रत्नागिरीला अनेकदा गेलो पण वेळेअभावी रत्नागिरी ‘बघता’ आलं नाही.यावेळेस मात्र थोडा वेळ होता त्यामुळं थिंबा पॅलेस,रत्नागिरीचा किल्ला आणि टिळकाचं जन्मस्थळ पाहता आलं.सोबत आमचे मित्र आणि रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष हेमंत वणजू होते.त्यामुळं माहितीची  अडचण आली नाही व  पर्यटन आणखी सोपं झालं.वणजू रत्नागिरीच्या माहितीचा खजिनाच आमच्यासमोर उलगडून दाखवत होते.रत्नागिरीत अनेक पर्यटन स्थळं आहेत मात्र तिथंपर्यत पर्यटक पोहोचतच नाहीत ही त्यांची खंत.मलाही असंच वाटतं निसर्गच जर बघायचाय तर खाली केरळ जाण्याची गरजच नाही.केरळच्या थोबाडीत मारतील अशी अनेक स्थळं कोकणात आहेत.मात्र आपल्याला फार तर गणपतीपुळे,मुरूड जंजिरा,हरिहरेश्‍वर,किल्ले रायगड यापेक्षा जास्त स्थळांची माहिती नाही.ती माहिती करून देण्याचा प्रयत्नही जाणीवपूर्वक झाला नाही.एमटीडीसी आणि पुरातत्व विभागाबद्दल न बोललेलंच बरं.उदासिन आणि निरूत्साही माणसं या विभागात भरलेली आहेत.त्यामुळं प्रयोग म्हणून या विभागात काहीच चालत नसल्यानं कोकणात ज्या पध्दतीनं आणि गतीनं पर्यटन वाढायला हवं होतं ते वाढलेलं नाही.हा विषय निघाला की,रस्ते ,दळणवळणाची साधनं नाहीत वगैरे रडगाणं गायलं जातं.ते हवंच पण ज्यााला निसर्गाचं वेड आहे ते पर्यटक यासर्वावर मात करून कोकणात यायला तयार आहेत पण त्याची माहिती तर पर्यटकांना हवी ना..त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.ते होत नाहीत.वणजू आणि माझं यावर एकमत होतं.वणजूंना एक उदाहरण मी सांगितलं.म्हटलं कोकणात अनेक शहरात चमकोगिरी करण्यासाठी पर्यटन महोत्सव साजरे केले जातात.गावातील माणसांनाच कोकणची महत्ती सांगितली जाते.हे चुकीचं आहे.कोकणात पाहण्यासारखं काय आहे ?,कोकणात तुम्ही का यावं? हे बाहेर जावून लोकांना सांगावं लागेल.तसं झालं तर नक्कीच फरक पडेल.हा प्रयोग माथेरानकरांनी केला होता.मुंबई,पुणे,औरंगाबादेत त्यांनी माथेरान महोत्सव साजरे केले.तिकडं येणार्‍या पर्यटकांची गर्दी नंतरच्या काळात वाढली.इतर शहरांनी माथेरानचं अनुकरण करायला हरकत नसावी.वणजू देखील या मतांशी सहमत दिसले.यात पत्रकारांचं योगदानही महत्वाचं ठरू शकतं.हल्ली फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवर दुरदुरचे मित्र असतात.त्यावर आपल्या भागातली एखादी पोस्ट टाकली गेली तर त्याचा पर्यटनवाढीसाठी नक्कीच फायदा मिळू शकतो.मुरूड जंजिरा,माथेरानमधील पत्रकारांचं यादृष्टीनं मोठं योगदान आहे हे विसरून चालणार नाही.त्यांनी आपल्या गावचं मार्केटिंग चांगलं केलेलं आहे.त्यामुळं ही गावं पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली .जंजिरा अंजिक्य आहे हे मान्य पण त्या तोडीची जलदुर्ग कोकणात कमी नाहीत.तिकडं कोणी जाात नाही.रत्नागिरीच्या किल्ल्याची रचना तर नजरेत भरावी अशीच आहे.तीन बाजुंनी समुद्र आणि समोर मोठा डोंगर यामुळं शत्रूंनी हल्ला करणे अशक्य.तसा प्रयत्न झाला तरी अनेक पळवाटा आहेत.किल्ल्यावरून दिसणारा समोरचा देखावा नजरेत भरावा,डोळ्यात साठवून ठेवावा असाच आहे.निळाशार,अथांग समुद्र,त्यात दिमाखात चालणार्‍या बोटी..व्वा व्वा क्या बात है.किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे.मंदिर ज्या पध्दतीनं साभाळलं गेलंय ते बघून वणजूंना मी म्हटलं,अहो तुमच्याकडं  पुरातत्व विभाग चांगलं काम करतोय असं म्हणावं लागेल.त्यावर त्यांनी सांगितलं,’किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात नसल्यानंच तो सुस्थितीत आहे.मंदिरही चांगलं राहिलं आहे.अन्यथा काही खरं नव्हतं’.त्यांच्या या वक्त्व्याचा प्रत्यय आम्ही लोकमान्य टिळकांचं जन्मस्थळ पाहण्यासाठी गेलो तेव्हा आलं.टिळक कुटुंबं चिखलगावचं .मात्र टिळकांचा जन्म रत्नागिरीतच झाला.खरं तर या स्मारकाचं जतन प्राणपणानं करायला हवं.तसं दिसत नाही.समोर असलेला एक बोर्ड नसता तर इथं स्मारक आहे हे देखील कळायला मार्ग नव्हता.इमारत जीर्ण झालीय.परिसर अस्वच्छ आहे.समोर टिळकांचा पूर्णाकृती पुतळा आहे पण तो ही धुळीनं माखलेला.केव्हा तरी घातलेला हार वाळून गेला तरी तो काढला गेलेला नाही.आतही रूक्ष चेहर्‍याचा पुरातत्व विभागाचा एक कर्मचारी बसलेला.गेल्या गेल्या तंबी दिली गेली ‘फोटो काढायचा नाही’.आदेशानुसार आम्ही मोबाईल मॅन केले.मला हे कळत नाही की,असं काय गुपित बाहेर जाणार आहे फोटो काढल्यानं.केसरीचा पहिला अंक तिथं दिसला.त्याचा फोटो मला घ्यायचं होता.नाही घेता आला.घराच्या मागं टिळकांची भली मोठी वाडी आहे.पण तिची अवस्थाही रया गेल्या सारखी आहे.नारळाची,फणसाची उंचच उंच झाडं आपली वैभवाचे दिवस केव्हाच संपल्याचं सांगत असतात. याचं सोयरसुतक कोणाला नाही.’टिळकांच्या जन्मस्थळाकडं’ असा बोर्डही मला कुठं दिसला नाही.दुःख झाले .कोकणानं देशाला गवसणी घालणारे अनेक महापुरूष दिले.कोकण तर पत्रकारितेची पंढरीच.मराठी पत्रकारितेचे जऩक बाळशास्त्री जांभेकर,हिंदी पत्रकारितेतीली महर्षी बाबुराव पराडकर कोकणातले,काळकर्ते शि.म.परांजपे किंवा जांभेकरांबरोबर पत्रकारिता केलेले भाऊ महाजन हे कोकणातले होत.या महान पत्रकारांचं स्मारक कोकणात अजून झालेली नाहीत.इतरांच्या बाबतीत हीच उपेक्षा आहे.असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांची देखील अशीच उपेक्षा केली जात आहे.इथं चांगलं स्मारक झालं तर पर्यटनाला नक्कीच त्यामुळं चालना मिळेल.टिळकांसाठी नाही पर्यटन वाढीसाठी तरी टिळकांचं भव्य स्मारक ते जिथं जन्मले त्या मातीत झालं पाहिजे.लोकमान्य टिळक मोठे पत्रकार होते.तेव्हा त्यांच्या स्मारकासाठी आता पत्रकारांनी पुढाकार घ्यायला हरकत नाही.

रत्नागिरीत एवढे सुंदर समुद्र किनारे आहेत की,ते पाहून डोळ्याचे पांग फिटावेत.उंचच उंच नारळी-पोफळीच्या बागा  आणि गर्द झाडीतून जाणारे वळणाचे रस्ते पाहताना आपण स्वप्नात तर नाही असं वाटायला लागतं.दुर्देव असं की,हे बहुतेक पर्यटकांना माहितच नाही.पर्यटक गणपतीपुळ्याला येतात,गणरायाचं दर्शन घेतात आणि थोडावेळ तेथील समुद्रावर रेंगाळून एक दिवसात परत जातात.एक-दाोन दिवसासाठी कोकणात यावं आणि नंतर निघून जावं असं कोकण नाही.कोकणाचं वैभव पाहण्यासाठी आठ दिवसही कमी पडतील.पण तसे होत नाही . गणपतीपुळे येथील समुद्र किनार्‍यापेक्षाही आरे-वारेचा किनारा एवढा सुंदर आहे की,तो पाहून आपण एखादं चित्रं तर पहात नाही ना असा भास होतो.गणपतीपुळ्याला पाय ठेवायला जागा नसते.तेथून अगदी दहा किलो मिटर अंतरावर असलेल्या आरे-वारेला मात्र दहा पर्यटकी नसतात.चूक त्यांची नाही तर व्यवस्थेची आहे.कारण ‘इकडं या,इकडचं निसर्ग पाहा’ हे पर्यटकांना सांगणारं कोणी नसतं.कोकणाला निसर्गानं भरभरून दिलंय.मात्र आपण एवढे कर्मदरिद्री आहोत की,ते लोकांना दाखवत नाही.पर्यटन व्यवसाय जर बहारला तर कोकणात केमिकल झोन होऊ दिला जाणार नाही ही देखील एक भिती ही सारी चांगली स्थळं गुप्त ठेवण्यामागं असू शकते.रायगडात  शेकडो केमिकल कंपन्या आहेत.इथंल्या नद्या प्रदूषीत झाल्या आहेत आणि हवाही दूषित बनली आहे.भांडवलदारांची नजर आता रत्नागिरीवर आहे.पर्यटन व्यवसायाला जालना देऊन त्यांना रोखता येईल.सरकार आणि भांडवलदारांची मिलीभगत असल्यानं हे अवघड असलं तरी ते रत्नागिरीच्या पत्रकारांना,तेथील तरूणांना,कोकणचं कोकणपण टिकलं पाहिजे असं वाटणार्‍या प्रत्येकाला करावं लागेल.नव्या पिढीतले तरूण कोकणात रमत  नाहीत.आंब्याच्या नवीन बागा बर्‍याच दिसत असल्या तरी तरूण पिढीला मुंबईचं आकर्षण आहे.मच्छिव्यवसायातही मोठा नफा आहे पण त्याचंही तरूणांना महत्व वाटेनासं झालंय.आंबा आणि मच्ची हे दोन मोठे व्यवसाय होऊ शकातातक,त्यातून मोठा रोजगार उभा राहू शकतो पण त्याकडंही कोणाचं लक्ष नसल्यानं हे व्यवसायही ढेपाळले आहेत.म्हणजे सारं काही असूनही हाती काहीच नाही अशीच आजही कोकणची स्थिती आहे.वणजू यांच्यासारखे संवेदनशील पत्रकार यावर काही करू इच्छितात.त्यांना नक्कीच रत्नागिरीकर जनतेनं साथ दिली पाहिजे.कोकण सुंदर आहे,सुरेख आहे पण त्याची वाटचाल उजेड होण्याकडं सुरू आहे.ती रोखण्याची जबाबदारी अर्थातच स्थानिकांची आहे..येवा कोकण आपलाच असा असं उपहासाने म्हटलं जातं.कोकण बळकावयाला निघालेल्या लोकंसाठी ही म्हण आहे.मात्र पर्यटकांना कोकण आपला आहे असं वाटलं पाहिजे.त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.कोकण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.माझ्या जन्मभूमी एवढंच माझ्या कर्मभूमीवरही माझं प्रेम आहे.त्यामुळं कोकणाचे कोणी लचके तोडतंय,कुणी त्याची उपेक्षा करतंय असं जेव्हा दिसतं तेव्हा कोकणा माणसाएवढाच संताप मलाही येतो.कारण कोकणचं हे वैभव टिकलं पाहिजे,ते धनदांडग्याच्या हाती लागू देता काणा नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं.त्यासाठी माझी तळमळ असते.त्या अर्थानं ही कोरडी तळमळ असली तरी ती प्रामाणिक आहे हे नक्की.

( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here