आम्ही आमच्यासाठी उपक्रम महाराष्ट्रभर राबविणार :एस.एम.देशमुख

वालचंदनगर : सरकार पत्रकारांबरोबर नाही, समाज पत्रकारांची काळजी घेत नाही आणि ज्या माध्यम समुहासाठी आपण काम करतो ते देखील फक्त आपल्याला वापरून घेतात अशा स्थितीत संघटीत होऊन आपणच आपल्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर निधी उभा करून मदतीचा हात देण्याची योजना राज्यभर राबविण्याचा मानस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी वालचंदनगर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला..
महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या इंदापूर तालुका शाखेचा उद्घाटन सोहळा काल एस.एम.देशमुख यांच्या प़मुख उपस्थितीत पार पडला.. त्यावेळेस देशमुख बोलत होते..
एस. एम. पुढे म्हणाले, पत्रकार आजारी पडला, एखाद्या पत्रकाराचे निधन झाले तर कुटुंब रस्त्यावर येते.. पत्रकारांकडून शंभर अपेक्षा करणारा समाज पत्रकार अडचणीत येतो तेव्हा त्याकडे ढुंकूनही बघत नाही.. अशा स्थितीत पत्रकारांनी पुढे येत अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवास मदत केली पाहिजे.. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पत्रकार मदत निधी उभारून त्यातून पत्रकारांना मदत केली पाहिजे.. असे प़योग राज्यातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू झाले ही आनंदाची गोष्ट असली तरी सर्वच तालुक्यात आम्ही आमच्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले..
येणारा काळ वेब जर्नालिझमचा आहे हे गृहित धरून या माध्यमातील पत्रकारांनी तंत्रज्ञानाच्यादृष्टीने परिपूर्ण असले पाहिजे असे मत व्यक्त करून लवकरच वेब मिडियात काम करणारया शंभर पत्रकारांसाठी वालचंदनगर येथे एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.. मध्य प्रदेश सरकारने विमा योजना राबवताना वेब मिडियातील पत्रकारांचा देखील त्यात समावेश केला आहे त्याचे स्वागत करून देशमुख म्हणाले महाराष्ट्र सरकारने देखील वेब मिडियाला जाहिराती, अधिस्वीकृती आणि अन्य सवलती उपलब करून द्याव्यात अशी आग़ही मागणी त्यांनी केली..
प्रारंभी सतीश सांगळे यांनी प्रास्ताविक केले, राजकुमार थोरात यांनी स्वागत केले.. यावेळी सोशल मिडिया परिषदेचे राज्य प़मुख बापुसाहेब गोरे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, सोशल मिडियाचे जिल्हा प़मुख जनार्दन दांडगे, ज्येष्ठ पत्रकार विकास शहा, तेरवाडकर आदिंची भाषणं झाली.. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील जगताप उपस्थित होते.. इंदापूर तालुका सोशल मीडिया सेलचे प़मुख म्हणून राहूल ढवळे यांची नेमणूक करण्यात आली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here