आभाळच फाटलंय..एका स्वातंत्र्य सैनिकाच्या वयोवृद्ध विधवेची परवड———————————————————–

-देश स्वतंत्र झाला.. 75 वर्षे होत आले त्या गोष्टीला.. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे लढले त्यातील बहुतेक स्वातंत्र्य सैनिकही आता आपणास सोडून गेले.. जे स्वातंत्र्य सैनिक हयात आहेत किंवा ज्यांच्या विधवा पत्नी हयात आहेत त्यांची अवस्था कशी आणि काय आहे ? याचं स्मरण कोणालाच नाही.. सरकारला नाही, लोकप्रतिनिधींना नाही, वरिष्ठ बाबूंना नाही.. त्यांना पेन्शन तर मिळतंय पण तेवढं पुरेसं आहे का? अनेक स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी एकाकी, असहाय्य जीवन जगताना दिसताहेत.. अनेकांची परवड सुरूय.. हालअपेष्टा सुरू आहेत.. ना सरकार, ना समाज त्यांच्या बरोबर आहे, ना आप्तेष्ट..माजलगावच्या पार्वतीबाई मुळे यांची कहाणी अशीच डोळ्याच्या कडा ओल्या करणारी. .. पार्वतीबाई आज जवळपास 90 वर्षांच्या आहेत.. शंकरराव मुळे हे त्यांचे पती स्वातंत्र्य सैनिक होते.. हैदराबाद मुक्ती लढयात त्यांनी मर्दुमकी गाजविली.. मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन सुरू झालं..पण ते लवकर गेले.. . एक मुलगी, दोन मुलं मागे ठेवून. .. पत्नी पार्वतीबाई यांनी मिळणारी पेन्शन आणि लोकांची भांडी करीत मुलांना सांभाळलं.. वाढवलं.. मुलीचं लग्न केलं.. मात्र काही दिवसातच मुलीचा पती गेल्यानं मुलगी आपल्या मुलीला घेऊन माहेरी माजलगावी आली..एवढ्यावर दुर्दैव पिच्छा सोडत नव्हतं.. एका आजारानं मुलीची मुलगी म्हणजे पारवतीबाईंची नात गेली.. जी मुलं छोटा मोठा व्यवसाय करून आईला हातभार लावत होती त्यातील छोटा मुलगा तीन वर्षांपुर्वी गेला आणि त्याच्या पाठोपाठ मोठा मुलगाही कॅन्सरनं गेला..वर्षभरात दोन्ही मुलं गेली.. आता राहिल्या माय लेकी..आभाळच फाटलं.. ना कोणाची मदत.. ना कोणाचा आधार.. अशा स्थितीत माय लेकी परस्परांना आधार देत मिळणारया पेन्शनवर दिवस काढत होत्या.. मात्र नियती एवढी क्रूर की, काही दिवसाच्या अंतरानं घरातील चार पाच जणांचे मृत्यू घेऊनही तिचं समाधान झालं नाही..नियतीनं या घरावर आणखी एक आघात केला.. परवा पार्वतीबाई अचानक घरातच कोसळल्या.. पायाचं हाडं मोडलं.. अगोदर नियतीचे एवढे घाव बसलेले की,.. शरीर अर्ध देखील उरलेलं नाही.. अगदी 25 किलोचं देखील वजन नाही.. पडल्यानंतर दवाखान्यात न्यायचं पण कोण नेणार, कसं नेणार? ज्यांच्याकडे काही उरलेलं नाही त्यांना कोण मदत करणार? हाड मोडलेल्या स्थितीत असहय वेदनांनी तळमळत पार्वतीबाईंनी एक रात्र घरातच काढली.. दुसरया दिवशी ही बातमी माजलगावचे पत्रकार सुभाष नाकलगावकर, हरिष यादव, दिलीप झगडे यांना कळली.. ते मदतीला धावून आले.. त्यांनी पार्वतीबाई यांना रूग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची सर्व व्यवस्था केली. अगोदर श्रेयस देशपांडे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.. तेथे काही तपासण्या झाल्यानंतर पार्वतीबाई यांना हाडाचे डॉक्टर परतूरकर यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.. तेथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.. दहा दिवस हॉस्पिटलमध्ये मुक्काम होता.. या काळात एकटी मुलगी दिवस – रात्र त्यांच्या जवळ बसून होती.. काल त्यांना डिस्चार्ज मिळाला..त्यांना घरी आणण्याची व्यवस्था देखील पत्रकार मित्रांनीच केली.. डॉ. देशपांडे आणि डॉ. परतूरकर यांनी पार्वतीबाई यांना मोठेच सहकार्य केले.. वैद्यकीय क्षेत्रातही काही संवेदनशील लोक आहेत ही आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.. डॉ. परतूरकर आणि डॉ. देशपांडे यांचे आभार..पत्रकार मित्र हरिष यादव, सुभाष नाकलगावकर, दिलीप झगडे नसते तर एका अभागी स्वातंत्र्य सैनिकांच्या वयोवृद्ध पत्नीचं काय झालं असतं सांगता येत नाही.. समाज फारच practical झालाय. ..मदत करताना पण व्यवहार बघतो.. समोरची व्यक्ती कधी आपल्या मदतीला येणार असेल तरच मदत केली जाते.. दोन अभागी, एकाकी महिला कोणाला काय मदत करणार? म्हणून नातेवाईक दूर राहिले.. . आपण गेलोत तर आपल्याला झळ बसेल याची भिती सर्वांना होती.. त्यामुळं ना त्यांना कोणी भेटायला आलं ना त्यांची ख्याली खुषाली कोणी विचारली..आजही माजलगाव मधील एका भाड्याच्या खोलीत 90 वर्षांची आई आणि 60 वर्षांची मुलगी दोघी एकमेकांना शाब्दिक बळ देत दिवस काढत आहेत.. दूरदूरवर आशेचं किरण कुठं नजरेत नाही..वर्तमान आणि भविष्यातही दिसतो आहे तो काळोख आणि काळोखच.. खरी परीक्षा पुढेच आहे.. आई गेल्यानंतर मुलीचं काय होणार? कारण आई गेली की स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन बंद होणार आहे.. कोणाचा आधार नाही, स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळालेल्या जमिनीवर कोणी गावगुंडानं ताबा केलेला आहे.. सारंच अनिश्चित..अंध:कारमय.. नियती एखाद्याचा किती टोकाचा अंत पाहू शकते.. याचं ऊदाहरण म्हणून पार्वतीबाईमकडे पाहता येईल.. सरकारला, स्वातंत्र्यसैनिक बोर्डाला विनंती आहे की, राज्यात किती स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पत्नी हयात आहेत त्यांची माहिती घेऊन त्यांची अखेरच्या दिवसात काळजी घेण्याची, त्यांना मायेची ऊब देण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावा.. जेणे करून त्यांचं उर्वरीत आयुष्य तरी सुसह्य होईल.. देशासाठी ज्यांनी सर्वस्व दिलं त्यांचा तेवढा तर हक्क नक्कीच आहे.. माजलगावच्या तहसिलदारांनी देखील या स्टोरीची दखल घेऊन पार्वतीबाई यांच्यावरील उपचाराची व्यवस्था करावी.. हे होणार नसेल तर माजलगाव च्या पत्रकारांनी त्याचा पाठपुरावा करावा.. ही विनंती..देशासाठी संसाराची होळी करणारयांची काळजी सरकारनं, घेतलीच पाहिजे..

141Subhash Choure, संपादक अनिल वाघमारे and 139 others50 Comments66 SharesLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here