मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न 

पत्रकार संघांच्या तालुका अध्यक्षांचा 

रविवारी पाटणला भव्य मेळावा

मुंबई ,दिनांक १८ ( प्रतिनिधी ) 79 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील  354 तालुका अध्यक्षांचा आणि अन्य पदाधिकार्‍यांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा  पुरस्कार वितऱण सोहळा रविवार दिनांक 24 जून 2018 रोजी सातारा जिल्हयातील पाटण येथे सकाळी १० वाजता मल्टी पर्पज हॉल येथे सिक्कीमचे राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट,परिवहन मंत्री दिवाकर रावते,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, श्री विठ्ठल रूखमाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले,मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे,माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर,आमदार शंभुराजे देसाई,बीजेपी चे प्रवकते नरेंद्र पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम उपस्थित राहणार आहेत.राज्यातील 700च्या वरती पत्रकार या एकदिवसीय मेळाव्यास उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या् इतिहासात प्रथमच तालुका अध्यक्षांचा मेळावा होत असल्याने या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,आणि आयोजक पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

तालुका अध्यक्षांच्या मेळाव्याचं उद्दघाटन सकाळी 10 वाजता होणार असून दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर हे आमचे प्रश्‍न,आमच्या व्यथा या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणार्‍या प्रश्‍नांबाबत उपस्थित पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.दुपारी 3 वाजता परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा होणार असून त्यामध्ये ऑनलाईन मिडिया सेलच्या स्थापनेबाबात चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल.राज्यातील युट्यूब,पोर्टल आणि वेबसाईटचे संपादक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत.

समारोपाच्या कार्यक्रमात परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याची  पुढील दिशा काय असेल यावर मार्गदर्शन करतील.मराठी पत्रकार परिषदेच्या सततच्या लढ्यामुळं पत्रकार संरक्षण कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही,पेन्शनचा प्रश्‍न रेंगाळत ठेवला गेला आहे,छोटया वृत्तपत्रांना जाहिरात यादीवरून वगळून सरकार त्यांचा गळा घोटायला निघाले आहे,मजिठियांच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नाही त्यामुळं माध्यमातील सर्वच घटक अस्वस्थ आहेत.या सर्व प्रश्‍नांबाबात ठोस भूमिका काय घ्यायची यावर समोारोप कार्यक्रमात मांडणी केली जाणार आहे.परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या समारोप समारंभात बिहार प्रेस बिलच्या विरोधात ज्या पत्रकारांनी लढा दिला ,तुरूंगवास भोगला अशा पाच ज्येष्ठ पत्रकारांचा एस.एम.देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

पाटण तालुका पत्रकार संघाने या मेळाव्याचे आयोजन केले असून मेळाव्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.सुस्वाद मल्टिपर्पज हॉल,म्हावशी फाटा पाटण येथे हा कार्यक्रम होईल.पाटण साऱख्या ग्रामीण भागात प्रथमच पत्रकारांचा एवढा भव्य-दिव्य सोहळा पार पडत असल्याने या मेळाव्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.मेळाव्यास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे,पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे , सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे  अध्यक्ष हरिष पाटणे,कार्याध्यक्ष शरद काटकर,पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते,उपाध्यक्ष संभाजी भिसे,बाबासाहेब सुतार,भगवंत लोहार,महिला प्रतिनिधी विद्या नारकर आदिंनी केले आहे.

पाटणला कसे याल

————-

पाटण तालुका सातारा जिल्हयात आहे.पुण्याच्या दिशेनं पाटणला येण्यासाठी उब्रज येथून उजवीकडे जावे लागेल.उब्रज – पाटण हे अंतर 30 किलो मिटर आहे.कोल्हापूर- सोलापूरहून येणार्‍या पत्रकारांना कराड येथून पाटणला येता येईल हे अंतर 35 किलो मिटर एवढे आहे.कोकणातून येणार्‍या पत्रकारांनी चिपळूण येथून कोयना मार्गे पाटणला यावे.रेल्वेनं येणार्‍या पत्रकारांनी सातारा किंवा कराड येथे उतरावे तेथून प्रत्येकी अर्ध्या तासाला पाटणला बसेस आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here