का होऊ दिला गेला नाही म्हसळ्यात ‘जंजीरा मुक्ती दिन’ ?

0
1056
 नबाबकालीन मानसिकतेतूनच मुक्त करण्याची गरज 

जंजीरा मुक्ती दिनाचा 67 वा वर्धापन दिन काल श्रीवर्धन आणि मुरूड येथे उत्साहात साजरा झाला.म्हसळ्यात मात्र नबाबकालीन मानसिकतेत जखडून पडलेल्या काही  मंडळींनी मुक्ती दिन साजरा करू दिला  नाही.म्हसळा नगरपालिकेत हा कार्यक्रम होणार होता.नगराध्यक्षांसह नगरपालिकेने परवा  रात्री नऊपर्यंत तयारी केली होती.मात्र अचानक सूत्रं फिरली .  नगराध्यक्षांनी स्थानिक पत्रकारांना फोन करून हा कार्यक्रम नगरपालिकेत होणार नसल्याचं कळविलं.सर्वानांच धक्का बसला.असं का झालं? याच्या कारणांची चौकशी केली तेव्हा ‘जंजीरा मुक्ती’ या शब्दाला काही लोकांनी आक्षेप घेतल्याचं सांगितलं गेलं.राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अली कौचाली यांनी श्रीवर्धन येथील कार्यक्रमात ते बोलूनही दाखविलं.त्याचं म्हणंणं ‘आम्ही गुलामीत नव्हतो.त्यामुळं मुक्तीचा प्रश्‍न येत नाही‘.शिवाय मुरूडचा नबाब स्वखुषीने भारतात विलीन झाल्यानं ‘मुरूड विलीन दिन ‘असा शब्द प्रयोग करावा असां त्यांचा आग्रह होता.मुळात नबाब स्वखुषीनं विलीन झाला हे पूर्णतः असत्य आहे. नबाबाला स्वखुषीनं जर स्वतंत्र भारतात विलीन व्हायचं होतं तर नबाब 31 जानेवारी 1948 पर्यंत म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतरही साडेपाच महिने कश्याची वाट बघत होता?.देश स्वतंत्र होत असतानाच बहुतेक संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन झाली होती.अपवाद जम्मू-कश्मीर,जुनागड,हैदराबाद आणि जंजीरा संस्थानचा होता.यातील बहुतेक संस्थानं भारतात विलीन व्हायला तयार नव्हती.जंजीर्‍याच्या नबाबाला पाकिस्तानात जायचं होतं त्यादृष्टीने त्याच्या हालचाली सुरू होत्या असा उल्लेख रायगड गॅझेटमध्ये सापडतो.स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी राजाच्या विरोधात उठाव केला.प्रजा परिषदेच्या नेतृत्वाखाली हजारो लोकशाही प्रेमी 26 जानेवारी रोजी म्हसळ्यानजिक खामगावला जमा झाले.तेथून त्यांनी म्हसळ्याकडं कूच केली.स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या या हालचालींची खबर नबाबाला लागली तेव्हा त्यानं 1000 लष्करी जवानांची पलटण म्हसळ्यास पाठविली होती.मात्र स्वातंत्र्यप्रेमींची संख्या आणि तयारी त्यांच्यापेक्षा किती तरी पटीनं जास्त होती आणि म्हसळ गावातीलही  अनकेजण उठाववाल्यांचे समर्थनार्थ रस्त्यावर येण्याच्या तयारीत होते..हे वास्तव जेव्हा म्हसळ्याच्या मामलेदाराच्या ध्यानात आलं तेव्हा त्यानं संघर्ष न करताच पांढरं निशाण फडकविलं.नंतर ही बातमी श्रीवर्धनला पोहोचली.स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या रेट्यापुढंं श्रीवर्धनचा मामलेदारही गर्भगळीत झाला.श्रीवर्धनही स्वातंत्र्य सैनिकांच्या हाती आले होते.आता ह्ल्ला होणार होता तो नबाबाची राजधानी असलेल्या मुरूडव. े.तश्या तारा वल्लभभाई पटेल,तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि नबाबालाही पाठविल्याचे उल्लेख कागदपत्रात सापडतात.’म्हसळा,श्रीवर्धन मुक्त,उद्या स्वारी मुरूड जंजीर्‍यावर’ असा मजकूर त्या तारांमध्ये होता.तार वाचून नबाब गर्भगळीत झाला..31 जानेवारीला नबाब मुंबईला गेला.बाळासाहेब खेरांची भेट घेऊन त्यानं “सामिलनाम्यावर स्वाक्षरी करायला तयार आहे,’मुरूडवरील हल्ला  थांबवा ’अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.नबाबानं सामिलनाम्यावर स्वाक्षरी केली.त्यानंतर तीन-चार दिवस नानासाहेबांनी मुरूडचे पंतप्रधान म्हणून काम पाहिल्याचेही उल्लेख आहेत. हा सारा  तपशील आणि संदर्भ पाहिले असता नबाब स्वखुषीनं विलीन झाला हे म्हणणे  म्हणजे इतिहासाचीच मोडतोड करून सोयीचा अर्थ काढण्यासारखं आहे.स्वातंत्र्यप्रेमी जनतेनं उठाव केला नसता तर नबाबानं सामिलनाम्यावर स्वाक्षरी केलीच नसती.देश स्वतंत्र् झाल्यानंतर साडेपाच महिने जो राजा सामिल व्हायला टाळाटाळ करीत होता त्या राजाला साडेपाच महिन्यानंतर उपरती झाली आणि तो लोकशाहीप्रेमी बनला हे म्हणणे म्हणजे सत्याचा अपलाप आहे. सारं गोडीगुलाबीनं आणि खुषी- खुषी घडलं हे म्हणणं कोणीच मान्य करणार नाही.किमान तत्कालिन कागदपत्रावरून तरी तसे काहीच दिसत नाही.जंजीरा संस्थानमधील प्रजा गुलाम नव्हती त्यामुळं त्यांना मुक्ती मिळण्याचं कारण नाही हा युक्तीवादही तकलादू आहे.कारण राजेशाही म्हणजेच गुलामगिरी.राजेशाहीत जनतेला कोणतेही अधिकार नसतात.’राजा बोले प्रजा डोले’ अशी स्थिती असते.त्यामुळे संस्थानातील प्रजेची अवस्था गुलामापेक्षा कमी नसते.असे नसते तर मग हैदराबाद संस्थानातील जनतेलाही राजाच्या विरोधात उठाव कऱण्याची गरजच नव्हती.हैदराबादेत निजामानं जनतेचा आवाज वर्षानुवर्षे बंदच करून टाकला होता,त्याविरोधात जनता रस्त्यावर आली.जंजीर्‍यातही जनेतला उठाव करावा लागला याची कारणंही कमी अधिक प्रमाणात अशीच आहेत.जंजीरा मुक्ती लढ्याचं नेतृत्व जरी नानासाहेब पुरोहित,मोहन धारिया या बाहेरच्या म्हणजे महाडच्या नेत्यांनी केले असले तरी संस्थानातील जनता या उठावात मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती.ती राजेशाही नको म्हणूनच.  या वास्तवाकडंही दुर्लक्ष करता येणार नाही.त्यात नबाबाचे काही मित्रही होते.म्हणजे जनतेला राजेशाही मान्य नव्हती आणि राजा गादी सोडायला तयार नव्हता अशा स्थितीत उठाव झाला आणि जनतेनं मुक्ती मिळविली.हे सत्य आहे.जनरेट्यापुढं राजाचा नाईलाज झाल्यानं संघर्ष झाला नाही आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता हे स्वातंत्र्य मिळालं.पण ते राजानं स्वखुषीनं दिलंय असं नक्कीच नाही.त्यासाठी उठावाची तयारी 1046 पासून सुरू होती.यातलं एक सत्य मात्र मान्य करावं लागेल.ते म्हणजे, हैदराबादचा निजाम जसा पाताळयंत्री होता तशी जंजीर्‍याच्या नबाबाची स्थिती नव्हती.नबाब बराच पुरोगामी होता.संस्थानात त्यानं शिक्षणाच्या सोयी केल्या,आरोग्याची व्यवस्था केली होती,गारंबी सारखी पाणी पुरवठा व्यवस्था केली होती,वनरक्षण केलं होतं.त्याच्या काळात हिंदु-मुस्लिम दंगे झाल्याचाही इतिहास नाही.हे सारं खरं असलं तरी शेवटी तो राजा होता हे वास्तव दुर्लक्षिता येत नाही.

गांधी हत्येच्या पार्श्‍वभूमीवर मुरूड जंजीरा स्वतंत्र झालेला असल्यानं हा लढा झाकोळून गेला.इतिहासानंही त्याची फारशी दखल घेतली नाही.परिणामतः हा सारा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचलाच नाही.मुक्ती शब्दाला आक्षेप घेणार्‍यांपैकी  किती लोकांनी हा इतिहास वाचलाय हे देखील सांगता येणार नाही.त्यामुळे हा सारा तेजस्वी इतिहास नव्या पिढीपर्यंत  पोहोचावा यासाठी रायगड प्रेस क्बबनं 2005 पासून जंजीरा मुक्ती दिन साजरा करायला सुरूवात केली.गेली दहा वर्षे हे कार्यक्रम मुरूड,श्रीवर्धनमध्ये होत होते.तेथे कधी कोणी नकारघंटा वाजविली नाही.यंदा म्हसळ्यातील पत्रकारांनीही तो साजरा करण्याचे ठरविले.तेव्हा काहींना ठसका लागला.वस्तुतः कार्यक्रमाच्या तयारीसाठी अगोदर एक-दोन बैठकाही झाल्या होत्या.स्वतः नगराध्यक्षांचीही सुरूवातीला काही आक्षेप नव्हता. मात्र रात्री धामिक वादाचे पिल्लू सोडले आणि नगरपालिकेनं हा कार्यक्रम अचानक रद्द केल्याने पत्रकारांची अडचण  झाली.यातला विरोधाभास असा की,म्हसळा नगरपंचायत राष्ट्रवादीची आहे.राष्ट्रवादीचे युवा नेते अनिकेत तटकरे श्रीवर्धऩमधील प्रेस क्बच्या कार्यक्रमास उपस्थित होते.आणि म्हसळ्यात त्यांच्याच पक्षाचे नगराध्यक्ष या कार्यक्रमापासून पळ काढत होते.गेली दहा वर्षे या कार्यक्रमापासून राजकीय पक्षांचे नेते दूरच होते.यंदा मात्र अनिकेत तटकरे श्रीवर्धनमध्ये आणि मुरूडमध्ये नगराध्यक्ष उपस्थित होते.त्यांच्याच हस्ते ध्वजारोहणही झाले.मात्र म्हसळयात काहींनी या कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.तो चुकीचा होता.म्हसळा अजूनही नबाबकालीन मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालेलं नाही असा याचा अर्थ काढता येऊ शकेल.जंजीरा मुक्ती दिनाचा हा कार्यक्रम शासकीय पातळीवर साजरा केला जावा अशी रायगडच्या पत्रकारांची मागणी आहे.ते होत नाही.पुढील वर्षी मुरूड नगरपालिका हा कार्यक्रम साजरा केरेल अशी घोषणा मुरूडच्या नगराध्यक्षांनी केली आहे.तो शुभसंकेत आहे.पत्रकारांनी सतत दहा वर्षे सुरू ठेवलेल्या उपक्रमाचं हे फलित आहे असंही म्हणता येईल.या कार्यक्रमात राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावं अशी पत्रकारांची इच्छा आहे.हा कार्यक्रम केवळ पत्रकारांचा न राहाता तो लोकांचा झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.-शिवाय जंजीरा मुक्ती लढ्याला जातीय किंवा धार्मिक रंग देणं हे देखील या लढ्यातील वीरांचा अपमान करण्यासारखं आहे हे सर्व संबंधितांनी लक्षात घेतलं पाहिजे.

 एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here