कायद्याची माहिती लोकांना करून द्यावी लागेल.

0
1093

एप्रिलमध्ये 11 पत्रकारांवर हल्ले, कायद्याची माहिती लोकांना करून द्यावी लागेल.

‘कायदा झाला तरी पत्रकारांवरील हल्ले सुरूच आहेत’ अशी एक पोस्ट सोशल मिडियावर फिरते आहे.’कायदा होऊन काही उपयोग नाही’ असे वातावरण तयार करण्याचा या पोस्टचा हेतू आहे.तो चुकीचा आणि राज्यातील पत्रकारांनी कायद्यासाठी जो बारा वर्षे लढा दिला त्याचीच उपेक्षा कऱणारा आहे.कायदा झाला म्हणजे शंभर टक्के हल्ले थांबतील असं कोणीच म्हटलेलं नव्हतं.ते शक्यही नसतं.खून केल्यावर फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होते हे माहित असूनही खून होत राहतात.त्यामुळं पत्रकारांवरील हल्ले शंभर टक्के बंद होणार नाहीतच.पण कायद्यानं वचक नक्की बसेल.मात्र त्यासाठी सोशल मिडिया आणि अन्य माध्यमातून हा कायदा लोकांपर्यंत पोहोचवा लागेल.कायद्याचं गांभीर्य ,कायद्यामुळं होणारी शिक्षा यागोष्टी लोकांना सांगाव्या लागतील.’पत्रकारांवरचा हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा आहे आणि पत्रकारावर हात टाकाल तर चार-दोन दिवस तरी सरकारी पाहुणचार घ्यावा लागेल हे वास्तव हजारदा लोकांना सांगावं लागेल.तरच या कायद्याची भिती लोकांमध्ये निर्माण होईल.आपण तसं करीत नाही आहोत.कायद्यातील पळवाटाच लोकांना दाखवित निघालो आहोत.लोक वेडे नाहीत त्यांनाही पळवाटा दिसतात हे जरी खरं असलं तरी आपण त्या बोंबलून सांगण्याची गरज नाही.शिवाय कायदा होणं आणि हल्ले वाढणं हा केवळ योगायोग आहे.याचं कारण कायदा झाला हेच आणखी अनेकांना माहिती नाही.त्यासाठी प्रचार अधिक गतीमान करावा लागणार आहे.तो होत नाही म्हणून या महिन्यात तब्बल अकरा पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.मात्र आता कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून गडचिरोलीतील एका प्रकरणात नव्या कायद्ायनुसार गुन्हा दाखल झाला आहे.ही बातमी देखील जोरदारपणे फिरवावी लागणार आहे.तसं होत नसल्यानं सारी अडचण आहे.तेव्हा थोडा प्रचार आणि थोडा वेळ जावू द्यावा लागणार आहे.काल कायदा झाला आणि आज हल्ले थांबले,असं होत नाही.शिवाय हल्ले थांबत नाहीत म्हणून कायद्याची मागणी करणारे किंवा कायदा करणारेच त्याला जबाबदार आहेत हा दृष्टीकोनही पूर्वग्रहदूषीत आहे.कायदा झाला त्यादिवशी पत्रकारांनी राज्यात दिवाळी साजरी केली,तसंच चार-चौघांनी दुखवटाही साजरा केला.कायदा झाल्यानं जे प्राणी दुःखी आहेत त्यांनी सावकाश कुथत बसावं.आम्हाला खात्री आणि विश्‍वास आहे की,कायद्याची माहिती जशी जशी जनतेला होईल तस तसे हल्ले कमी होतील.नक्कीच कमी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here