आता तरी अभिनंदन करा…

केजच्या पत्रकारांनी बांधला वनराई बंधारा

सकारात्मक आणि विधायक पत्रकारितेचा आविष्कार ग्रामीण भागात ही बघायला मिळतो.महाराष्ट्रातील 354 तालुक्यात पसरलेल्या  पत्रकार संघांच्यावतीने स्थानिक पातळीवर विविध  सामाजिक प्रकल्प राबविले जातात पण अशा   उपक्रमांना मोठ्या शहरातील वर्तमानपत्रातून   प्रसिध्दी मिळत नसल्यानं हे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत.त्यामुळं चांगली कामं करूनही हे पत्रकार उपेक्षित राहातात.त्यामुळंच मराठी पत्रकार परिषदेने वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाची दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍या पत्रकार संघांना यावर्षी पासून आदर्श पत्रकार संघ म्हणून पुरस्कार देण्याची योजना सुरू केली आहे.

बीड जिल्हयातील केज तालुका हा डोंगरी प्रदेश.कायम दुष्काळी,विकासापासून कोसोमैल दूर ही केजची ओळख आहे.विविध समस्यांनी त्रस्त केजला पाण्याचा प्रश्‍न नेहमीच भेडसावतो.ही अडचण लक्षात घेऊनच केंज मधील आदर्श पत्रकार संघाच्यावतीने तालुक्यातील साळेगाव येथे स्थानिक तरूणांच्या मदतीने वनराई बंधारा बांधला आहे.दहा फूट खोल आणि दोनशे फूट लांबीचा हा वनराई बंधारा श्रमदानातून बांधला गेला आहे.आनंदाची गोष्ट अशी की,हा बंधारा पाण्यानं भरून वाहू लागला  आहे.या बंधार्‍याचे नुकतेच लोकार्पण कऱण्यात आले.यावेळी तालुक्यातील अधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्यनें उपस्थित होते.केज तालुका आदर्श पत्रकार संघाचे मनापासून अभिनंदन.

यावर्षी दुष्काळात मराठवाडयातील अनेक पत्रकार संघांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कामं केली होती.काहींनी आपल्या बोअरमधून पाणी पुरवठा करून लोकांची तहान भागविली . .धारूर तालुका पत्रकार संघाने तलावात साचलेला गाळ काढून मोठं काम केलं.माजलगावच्या पत्रकारांनी सिंदफणा नदी स्वच्छ करून ही नदी प्रवाहित केली.रायगड प्रेस क्लबही गेली अनेक वर्षे वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्यासाठी प्रयत्न करीत असते.तात्पर्य चांगले उपक्रम सुरू आहेत,ते लोकांपर्यत येत नाहीत आणि त्यामुळं पत्रकारांबद्दल एक नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो.हा दृष्टीकोन बदलावा यासाठी मराठी पत्रकार परिषद जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे.पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपावी हे अनेक मान्यवर पत्रकारांना मान्य नाही,सामाजिक बांधिलकी हे त्यांना जोखड वाटते पण सामाजिक बांधिलकी हा पत्रकारितेचा आत्मा आहे या जाणिवेतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पत्रकार काम करीत आहेत ही आनंदाची ,स्वागतार्ह गोष्ट आहे.

( मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here