नांदेड / हिंगोली  राज्य सरकारने जाचक अटी लादून जाहिरात धोरणात बदलाचा घाट रचला असून यामुळे छोट्या आणि मध्यम मराठी वृत्तपत्रांना मोठा फटका बसणार आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीची वज्रमुठ करून लढा उभारण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ येथे होणाऱ्या राज्यव्यापी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव तथा दैनिक सामनाचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
 
या मेळाव्यात मराठी पत्रकार परिषदेच्या महासंपर्क अभियानाचा शुभारंभ आणि महाराष्ट्रातील 50 वर्ष पूर्ण झालेल्या वर्तमानपत्राचा गौरव देखील करण्यात येणार आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विजय जोशी यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार छोट्या आणि मध्यम वर्तमानपत्रांच्या मुळावर उठले आहे. अतिशय तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या निर्णयामुळे फटका बसणार आहे. जाहिरात धोरणात बदल करून छोटी व मध्यम वृत्तपत्रे बंद करण्याचा कुटील डाव सरकारकडून सुरू झाला असून हा प्रकार हाणून पाडण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने आवाज उठविला आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, सरचिटणीस अनिल महाजन आणि सर्वच पदाधिकारी लढा देत आहेत. सरकारच्या या जुलमी निर्णयाविरुद्ध वज्रमुठ आवळण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने 1 सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ येथील भक्त निवासामध्ये छोट्या व मध्यम वर्तमानपत्रांच्या संपादक व मालकांचा राज्यव्यापी मेळावा आयोजित केला आहे.
 
या मेळाव्यामध्ये सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी पुढील रणनीती ठरविली जाणार असून एस.एम. देशमुख यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या राज्यव्यापी मेळाव्याला महाराष्ट्रासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून सर्व संपादक विशेष करून नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी येथील जिल्हा पत्रकार संघाचेपदाधिकारी, महानगर पत्रकार संघ पदाधिकारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव तथा दैनिक सामनाचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी केले आहे. औंढा नागनाथ येथील निवास व्यवस्था व अन्य माहितीसाठी परिषदेचे उपाध्यक्ष विजय दगडू आणि हिंगोली जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही जोशी यांनी या प्रसिद्ध पत्रकात केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here