एक चळवळ थांबली..
शशिकांत गेल्याची बातमी एखादया बंदुकीच्या गोळी प्रमाणे अंगावर येऊन आदळली.स्वाभाविकपणे अस्वस्थ झालो.शशिकांत केवळ चळवळीला मदत करणारा कार्यकर्ताच नव्हता तर तोच एक चळवळ होता.लोकांसाठी रात्र – दिवसाचा विचार न करता पळणारा हा पत्रकार अकाली गेला.आमच्या चळवळीचं मोठं नुकसान झालं यात शंकाच नाही.मुंबईत जे मित्र आहेत त्यापैकी हक्कानं हाक मारावी अशा मोजक्या मित्रात शशिकांतचा नंबर होता.भेटलोत की,चर्चा चळवळींचीच व्हायची.तो आजारी आहे,त्याचं कुटुंब उघडयावर पडलंय ,त्याला मदत झाली पाहिजे असा चर्चेचा सूर असायचा.शशिकांत केवळ चर्चा करणारा बोलका सुधारक नव्हता.करून दाखविणारा होता.अनेकांना त्यानं मदत केली.दुर्दैवं असं की,त्याच्यावर वेळ आली तेव्हा आम्ही काहीच करू शकलो नाहीत.व्यक्तिगत आयुष्यावर शशिकांत कधीच बोलायचा नाही.तब्येत कशी आहे ? असं विचारलं तर सांगायचा आता ठिक आहे.त्यामुळं शशिचा आजार एवढया थराला गेलाय ते कळलंच नाही.परवा विनोदचा फोन आला तेव्हा धक्का बसला.शशी कोमात असल्याचं त्यांनी सांगितलं.तेव्हा मी रत्नागिरीला होतो.लगेच येऊन भेटणं शक्य नव्हतं.काल परत आलो आणि आज ही बातमी आली.महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात भटकंती सुरू असल्यानं गेला दीड महिना मुंबईस येणंच झालेलं नाही.त्यामुळं शशिकांतला भेटायचं मात्र राहून गेलं.एक दोन वेळा फोन केला मात्र त्यानं तो घेतला नसल्यानं बोलणंही झालं नाही.ही रूखरूख कायमची लागून राहणार.शशिकांत चळवळीशी नातं सांगणारा पत्रकार होता.- मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहिलेले सांडभोर मराठी पत्रकार परिषदेचे खंदे समर्थक होते.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन झाल्यानंतर समितीच्या प्रत्येक आंदोलनात एक बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचा सहभाग असायचा.2 ऑक्टोबर 16 रोजी मुंबईत गांधी पुतळ्यासमोर झालेले आंदोलन हे त्यांचे शेवटचे आंदोलन ठरले.टीव्ही जर्नालिस्ट ,विशेषतः टीव्ही छायाचित्रकार हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.त्यांच्या सुख- दुःखात सांडभोर घरच्या माणसाएवढे समरस व्हायचे.त्यातून त्यांनी अनेक जिव्हाळ्याचे मित्र कमविले होते.ते बाहेर पडले तरी चार दोन मित्र त्यांच्या समवेत असायचे,एवढा हा माणसातला माणूस होता. टीव्हीच्या झगमगत्या दुनियेत वावरूनही जमिनीवर पाय ठेऊन काम करणार्या शशिकांतची अकाली एक्झीट सर्वांनाच सुन्न करणारी आहे.पत्रकारांच्या वाटयाला येणारे भोग हे जगाला माहिती नाहीत.स्वाभिमानामुळं आपल्या व्यथा जगासमोर मांडायलाही आम्हाला लाज वाटते.त्यामुळं गरज भासते तेव्हा कोणीच जवळ नसते.प्रकृत्ती साथ देत नव्हती,आर्थिक ओढाताण सुरू होती,त्यामुळं एका मानसिक तणावात शशिकांत होता.मात्र स्वभावामुळं तो हे कोणाला बोलला नाही.शांतपणे निघून गेला.एका पत्रकार मित्राचं असं जाणं नक्कीच चटका लावणारं ठरलं आहे.शशिकांत सांडभोर यांना विनम्र श्रध्दांजली..–