ग्रंथोत्सवा सारखे उपक्रम महत्वाचे                                                   

0
1115

अलिबाग दि.26 :- मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी ग्रंथोत्सवा सारखे उपक्रम महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केले.  मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने व जे.एस.डब्लु यांच्या सौजन्याने सार्वजनिक वाचनालय, डोंगरे हॉल अलिबाग येथे आयोजित  ग्रंथोत्सव 2015 कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माहिती व जनसपंर्क महासंचालनालयचे महासंचालक चंद्रशेखर ओक हे होते.  तर कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ज्येष्ठ कविवर्य अरुण म्हात्रे, विसुभाऊ बापट, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा सुरक्षा शहा, माजी नगराध्यक्षा नमिता नाईक,अभिनेता शशांक केतकर, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ऍ़ड. गौतम पाटील, सुमंत भांगे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष रायगड जिल्हा ग्रंथोत्सव समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, अपर पोलीस अधिक्षक राजा पवार आदी मान्यवर होते.

पुढे बोलताना आमदार श्री.पाटील म्हणाले की, मराठी भाषेला गरजेचा असलेला हा एक नाविण्यपूर्ण कार्यक्रम आहे.   अलिबाग हे मराठी पुस्तके,साहित्याची खाण आहे.  तरुण पिढीतील मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून असे उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे.  वाचन संस्कृती वाढली तरच समाजात बदल घडू शकतो.   मराठी भाषेचा दर्जा अधिकाअधिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले जातील.  तसेच वाचनालयाची निर्मिती करुन वाचन संस्कृती वाढविण्यावर भर दिला जाईल असेही ते म्हणाले.  मराठी भाषेमध्ये जे प्रेम आहे ते इतर कुठल्याही भाषेत नाही.   त्यासाठी तरुण पिढीतील युवक वर्गांने वाचन संस्कृती जोपासली तरच आपल्या देशाचा, राज्याचा, समाजाचा विकास घडेल.    साहित्यिकांचे,लेखकाचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचवून वाचन संस्कृती वाढावी म्हणून दरवर्षी शासनाकडून असे उपक्रम राबविले जावेत.   साहित्यिकांच्या जवळीकेमुळेच मला मराठी भाषेबद्दल प्रेम, आकर्षण आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महासंचालक चंद्रशेखर ओक

ग्रंथोत्सव हा उपक्रम सन 2011 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने होत आहे.  माझ्याच जिल्ह्यात नाविण्यपूर्ण असा उपक्रम राबविला जात असून याचा मला आनंद होत आहे. ग्रंथ वाचण्याने  जे आपल्याला समाधान मिळते  ते इतर काही केल्याने मिळत नाही.  त्यासाठी सर्वांनी वाचन संस्कृती वाढण्यासाठी अधिकाधिक ग्रंथ वाचन करावे.   वाचक, प्रकाशक, लेखक, साहित्यिक यावेत यासाठी ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.    वाचन संस्कृती वृध्दीगंत झाली तरच मराठी भाषेचा दर्जा वाढेल.

जिल्हाधिकारी सुमंत भांगे

ग्रंथोत्सव हा सर्वांचा कार्यक्रम असून मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद या सर्वांच्या सहभागाने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.  यासाठी बँकर्स, जेएसडब्ल्यू यांनी आयोजन सहकार्य केले असून तीन दिवसांसाठीचा हा भरगच्च कार्यक्रम आहे.  सध्याच्या विज्ञान युगात पुस्तकाकडे दुर्लक्ष होत आहे.   पुस्तकांवर प्रेम करणारी पिढी कमी होते आहे.   यासाठी वाचनाची गोडी लागावी,वाचन संस्कृती वाढावी म्हणून असे उपक्रम शासनाकडून राबविले जात आहेत.   हा कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रमुख्य मान्यवर शशांक केतकर(श्री)  म्हणाले की, मी एक मराठी माध्यमचा विद्यार्थी आहे.   मी काही काळ परदेशात होतो  त्यानंतर परत भारतात आल्यानंतर मला लोक विचारु लागले की, तू परत भारतात का आला तुझ तर चांगले शिक्षण झाले आहे.  पण मी त्यांना सांगितले की माझी भाषा मराठी असून मला त्याचा स्वाभिमान आहे. मराठी भाषेशी जोडलेली नाल मला तोडायची नाही.   मला आपल्या लोकांसाठी काही तरी करायचे आहे.  आपण देशासाठी,शहरासाठी, समाजासाठी काहीतरी करावे अशी मनात इच्छा ठेवली नक्कीच यातून आपणाला वाचनाची गोडी लागेल.  मला कला क्षेत्राची खूप आवड आहे.  प्रत्येकाने जीवनामध्ये आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे.   लहान मुलांना पळू दे,बागडू दे, त्यांना आता घडू द्या त्यांच्यावर मनावर कुठलही दडपण ठाकू नये.  त्यांना त्यांच ठरवू द्या की आपण काय करावे काय करु नये.  कुठलही शिक्षण वाया जात नाही.  जास्तीत जास्त मुलांनी शिकाव,शिक्षण क्षेत्रात भरारी घ्यावी.  विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षण करत असते.

ज्येष्ठ कविवर्य अरुण म्हात्रे म्हणाले की, हा ग्रंथोत्सव कार्यक्रम इतका मोठा आहे मी महाराष्ट्रातील एक नंबरचा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी जात असतो त्या त्या ठिकाणी मराठी भाषा आपणाला समृध्द करते.  हसत मुख असलेली माणसे खूप चांगले काम करत असतात.  आपल्या जीवनाला  शब्दातून उर्जा मिळत असते.   त्यासाठी प्रत्येकाने अधिकाधिक शहाणे होण्यासाठी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत.  आपल सुंदर ह्दय अशा कार्यक्रमासाठी ठेवावे.

तर प्रा. विसुभाऊ बापट यांनी मराठीचे हाल थांबविण्यासाठी अशा ग्रंथोत्सवाचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.  मराठी ही सर्वात श्रेष्ठ भाषा असून तिचा दर्जा वाढावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.  त्यांनी आपल्या काव्य शैलीतून लोकांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व इशस्तवनाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धनावडे यांनी केले. तर आभार जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला विविध विभागाचे शासकीय अधिकारी,कर्मचारी, नागरिक, महिला,पत्रकार तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

000000

…2/-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here