चळवळीची चार वर्षे

न्यूज पेपर बरोबरच  आज न्यूज पोर्टलला देखील मोठा वाचक आहे. त्यामुळं दररोज नवनवे पोर्टल किंवा वेबसाईट सुरू होतात. चार वर्षापूर्वी ही स्थिती नव्हती.हाताच्या बोटावर मोजता येतील एवढयाही वेबसाईट नव्हत्या आणि वाचकांनाही वेबसाईट वाचण्याची सवय झालेली नव्हती.त्यातही एकच विषय आणि सकारात्मक पत्रकारिता,सभ्य भाषेतला मजकूर,आणि जे सत्य तेच मांडण्याचा आग्रह यामुळं आरंभी नक्कीच हे सारं वाचकांना रूक्ष वाटायचं. त्यामुळं रोज पाच-पन्नास वाचकांनी व्हिजिट केली तरी आनंद व्हायचा.

वेबसाईटची मांडणी चांगली आहे,मजकुराची गुणवत्ता चांगली आहे,वाचकांना उपयोगी पडेल असाच सारा मजकूर आहे असं असतानाही वाचकच येत नाहीत म्हटल्यावर अनेकदा निराश व्हायला व्हायचं.आपण जे लिहितो त्याला कोणी वाचतच नसेल तर स्वाभाविक आहे हे सारं किती दिवस चालणार?वाटायचं आता बंद करावं.मात्र माझी पत्नी शोभनानं नेहमीच सकारात्मक विचार करीत पोर्टल बंद पडणार नाही याची काळजी घेतली.मला लिहायला भाग पाडलं.त्याचा परिणाम आज दीड-दोन हजार वाचक उद्याच्या बातमीदारलारोज  भेट देत असतात.भाषिक पोर्टलला मिळणारा हा प्रतिसाद नक्कीच आनंद देणारा आहे.विशेषतः चळवळीशी जोडलेले पत्रकार न विसरता बातमीदारला भेट देत असतात.त्याचा नक्कीच आनंद आहे.किंबहुना पत्रकारांची आज जी चळवळ महाराष्ट्रभर फोफावली आहे त्याचं बरंचसं श्रेय सोशल मिडिया आणि उद्याचा बातमीदारला आहे.माणसं जोडण्याचं मोठं काम बातमीदारमुळं शक्य झालं आहे.त्यामुळं बातमीदार हे चळवळीचं महत्वाचं अगं बनून राहिलं आहे याबद्दल कुणाचं दुमत असू शकत नाही.

काळाची गरज आणि काळानुरूप बदलण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही 9 फेब्रुवारी 2013 रोजी उद्याचा बातमीदार हे न्यूज पोर्टल सुरू केलं.मिडिया हाच एकमेव विषय.त्यातही पत्रकारांच्या हक्काच्या लढयावर फोकस करून हे पोर्टल चालविलं जात आहे  उद्याचा बातमीदार हे केवळ पोर्टल नाही तर आपला मित्र आहे,आपला हितचिंतक आहे हे जेव्हा राज्यातील पत्रकारांच्या लक्षात आलं तेव्हा उद्याच्या बातमीदारला नियमित भेट देणार्‍या पत्रकार मित्रांची संख्या लक्षणिय वाढली.आज सरासरी दररोज  दीड  ते दोन हजार पत्रकार,वाचक  बातमीदार पोर्टलला भेट देतात आणि मिडियातील घडामोडी,आंदोलनं याची माहिती करून घेत असतात.

न्यूज पोर्टल आणि ते ही मराठी भाषेतलं पोर्टल चालविणं म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उद्योग आहे.पोर्टलला अजूनही म्हणाव्यात तशा जाहिराती मिळत नाहीत.गुगलकडून ज्या जाहिराती अपेक्षित असतात त्या मराठीला मिळत नाहीत.अशा स्थितीत केवळ चळवळीचं व्यासपीठ म्हणून आम्ही हा ÷उद्योग करीत असतो.पत्रकारांना त्याचा उपयोग होतो एवढंच काय ते समाधान आहे.माझा मुलगा सुधांशूनं हे पोर्टल तयार केलंय.शोभना दररोज मजकूर टाइप करून तो अपडेट करीत असते.मी लिहित असतो.थोडक्यात फॅमिली बिझनेस ( बिनभांडवली आणि कोणताही नफा न देणारा )उद्याच्या बातमीदारची लोकप्रियता आणि विश्‍वासार्हत लक्षात घेता,मान्यवर पत्रकारांना विनंती आहे की,त्यांनी बातमीदारसाठी नियमित लेखन करावं.राज्यातील पत्रकार मित्रांनी देखील आपल्या भागातील माध्यमांशी निगडीत बातम्या पाठवून बातमीदारच्या परिवाराचा घटक व्हावं.कारण बातमीदार ही चळवळ आहे आणि ती अधिक फोफावली पाहिजे,पसरली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.आपण बातमीदारला अद्याप भेट दिली नसेल तर लगेच खालील लिंकवर क्लीक करा,बातमीदार वाचा,काही सूचना असतील,काही दोष असतील,कमतरता असतील तर कळवा.नक्कीच बदल केले जातील.

सतत चार वर्षे बातमीदारवर प्रेम करणार्‍या तमाम पत्रकार मित्रांचे आणि अन्य वाचकांचे मनापासून आभार.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here