चंदगड.कोल्हापूर जिल्हयातील एक तालुका.सारा प्रदेश डोंगराळ.पुर्वेला कर्नाटक,पश्‍चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा,आणि दक्षिणेला गोव्याशी या तालुक्याच्या सीमा जोडलेल्या आहेत.निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केलेला हा प्रदेश आहे.कोकणात जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा किंचित जास्तच पाऊस चंदगडमध्ये पडतो.यंदा राज्याच्या अनेक भागात पाऊस अजून पडलेला नसला तरी चंदगडला 3500 मिली मिटर पाऊस झालाय.पाऊस जास्त असल्याने संपन्नता आलेली आहे.मुबलक पाऊस असल्यानं परिसरात जवळपास 30 छोटी-मोठी धरणं.भात पीक मुबलक घेतले जाते.काजूची किती झाडं या भागात असतील माहिती नाही पण काजूची वार्षिक उलाढाल शंभर कोटींच्या आसपास असते.बोली भाषेवर कानडी,गोव्याच्या आणि कोकणी भाषेचा प्रभाव असल्यानं चंदगडी भाषा तयार झालीय.तिलारी आणि आंबोली या दोन घाटांवर वसलेला हा तालुका महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला आहे.चंदगड कोल्हापूर जिल्हयात असले तरी चंदगड ते कोल्हापूर हे अंतर 114 किली मिटर आहे.बेळगाव मात्र 35-40 किलो मिटर अंतरावर आहे.त्यामुळं सारे व्यवहार बेळगावशी..

आंबोली आणि बेळगावला अनेकदा जाणं झालं,गडहिंगलजलाही एक पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो होतो पण चंदगडला जाण्याचा योग आला नव्हता.त्यामुळं हा निसर्गरम्य प्रदेश बघता आला नव्हता.मात्र चंदगडच्या पत्रकारांच्या सततच्या आग्रहामुळं बुधवारी चंदगडला भेट देऊन तेथील पत्रकार मित्रांशी चर्चा केली.राज्यातील अन्य भागातील पत्रकारांची जी दुखणी आहेत तीच चंदगडच्या पत्रकारांची आहेत…मात्र सीमा भागात असल्याने दोन्ही बाजुंच्या सरकारकडून होणारी उपेक्षा येथील पत्रकारांच्या दुखण्यात भर घालणारी आहे.सरकार सर्व योजना अधिस्वीकृतीपत्रिकेशी लिंकअप करायला निघाले आहे.इथं एकाही पत्रकाराकडं अधिस्वीकृती नाही.ज्यांच्याकडं होती ती काही त्रुटी काढून रद्द केली गेलीय.12-15 हजार  लोकवस्तीच्या या गावातून एक तरूण पत्रकार सहयाद्री दर्पण हे दैनिक चालवितात.अंक चार पानीच आहे.अजून जाहिरात यादीवर आलेला नाही.नवं सरकारी जाहिरात धोरण अंमलात आलं तर कधीच यादीवर येणार नाही.कारण सरकारला आठ पानी अंक हवाय.चार पानी, एक हजार अंक काढायचा ठरलं तर त्याला दररोज पाच हजार रूपये खर्च येतात.महिन्याचे दीड लाख होतात.हा खर्च तालुका किंवा जिल्हयाच्या वर्तमानपत्रांना न परवडणारा आहे.किती पानं आहेत यापेक्षा कन्टेंड कसा आहे यावर माहिती आणि जनसंपर्कच्या अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रीत केल्यास अनेक प्रश्‍न सुटतील.पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पन्शन योजना यासह इतर अनेक विषयांवर चर्चा झाली.. नेहमीप्रमाणं मी पत्रकारांनी जास्त सरकारी योजनांवर अवलंबून न राहता एकत्र येत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन  केले.चर्चा चांगली झाली.उदयकुमार देशपांडे,अनिल धुपदाळे,संतोष सावंत भोसले,नंदकुमार ढेरे,संपत पाटील,विजयकुमार कांबळे,चंद्रशेखर तारळी,या सर्व पत्रकार मित्रांशी चर्चा करताना दोन तास कधी निघून गेले ते समजलेच नाही.चंदगडच्या मित्रांनो,धन्यवाद..आपलं प्रेम आणि आपण केलेलं आदरातीथ्य कायम स्मरणात राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here