आता माथेरानला जायचं कोणासाठी?

संतोष गेला.. वर्ष झालं त्याला. .. आजही विश्वास ठेवणं कठीण होतंय की, संतोष आपल्यामध्ये नाही.. मात्र वास्तव तेच आहे.. या वर्षभरात असे अनेक प़संग आले, जेव्हा संतोषची प्रकर्षाने आठवण झाली आणि उणिवही भासली.. पालघरचा मेळावा असू देत किंवा अलिबागचा पुरस्कार वितरण सोहळा.. संतोष हवा होता असं हटकून वाटत राहिलं.. संतोष मराठी पत्रकार परिषदेचा सरचिटणीस होता, राज्य अधिस्वीकृती समितीचा सदस्य होता, रायगड प्रेस क्लबचा संस्थापक अध्यक्ष होता पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे तो माझा “फॅमिली फ्रेंड” होता.. जवळपास २५ वर्षे आमची ही मैत्री होती.. आमच्या वयात अंतर होतं पण त्याचा कधी अडसर आम्हाला जाणवला नाही.. माझ्याबद्दल संतोषच्या मनात प्रचंड आदरभाव होता.. मी भेटलो की तो वाकून नमस्कार करायचा.. मला हे आवडायचं नाही.. अनेकदा मी त्याला तसं सांगितलं पण शेवटपर्यंत त्यानं आपला शिरस्ता कधी सोडला नाही.. एक नेमस्त स्वभावाचा, आपल्या भूमिकेवर ठाम असणारा पण त्यावरून वाद न घालणारा, सर्वांबद्दल कमालीचा आदरभाव जोपासणारा माझा हा मित्र होता.. समोर किंवा अपरोक्ष कोणाबद्दल कधी वाईट बोलताना, कधी कोणाचा द्वेष करताना मी संतोषला पाहिलं नाही.. सर्वांशी गोड बोलणारा आणि प्रत्येकाला लोहचुंबकासारखे आपल्याकडे खेचून घेणारा संतोष म्हणूनच एक चांगला संघटक होता.. रायगडमध्ये पत्रकारांचे जे मजबूत संघटन उभे राहिले त्याचं श्रेय संतोष पवार आणि मिलिंद अष्टीवकर यांच्याकडं जातं.. मी निमित्तमात्र होतो..संतोषनं उत्तर रायगडची धुरा सांभाळली, मिलिंदकडं दक्षिण रायगडचा सुभा होता.. कुंटुंबासारखं संघटनेचं काम चालायचं.. मी संतोषला कुटुंब प्रमुख म्हणायचो.. कारण घर चालवताना कुटुंब प्रमुखाला ज्या यातना सहन कराव्या लागतात, राग – लोभ स्वीकारावे लागतात आणि प़संगी तिरसकाराचे धनी देखील व्हावे लागते.. ते सर्व संतोष सहन करीत होता.. कधी त्यानं माझ्याकडं कोणाची तक़ार केली नाही किंवा कागाळी केली नाही.. उलट माझ्या तापट स्वभावाप्रमाणे मी कोणावर भडकलो तर संतोष मला शांत करायचा.. या सारया आठवणींनी आज मन उचंबळून येतं..
मला आठवतंय 1995 – 96 चा तो काळ होता.. सकाळमध्ये संतोषच्या माथेरानच्या बायलाईन बातम्या मी वाचायचो.. रोज वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण बातमी असायची.. मला सारखं वाटायचं या पोरानं आपल्यासाठी, आपल्याबरोबर काम करावं.. मी एक दिवस संतोषला फोन केला.. कृषीवलसाठी काम करण्याची विनंती केली.. त्यानं ती सविनय नाकारली.. “पण मी तुम्हाला माणूस देतो” असं सांगून तो आपल्या शब्दाला जागला देखील.. पण मी समाधानी नव्हतो.. संतोषसाठी माझा प़यत्न सुरूच होता.. अखेर संतोष एक दिवस माझ्या, “गळाला” लागला.. तेव्हापासून तो माझ्या परिवाराचा घटक झाला.. माथेरान हे मुलतःच सुंदर.. पण माथेरानच्या सौंदर्याच्या विविध छटा बाहेरच्या जगाला माहिती नव्हत्या.. अगोदर संतोषच्या लेखणीनं आणि नंतर अन्य सर्व पत्रकारांनी माथेरानला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं.. माथेरानचा निसर्ग, माथेरानची राणी, यावर तर संतोषचं लक्ष असायचंच पण माथेरानची फुलं आणि माथेरानच्या गवताबददलही संतोष अनेक नितांत सुंदर बातम्या द्यायचा .. बातमीचा वास यावा लागतो असं म्हणतात.. संतोषला तो यायचा.. माथेरानवर नितांत आणि मनस्वी प़ेम करणारा हा पत्रकार होता.. आम्ही नेहमी मुंबईला एकत्र असायचो.. कुणा अधिकारयाकडं गेलो की, संतोषचं “माथेरान पुराण” सुरू व्हायचं.. अनेकदा मी कंटाळायचो पण संतोष माथेरान बद्दल भरभरून बोलत राहायचा. .. निरोप घेताना न विसरता “या माथेरानला” असं आग्रहाचं आवतण द्यायचा.. कोणी खरंच माथेरानला आलं तर त्याचा छान पाहुणचार व्हायचा.. आपलं गाव कोणाला प़िय नसतं? पण आपल्या गावावर संतोष एवढं क्वचितच कुणाचं प़ेम असेल.. इको सेन्सेटीव्ह झोन लावला गेला तेव्हा संतोष पेटून उठला.. अजय सावंत यांनी विवेक चौधरी या आणि अनेक मित्रांना बरोबर घेऊन संतोषनं लढा उभारला.. माथेरानच्या विकासाला टाळे लावणारा तो निर्णय होता असं संतोषचं मत होतं.. .. सारा विषय मलाही समजावून सांगितला आणि पटवूनही दिला.. मी ही मग माथेरानच्या लढयात लेखणी घेऊन उतरलो.. वृत्तपत्रातून आणि अनेकदा टीव्हीवरील महाचर्चातून आम्ही माथेरानची बाजू मांडत राहिलो.. संतोषनं मला अनेकदा माथेरानला नेलं.. विषय समजावून दिले . माथेरान गाव छोटं असलं तरी तेथील प़श्नाचं स्वरूप आभाळा एवढं आहे.. दस्तुरी नाकयापासून सुरू होणारे प्रश्न परत येईपर्यंत पाठपुरावा करीत राहतात.. घोडयावाल्याचे प़श्न, हातगाडी वालयाचे प़श्न.. रस्त्याचे प्रश्न, आणि पर्यटकांची आवडती माथेरानच्या राणीचे प्रश्न.. प्रश्नच प्रश्न.. संतोष मुळं मी या सर्व समस्यांशी जवळून परिचित आहे.. माथेरानचा नितांत सुंदर निसर्ग तर कायम मला मोहित करीत राहिला त्याचबरोबर माथेरान करांची जिद्द प्रश्नांना ़भिडणयाची वृत्ती आणि विषयांचा अथक पाठपुरावा या माथेरान करांच्या गुणवैशिष्ट्यामुळे माथेरान बद्दल मला नेहमी कुतूहल वाटत आलेले आहे.. एक समस्या निवारण होते.. तोवर दुसरा प्रश्न समोर येतो.. हे चक़ वर्षानुवर्षे सुरू आहे.. आणि माथेरानची प़त्येक पिढी या प्ंशनांचा पाठपुरावा करीत आलेली आहे.. माथेरान आणि महाबळेश्वर ही दोन थंड हवेची ठिकाणं.. मात्र सत्तेनं नेहमीच माथेरान वर अन्याय केला आहे महाबळेश्वरला कायम झुकते माप मिळत गेले.. त्यामुळे महाबळेश्वर चौफेर विकसित झालं.. माथेरानमधील प़श्नांचा गुंता संपता संपत नाही.. संतोषला याची कायम खंत असायची.. माथेरानचे पत्रकार प्रश्न जगाच्या वेशीवर टांगले गेले पाहिजेत असं संतोषला वाटायचं.. त्यामुळं संपादकांनी, पत्रकारांनी, वरिष्ठ अधिकरयांनी माथेरानला यावं, येथील प्रश्न समजून घ्यावेत.. ते लोकांपुढे आणि सरकारसमोर यावेत असं संतोषला वाटायचं.. त्यासाठी तो कायम धडपडत राहिला.. पण बरयाचदा संपादक यायचे, संतोष चा पाहुणचार घ्यायचे मात्र माथेरानच्या पंशनाबददल दोन ओळी देखील कुणी लिहायचे नाही.. संतोष अस्वस्थ व्हायचा.. इंग्रजी वर्तमानपत्रातून कायम माथेरान विरोधी सूर व्यक्त व्हायचा..या बातम्या वाचून संतोष सैरभैर व्हायचा, मला फोन करायचा, “साहेब बघितलं कशी बातमी आलीय ते” .. असं सांगून आपली नाराजी ही सौम्य शब्दात व्यक्त करायचा.. मग मला त्याची समजूत घालावी लागायची.. असं अनेकदा घडायचं…
जीवनावर मनस्वी पे़म करणारा हा अवलिया पत्रकार होता.. अनेकदा संतोष या जगण्यावर या जीवनावर शतदा प्रेम करावे हे गाणं गुणगुणत असायचा.. संतोषच्या चेहरयावर कधी तणाव आहे असं मला कधी दिसलं नाही.. कायम प्रसन्न आणि हसतमुख असं संतोषचं व्यक्तीमत्व होतं.. स्वच्छ आणि टापटीप राहणं त्याला आवडायचं..रंगी बेरंगी कपड्याची संतोषला विशेष आवड होती. .. गोरयापाण चेहरयावर विविधरंगी कपडे उठून दिसायचे.. “मी संतोषला अनेकदा म्हणायचो,मला ही तुझ्यासारखे कपडे हवे आहेत.. कपडे खरेदी करताना मला बरोबर घेऊन चल.. तुझी कपड्यांची चॉईस चांगली आहे” मग नागपूर अधिवेशन असेल किंवा अधिस्वीकृती समितीची बैठक असेल तेव्हा आम्ही एकत्र असायचो आणि मग मनसोक्त कपडे खरेदी देखील व्हायची ..
आयुष्यभर अनेकांच्या मदतीला धावून जाणारा संतोष स्वतः मात्र कोणाला काडीचा त्रास ही न देता निघून गेला.. त्याच्या मदतीसाठी धावून जावं अशी संधीच त्यानं कोणाला दिली नाही.. म्हणूनच सुरेश लाड साहेबांचा मला फोन आला आणि ते म्हणाले, “आम्ही आपल्या मित्राला वाचवू शकलो नाही” सगळ्यांना गाफील ठेऊन हा पठ्ठ्या असा अचानक निघून गेला.. सगळ्यांना शोकसागरात बुडवून.. संतोषच्या निधनाची बातमी एवढी अनपेक्षित आणि धक्कादायक होती की त्यातून सावरायला मला आणि माझ्या सारख्या संतोषच्या अनेक मित्रांना वेळ लागला.. संतोषचा मित्र परिवार महाराष्ट्रभर विखुरला होता.. त्यामुळं संतोषच्या निधनानं सारा महाराष्ट्र हळहळला…. तालुकया तालुक्यात संतोष साठी शोकसभा झाल्या.. संतोषच्या जाण्यानं माझं व्यक्तीगत मोठं नुकसान झालं.. हक्काचा माणूस आणि जवळचा मित्र मी गमविला.. संघटनेचं ही मोठं नुकसान झालं.. मराठी पत्रकार परिषदत संतोषच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून येणारी नाही.. संतोष गेल्यानंतर मला त्याच्या परिवारास भेटायला जायची देखील हिंमत झाली नाही. आई, वहिनी, मल्हार यांचं दु:ख आभाळाएवढं आहे.. त्यांचं सांत्वन करणे देखील माझ्यासाठी अशक्य होतं.. आहे.. कधी काळी कायम माथेरानचा म मुशाफिर असायचो.. कधी कार्यक्रमासाठी, कधी आंदोलनासाठी तर कधी कुटुंबाला घेऊन मी कायम माथेरानला जात राहिलो.. माथेरानला जाण्यासाठी मला फक्त निमित्त लागायचं.. मी येतोय म्हटल्यावर संतोष जातीनं घेडयांसह दस्तुरी नाक्यावर हजर असायचा.. मग एक रात्र मी माथेरान एन्जॉय करायचो.. पण हा झाला सारा इतिहास.. आज प्रश्न पडतो, माथेरानला जायचं कोणासाठी? जिवाभावाचा सोबती संतोष तेथे नाही ना.. संतोष तुझी कायम आठवण येत राहिल रे मित्रा..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here