आठवणीतील तात्या

0
1370
कल्याण कुलकर्णी, बीड
————————-
धारूर तालुक्यातील धुनकवाड एक डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले गाव. जवळपास २५०० लोकसंख्या असलेल्या गावामध्ये प्रभाकरराव कुलकर्णी उर्फ तात्या हे जुन्या पिढीतील नव्हे तर नवीन पिढीसोबत तितकेच रममाण होणारे व्यक्तिमत्व. माझा जन्म १९७२ ला झाला त्याआधीपासून ते धुनकवाडचे पोलीस पाटील व स्वस्त धान्य दुकानदार होते. त्यावेळी अगदी हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी आम्हाला मोेठे केले. बिकट परिस्थितीमध्ये असताना त्यांनी मित्रांकडून किंवा सावकाराकडून पैसे घेवून स्वस्त धान्य दुकानाचा संपूर्ण माल गावात आणून गोरगरिबांसाठी वाटायचे. मग कुणाकडे कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ असो. त्यांना संपूर्ण माल पैसे असो किंवा नसो पण माल द्यायचे. त्यामुळे तात्या हे दीनदुबळ्यांचे आणि गरिबाचे कैवारी म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. उंच शरीरयष्टी आणि अंगावर पांढरे शुभ्र धोतर सदरा आणि कडक टोपी असा रूबाबदार दिसणारा गडी म्हणून संपूर्ण डोंगरपट्ट्यात परिचित होते. मला चांगले आठवतेय की आमची खूप गरिबीची परिस्थिती असायची. शेती कोरडवाहू. खूप कमी पिकायची आणि दुसरे उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यात तात्याचे पुढारपण गावगाड्याचा खर्च ही परिस्थिती खूप वाईट असायची. त्यामुळे आमचे शिक्षण कधी पूर्ण झाले नाही. मोठा भाऊ संजय हा चुलत्याकडे शिकायचा आणि राम हा आजोबाकडे शिकायचा. त्यांनी आपल्या दोघांच्या पायावर शिक्षण घेतले. मी सुरूवातीपासून किराणा दुकान असायचे ते लहानपणीपासून चालवायचो आणि नंतर मग स्वस्त धान्य दुकान चालवायचो. त्यामुळे गरिबी काय असते हे आम्ही खूप जवळून पाहिले आहे. तात्याचा स्वभाव खूप प्रेमळ व मायाळू असायचा. ते घरी जेवताना एकटे कधीच जेवले नाहीत. त्यांच्यासोबत गावातील आठ-दहा जण जेवायला हमखास असायचे. माऊली काय असते ते आमच्या आईच्या रूपात आम्ही पाहिले. बिचारी कितीही वाजले तरी सर्वांचा स्वयंपाक अगदी तासाभरात करायची. कोणताही कंटाळा न करता. कोणताही पाहुणा गावात आला किंवा अनोळखी जरी माणूस आला तरी तो आमच्याकडे जेवायला असायचा. घरी जरी सामान नसले तरी आमची आई गुपचूप दुकानात जाऊन बाजरी किंवा ज्वारी विकायची व सामान आणून स्वयंपाक करायची. असे करता करता पुढे आम्ही मोठे झालो आणि आमच्या गावचे पुनर्वसन होऊन शेतीला पाणी मिळाले. मग आमची परिस्थिती सुधारत गेली. संजय हा पण प्राध्यापक झाला. रामभाऊ पुढे पत्रकार झाले आणि मी पण मा.गोपीनाथरावजी मुंडे यांच्यामुळे नौकरीस लागलो. परिस्थिती हळूहळू सुधारत होती. आमच्या गावाचे धुनकेश्‍वर हे ग्रामदैवत असल्या कारणाने त्यांची सेवा पण आई आणि तात्यांनी परिस्थितीनुसार खूप केली. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त त्यांच्या आशिर्वादामुळेच असे सांगितल्यावर तात्याचा रूबाब आणखी वाढला. ते अभिमानाने सांगायचे सर्वांना. आता माझे मुलं मोठे झालेत. मला काही कमी नाही तरी त्यांचा स्वाभिमान त्यांनी कोणाचीही मदत न घेता कायम ठेवला.  बसायला स्वत:साठी चार चाकी गाडी आणि शेतीची आवड असल्यामुळे त्यांना शेतामध्ये बैलाची खूप आवड असायची. पंचक्रोशीत कोणाकडे नाहीत अशी आपली बैलजोडी असावी म्हणून त्यांनी मोठे मोठे आजुबाजुच्या बाजारातून बैल खरेदी करायचे आणि माझीच बैलजोडी छान आहे असे दाखवून द्यायचे. पण हे सगळे असताना तात्या आपल्याच रूबाबात रहायचे आणि गावातील सगळी लहान थोर मंडळी त्यांची मर्जी आणि रूबाब कसा राखला जाईल याची काळजी घ्यायचे. गावात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो व वैयक्तिक कार्यक्रम असो तो तात्यांशिवाय पूर्ण होत नव्हता. म्हणून तात्या आमच्या वाट्याला खूप कमी आणि गावाच्या वाट्याला जास्त आले. त्यांना जणू आमची गरज नसून फक्त गावाची गरज आहे असे असायचे. त्यामुळे आम्ही पण सर्व जण कोणताही सण असो किंवा कधीही गावाकडे जास्त जायचो. गावातील लोकांना तात्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे ते कितीही रागावले तरी त्यांना राग आला नाही. ते म्हणायचे, तात्या फार प्रेमळ आहेत. त्यांच्या पोटात काही नसते. त्यामुळे तात्यांचा रूबाब अजूनच वाढायचा. गावातील लोकांवर एवढा दरारा म्हटल्यावर तर आम्ही मोठे झालो तरी आमची नजर उचलून बोलायची कधी किंवा तात्याकडे बघायची सुद्धा हिंमत झाली नाही. त्यामुळे शेवटपर्यंत रूबाब आणि दरारा तात्यांनी कायम ठेवला. तात्याला जात-पात- धर्म कधीच मान्य झाला नाही. त्यामुळे आमच्या गावातील लोकांना आम्ही ब्राह्मण आहोत असेही कधी वाटले नाही. सर्व आमच्या गावातील एका कुटुंबातील सदस्यासारखे आमचे नाते तात्यामुळे झाले ते आजही कायम ठेवले आहे. तात्यांना राजकारणाची फार आवड होती. ते मुळात कै.केशरकाकुंचे कट्टर कार्यकर्ते होते आणि शेवटपर्यंत त्यांनी कॉंग्रेस पक्षावर प्रेम केले. नंतर मग रामभाऊंमुळे गोपीनाथराव मुंडे हे घरचे सदस्य असल्यासारखे झाले. त्यामुळे त्यांना मुंडे साहेबांना खूप आदर असायचा. ते साहेबांना म्हणाले होते. साहेब, तुम्ही आमच्या गावात हेलिकॉप्टरने आलेले मला पहायचेय. त्यानंतर मुंडे साहेब सत्तेत आल्यानंतर त्यांनी कोठताही मोठा कार्यक्रम नसताना उपमुख्यमंत्री म्हणून धुनकवाड या गावात हेलिकॉप्टरने येत तात्याचे आणि आईचे दर्शन घेतले. असे सर्वांचे लाडके तात्या मला आठवतंय की मी गेल्या जानेवारीमध्ये दुबईत जाण्याचा बेत आखला. त्यावेळी आई व तात्या माझ्या घरी बीडला पहिल्यांदा आठ दिवस मुलांजवळ म्हणून रहायला आले आणि आम्ही दुबईवरून परत आलो की लगेच ते गावाकडे निघाले. एवढे गावावर त्यांचे प्रेम होते. त्यानंतर दोन दिवसांनी तात्या दुखायले म्हणून अंबाजोगाईला गेले आणि आजारी पडले. एवढा पहाडासारखा गडी अंथरूणावर पहिल्यांदाच पडल्याचे पाहून आम्ही सर्व जण व्यथीत झालो होतो. परंतु विलाज नव्हता. लातूरच्या डॉक्टरांनी सांगितले की, परिस्थिती खूप वाईट आहे. लिव्हर, किडणीवर सूज आली आहे. त्यामुळे हताश झालोत. कोणताही विलाज नव्हता. तरी आम्हाला सेकंड ओपिनियन घेण्याचा सल्ला आमच्या बीडच्या डॉक्टरांनी दिला म्हणून मी तात्यांना घेवून औरंगाबादला धूत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे पण डॉक्टरांनी पुन्हा सर्व तपासण्या केल्या आणि काहीच उपाय नाही म्हणून सांगितले आणि आम्ही पुन्हा अंबाजोगाईला आलो. परत दोन दिवसांनी परिस्थिती बिकट झाली. त्यांचे कोणतेही अवयव काम करीत नसतानासुद्धा ते मनाने मानत नव्हते की मी आजारी आहे म्हणून. तेच आम्हाला म्हणायचे मला काहीही झालेले नाही. मला गावाकडे घेवून चला म्हणून हट्ट धरायचे. त्यांच्या हट्टापायी तसे असताना आम्हाला त्यांना गावाकडे एक दिवस घेवून जावे लागले आणि आम्ही मग त्यांना धुनकेश्‍वराच्या दर्शनासाठी घेवून गेलो. नंतर शेतात जावून त्यांनी गाडीजवळ आपली आवडती बैलजोडी आणून बघितली आणि गड्याला म्हणाले, ‘बैलाकडे लक्ष दे, बैल खराब होऊ देऊ नको’ आणि नंतर ते गावात जाऊन गावातील सगळ्या लोकांना शेवटचे भेटले. तरी ते आम्हाला म्हणायचे, मला गावात राहु द्या आमचे ते ऐकत नव्हते म्हणून आम्ही त्यांचे मित्र गोरख यादव, सच्चिदानंद यादव, सुभाष काका यांना समजावून सांगायला लावले आणि ते सर्व जण सोबत घेवून आम्ही अंबाजोगाईला गेलो. मला तात्याची परिस्थिती सगळी कळाली होती की यातून त्यांची सुटका नाही म्हणून मी कुटुंबात सगळ्यांना सांगत होतो आणि सर्वांची मानसिकता करत होतो पण कुणीच मानायला तयार नव्हते की यातून तात्या बरे हाेणार नाहीत म्हणून. पण परत तब्येत बिघडली आणि परत लातूरला नेऊन ऍडमिट केले. पण तात्या काही केल्याने प्रकृती दणकट असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये रहायला तयार होत नव्हते. मला काही झाले नाही, घरी घेवून चला असे म्हणायचे. त्या दरम्यान महाशिवरात्र आली. दरवर्षी आमचा गावातील धुनकेश्‍वराला महाअभिषेक असतो. त्यासाठी मला घेवून चला असे म्हणून त्यांनी हट्ट धरला. तरी पण आम्हाला डॉक्टरने सांगितले की केव्हाही काही होऊ शकते म्हणून तुम्ही यांना गावाकडे घेवून जाऊ नका. मी तात्याजवळ थांबलो आणि सर्वांना अभिषेक करण्यासाठी पाठविले. त्यावेळी त्या रात्री त्यांनी रात्रभर विचारणा केली. अभिषेक होतोय का?, ब्राह्मण आले का?, गावातील लोक जेवले का? याकडे त्यांचे लक्ष लागले होते. डॉक्टर आले की, त्यांना पण ते म्हणायचे की माझा अभिषेक आहे. गावातील सगळे लोक जेवले आहेत तुम्ही पण या आमच्या नंतर. नंतर तात्या त्यांच्या उभ्या हयातीमध्ये पहिल्यांदाच शिवरात्रीला गावात हजर नव्हते. त्यामुळे गावातील सगळी मंडळी दुसर्‍या दिवशी लातूरला आले तरी तात्या त्यांना म्हणायचे की, अभिषेक कसा झाला एवढी श्रद्धा धुनकेश्‍वर आणि गावातील मंडळींवर होती. एवढा मोठा धष्टपुष्ट माणूस हॉस्पिटलमध्ये पडून पाहून गावातील सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ढसाढसा रडत होते. तो आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ. आम्हाला दु:ख काय असते ते त्यावेळेस जाणवले. नंतर दोन दिवसांनी लातूरहून डॉक्टरांनी सांगितले की, आता काही उपयोग नाही, आम्ही काही करू शकत नाहीत आणि यापुढे तुमचे नशीब म्हणून घेऊन जा म्हणून आम्ही तात्यांना घेवून अंबाजोगाईला आलो. तरी सुद्धा तात्या मात्र डगमगत नव्हते. त्यामुळे सर्वांना वाटायचे की, तात्या बरे होणार आणि मी एकटा मात्र सर्वांना किती समजावीत होतो. मात्र चार-पाच दिवसात तात्यांची तब्येत अधिकच खालावली आणि आम्ही अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले आणि तात्यांची शुद्ध हरपली. ढाण्या वाघासारखे असणारे तात्या कोसळले ते परत शुद्धीवर आलेच नाहीत. त्या दरम्यान मात्र आमच्यावर प्रेम करणारे सर्व लोक तात्यांना भेटून गेले. अशा बेशुद्ध अवस्थेत तात्या पाच दिवस होते. फक्त या पाच दिवसात त्यांनी कोणाला बोलले पण नाही आणि मृत्युशी कडवी झुंज दिली. मला मात्र आमचे बरेच मित्र डॉक्टर असल्यामुळे मला काही थोडेफार कळत होते. आणि अखेर दि.२३/०३/२०१७ रोजी संध्याकाळी तात्या आम्हा सर्वांना सोडून गेले ते कायमचेच.
आज तात्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. तात्यांच्या आठवणी आजही डोळ्यासमोरून जायला तयार नाहीत. आमच्यासह सर्वांच्या आठवणीतील तात्यांना कुलकर्णी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here