत होती.मी निर्धारानं लढलो होतो,हट्टानं जिंकलो होतो.कोर्टातला हा किस्सा घरी आल्यावर शोभनाला सांगितला.तिनं देखील सुटकेचा निःश्‍वास सोडला.बरं झालं एकदाचा विषय मिटविलास ते असं ती बोलली.लग्नानंतर आम्ही त्या दिवशी जवाहर कॉलनीतल्या चौकात जाऊन भेळ,पाणी-पुरी खाऊन आपल्या विजयाचा आनंद साजरा केला.ज्यांनी वर्षभर आपला करता येईल तेवढा छळ केला अशा लोकांचं तोंडं आता पहावं लागणार नाही याचाही आनंद होतं.झालंही तसंच.नंतर तेव्हाच्या व्यवस्थापनात जे होते त्यांच्याशी कधीच भेट झाली नाही.इच्छाही नव्हती.नंतर तेव्हाच्या व्यवस्थापनापैकी अनेकांना आपल्या कर्माची फळं भोगावी लागणल्याच्या बातम्या अधुन-मधुन समजायच्या पण मला त्यात स्वारस्य नव्हतं.माझी बाजू न्यायाची होती त्यामुळं पुढच्या आयुष्यात अनेकदा संघर्ष करावा लागला तरी माझं करिअर मात्र व्यवस्थित घडत होतं.वयाच्या 32 व्या वर्षी संपादक होण्याची संधी मिळाली होती.  वेगळ्या शब्दात माझं बरं चाललं होतं.

 तरूण भारतला अद्यल घडविलीच.

‘आम्ही चुकलो’  म्हणत न्यायालाच्या फेर्‍यातून तभाच्या तेव्हाच्या पाताळयंत्री व्यवस्थापनानं स्वतःची सुटका जरूर करून घेतली होती,पण तेवढ्यानं मी पूर्ण समाधानी नव्हतो.सुडाची भावना माझ्या मनात कायम होती.तरूण भारतनं मला छळछावणीत बसवून आठ-नऊ महिने माझे जे हाल केले त्याबद्दलची खुन्नस माझ्या मनात होतीच.मी फोडलेला हंबरडा आणि शोभनाला गाळावे लागलेले अश्रू मी विसरलेलो नव्हतो.लोकपत्रच्या निमित्तानं मला सुड उगविण्याची संधी मिळाली.नांदेडला जात असताना संतोष महाजन आणि मी मिळून तरूण भारतमधील जवळपास 75 टक्के स्टाफ आम्ही फोडला.त्यात डीटीपी ऑपरेटरपासून मशिन विभागापर्यंत सार्‍याच विभागाचे कर्मचारी आमच्या बरोबर आले होते.संपादकीय विभाग तर संपादक आणि अन्य दोन-तीन उपसंपादक सोडले तर रिकामाच झाला होता.त्यामुळं देवगिरी तरूण भारत बंद पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.( नंतर तो बंदच पडला)  याचा अर्थ तरूण भारतमधील कर्मचार्‍यांची किती आणि कशी घुसमट सुरू होती त्याचा अंदाज आपण करू शकतो.आमच्याबरोबर जे आले होते त्यातील अनेकजण कट्टर स्वयंसेवक होते.दररोज शाखेवर जाणारे होते.मात्र तरूण भारत व्यवस्थापनाची हेडलहप्पी भूमिका आणि मनमानी कारभार त्यांना मान्य नव्हता.कर्मचार्‍यांना वेठबिगाराप्रमाणे वागविण्याची त्यांची पध्दतही कर्मचार्‍यांना मान्य नव्हती.एस.एम.देशमुख यांच्यावर केला जात असलेला अत्याचार ते उघडया डोळ्यांनी बघत होते.एस.एम,देशमुख यांच्यासाऱख्या वरच्या पदावरील व्यक्तीची ही अवस्था तर आपली स्थिती काय होऊ शक ते याची धास्ती सर्वांनाच होती.कर्मचार्‍यांच्या मनाची अशी घुसमट सुरू होती.दहशत आणि खबर्‍यांच्यामुळं ते आपल्या भावना कुणाजवळ व्यक्त तर करू शकत नव्हते पण त्यांच्या मनात प्रचंड संताप होता.ते संधीची वाट पहात होते.त्यामुळं मी आणि संतोष महाजन यांनी त्यांना संधी उपलब्ध करून देताच संघाशी असलेल्या बांधिलकीची पर्वा न करता बहुतेक मुलं आमच्याबरोबर यायला तयार झाली.जे कर्मचारी व्यवस्थापनाच्या भितीने मला बोलत नव्हते तेच मी परत उभा राहतोय म्हटल्यावर एकजात माझ्याबरोबर यायला तयार झाले .माझी लढाई सत्यासाठीची होती,न्यायासाठीची होती हे ते बघत होते.परंतू नोकरीची भिती सर्वांनाच असल्याने ते माझ्यापासून लांब होते.तरीही मनाने ते माझे चाहते होते.हे उघड आहे.माझ्या एका शब्दावर नंतर जवळपास 40-45 जण आमच्यासोबत नांदेडला आले होते कर्मचार्‍यांनी भरलेलं तभा कार्यालय अगदीच ओस पडलं.एकाच दिवशी ४५ राजीनामे व्यवस्थापनाकडं सादर झाल्यानं व्यवस्थापनाच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकू लागले होते.अंक काढायचा कसा या विवंचनेनं त्यांना घेरलं होतं. तरूण भारतचा रोजचा अंकही निघणे मुश्कील झाले होते.पुणे-सोलापूरहून बातम्या मागविल्या जायच्या.कट-पेस्ठिंग करून अंक काढला जायचा.तरूण भारत व्यवस्थापनातील मुजोर महाभागांची झालेली ही अवस्था,त्यांची सुरू असलेली घालमेल,कुचंबना पाहून स्वाभाविकपणे मी आनंंदी होतो.त्यानी मला जरूर छळलं होतं,पण मी ही काही त्यांना सोडलं नव्हतं.एक सामान्य माणूस सुडानं पेटला तर बलाढय व्यवस्थापनलाही कसं त्रस्त करू शकतो हे मी तभा व्यवस्थापनाला तेव्हा दाखवून दिलं होतं.बदलत्या परिस्थितीचा तभाच्या खपावर तर परिणाम झालाच पण व्यवस्थापनाचं मानसिक खच्चीकरणंही झालं.नंतर देवगिरी तरूण भारत बंद पडला पण मला वाटतं त्याची सुरूवात या घटनेपासूनच झाली होती.चुकीची माणसं नेमली गेली की,चांगल्या संस्थेची देखील कशी वाट लागते याचं देवगिरी तरूण भारत हे एक उदाहरण आहे. अर्थात ही परिस्थिती बदलावी यासाठी  मला जबर किंमत मोजावी लागली.लग्नानंतरच्या सार्‍या आनंदावर मला पाणी सोडावं लागलं.येणारा प्रत्येक दिवस चिंता,विवंचनेत घालवावा लागला.आज हे सारं आठवताना गंमत वाटते.पण ते दिवस खरचं विसरता येण्यासारखे नाहीत.(नियतीची कमाल बघा ,ज्या देवगिरी तरूण भारतने मी मॅनेजरकडं लग्नाची पत्रिका घेऊन गेल्यानंतर माझ्या हातात टर्मिनेशन ऑर्डरचा अहेर ठेवला होता, ज्या  तरूण भारतने दहा महिने काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लावली  होती त्याच तरूण भारतनं मी 2000मध्ये मराठी पत्रकार परिषदेचा पहिल्यांदा अध्यक्ष झालो तेव्हा ऑफीसला बोलावून माझा  सत्कार केला होता.आता नक्की आठवत नाही पण तेव्हा मनोहर देशपांडे व्यवस्थापन बघत होते.हा नियतीनं उगविलेला एकप्रकारचा सुडच म्हणावा लागेल.)

वाईटातही चांगलं घडलं ते असं 

   प्रत्येक वाईट गोष्टीतूनही काही चांगलं घडत असतं असं म्हणतात.छळछावणीतील त्या दहा महिन्यात मी प्रचंड वाचन केलं..त्या काळात थोडं मानसिक बळ मिळविण्यासाठी बड्यांची चरित्र किंवा आत्मचरित्र मी वाचायचो.कथा-कांदबर्‍या मला आवडत नाहीत.त्या वाचण्याची मानसिक स्थितीही नव्हती.सुभाषचंद्र बोस,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून नोपोलियन,हिटलर,स्टॅलिन,अशा सर्व महापुरूषांची  चरित्रे-आत्मचरित्र वाचली.ते वाचून नक्कीच मला आत्मविश्‍वास मिळत असे.सावरकरांनी अंदमानला जे भोगले होते त्याच्या समोर आपलं दुःख कवडीएवढही नाही हे वाचून लढण्याची उर्मी यायची. सर्व प्रतिकुल परिस्थितीतही सारे नेते परिस्थितीला कसे निर्धारानं सामोरे गेले ते वाचून नवी जिद्द निर्माण होत असे.रोज सात तास याप्रमाणे दहा महिने.  किती वेळ मिळाला होता वाचायला .त्याचा मी पुरेपुर उपयोग करून  घेतला.माझा संघर्ष सुरू असताना   लोकमतला मी टोपण नावानं एक सदरही लिहायचो.त्याचे पन्नास रूपये मिळायचे.ते पन्नास रूपये पाच हजाराएवढे वाटायचे.आकाशवाणीवरही साप्ताहिक सदर असायचे.चालू घडामोडींवर भाष्य करणारं ते सदर दर सोमवारी सकाळी सातच्या बातम्यानंतर लागायचे.त्याचंही मानधन मिळायचं.या सार्‍या रक्कमा आज किरकोळ वाटतात पण तेव्हा त्या लाखाची लॉटरी लागल्यासाऱख्या वाटायच्या.

ही सारी लढाई मी केवळ शोभनाची साथ होती म्हणून लढू शकलो .हे मी मान्यच करतो.तिची साथ नसती तर मी केव्हाच मोडून पडलो असतो. एका बलाढ्य व्यवस्थेच्या विरोधात दहा अकरा महिने टक्कर देण्याएवढा मी शूर -वीर  नक्कीच नव्हतो.शोभना मला बळ देत राहायची.थोडक्यात लढ्यामागची प्रेरणा तीच होती.ती माझ्यापेक्षा मनानी करारी आणि कणखऱ आहे.शिवाय सोलापूर तरूण भारतचा अनुभव ,तभा व्यवस्थापनाती मनमानी  तिच्याही परिचयाची होती.अन आपली काही चूक नाही याची खात्री तिला असल्यानं माघार नाही असा तिचाही निर्धार होता.त्यामुळं आम्ही दोघंही ही  जीवघेणी लढाई लढत होतो..मी अगोदरच हेकेखोर,माझंच खरं म्हणत दुसर्‍यावर मत लादणारा,हट्टी होतो.तरूण भारतच्या अनुभवानं मनानं मी अधिक कणखऱ आणि बेडर झालो. कोणालाही अंगावर घेण्याची आज माझी तयारी असते,आणि अन्यायाच्या विरोधात हल्ला बोलची जी माझी मानसिकता तयार झालेली आङे त्याला देवगिरी तरूण भारतमधील ते निखार्‍यावरचे दिवस नक्कीच बर्‍याच अंशी कारणीभूत आङेत.पत्रकारांचं खंबीर संघटन तयार झालं पाहिजे असं नंतरच्या काळात मला सातत्यानं वाटायचं ते एवढ्यासाठीच की,संकटात सापडलेल्या पत्रकाराला कोणी साथ देत नाही .व्यवस्थापनानं वापरायचं आणि नंतर  त्याला कचर्‍यात टाकून द्यायचं अशी स्थिती सर्वत्र आहे.कायद्याचं कवच नाही,कायद्याचा वापर करून न्याय मिळविण्याची आर्थिक  क्षमता पत्रकारांकडे नसते, शिवाय  न्यायासाठी होणारी अपेष्टा सहन करण्याची तयारीही  नसते . लढाई लढत राहिलो तर लोक काय म्हणतील?,पुन्हा कोणी नोकरीवर घेईल काय ?   कुटुंबाचं काय होईल? याची अनामिक भिती मनात असते.या सार्‍यामुळं दुसर्‍यांवरील अन्यायाच्या विरोधात वाघासारख्या डरकाळ्या फोडणारे आम्ही स्वतःवर आल्यावर मात्र शेळी बनतो, निमुटपणे सारं सहन करतो किंवा परिस्थितीला शरण जात तडजोडी करीत राहतो.हे नेहमीच घडतं.”निघा  म्हटलं की,बॅग घ्यायची आणि चालायला लागायचे ” एवढा हा सोपा मामला असतो.अनेक बड्या संपादकांना मॅनेजमेंटनं गेटवर त्याचे पगार  दिल्याचे किस्से आपण नेहमी ऐकत असतो.या मनमानीला  मी माझ्या परीनं पुरून उरलो.तेव्हा व्हॉटस अ‍ॅप वगैरे नव्हते तरी माझी लढाई  तेव्हा महाराष्ट्राच्या पत्रकारितेत चर्चेची आणि उत्सुकतेची ठरली होती.मी जिंकलो तेव्हा अनेकांना नक्कीच आनंद झाला.कारण सत्याचा ,एका तरूण पत्रकाराच्या एकाकी लढ्याचा, एका मस्तवाल व्यवस्थेवरील तो विजय होता हे सार्‍यानाच कळत होते.पण हे जाहीरपणे कोणी व्यक्त होत नव्हते.

मी एकाकी लढलो.अशी वेळ किमान इतरांवर येऊ नये असं मला तेव्हा वाटत होतं.त्यामुळं  पत्रकारांना संघटीत करण्याचं तेव्हाच ठरविलं होतं.त्यासाठीच मी मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्कात आलो.नंतर या संघटनेचा अध्यक्षही झालो.  पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकार संघटनांनाही एकत्र आणले.या सर्वामागे पत्रकारांना आपण एकटे नाहीत,संघटनेची भक्कम साथ आपल्या बरोबर आहे याची जाणीव  व्हावी असाच हेतू होता,आहे.वेतन आयोगाची अंमलबजावणी,पत्रकारांवरील हल्ले,पत्रकार पेन्शन तसेच गरजू पत्रकारांना आरोग्य विषयक मदत,यासाठी आम्ही आज प्रयत्न करीत आङोत.आमच्या या प्रयत्नांचं पत्रकारांकडून स्वागत तर होत आहेच त्याचबरोबर पत्रकार आता आमच्या चळवळीत हिरीरिने भागही घेत आहेत.’पांढरपेशा वर्ग’ ही आपली परंपरागत ओळख बाजूला ठेऊन आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात पत्रकार एकत्र येताना पाहून छळ छावणीतील आपले ते दिवस सार्थकी लागल्याचा आनंद आज नक्कीच मिळतो आहे.माझी हक्कासाठीची लढाई,माझी चळवळ हा अनेक निष्क्रीय लेखकूंसाठी टिंगलीचा विषय असतो.मला त्याची पर्वा नसते.व्हॉटस अ‍ॅपवरील अशा टिकेला मी उत्तरंही देत नाही.कारण अशा टिकाकांरापैकी अनेकांनी आयुष्यात किती तडजोडी केलेल्या आहेत याची मला कल्पना आहे.सत्यासाठी,हक्कासाठी,पत्रकारितेचं सत्व सांभाळण्यासाठी मी जे भोगले आहे ते भोग अशा टिकाकारांच्या वाट्याला आलेले नसतात,त्यामुळं माझी चळवळ त्यांना रिकामटेकडा उद्योग वाटते.चार-दोघांना काय वाटते याची मी काळजी करीत नाही.महाराष्ठ्रातील पत्रकार आज एकसंघ झाले आहेत,त्यांचा माझ्यावर ,माझ्या चळवळीवर विश्‍वास आहे ही गोष्ट माझ्यासाठी लाख मोलाची आहे.आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येण्याची जाणीव पत्रकारांच्या मनात निर्माण झालीय ही गोष्ट चळवळीचं यश अधोरेखित करणारी आहे.आज पत्रकार एकसंघ झालेत.पत्रकार हल्ला विरोधी संमत झालेला कायदा हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे असं मला वाटतं.त्यासाठी मी पुढाकार जरूर घेतला पण पत्रकारांनी मला खंबीर साथ दिली.त्याचं ते फळ आहे.आज पत्रकार बर्‍याच प्रमाणात एक झाले आहेत.आवाज उठवत आहेत.मजिठियाच्या विरोधातही मोठी लढाई सुरू आहे.मी देखील या लढाईत आहेच.या सार्‍या लढयाची प्रेरणा मला तरूण भारतकडूनच मिळाली.त्याबद्दल खरं तर तरूण भारतला धन्यवाद द्यायला हवेत.ते माझ्याशी एवढया क्रूरपणे वागले नसते तर कदाचित मी देखील अन्य,असंख्य पत्रकारांप्रमाणे एक चाकोरीबद्ध जीवन जगत राहिलो असतो.चळवळींपासूनही मी दूर राहिलो असतो.म्हणतात ना जे होतं ते भल्यासाठी.माझ्याबाबतीत तरी हा वाक् प्रचार खरा ठरला आहे.

(एस.एम.देशमुख यांच्या आगामी आत्मचरित्रातून) 

एस.एम.देशमुख Related Articles

पत्रकारांसाठी भारत “धोकादायक”

पत्रकारांसाठी भारत धोकादायक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इन्डेक्समध्ये भारत 142 व्या स्थानावर वॉशिंग्टन : कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नकात, पण वास्तव हे आहे की,...

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,851FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

पत्रकारांसाठी भारत “धोकादायक”

पत्रकारांसाठी भारत धोकादायक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इन्डेक्समध्ये भारत 142 व्या स्थानावर वॉशिंग्टन : कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नकात, पण वास्तव हे आहे की,...

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

1036 पत्रकार कोरोनाचे बळी

जगभरात 1036 पत्रकार कोरोनाचे शिकार जगभरातील पत्रकारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. जगातील 73 देशात कोरोनानं तब्बल 1036 पत्रकारांचे बळी घेतल्याचा दावा स्वीत्झर्लन्डची माध्यम क्षेत्रात काम...
error: Content is protected !!