असा जातो माझा दिवस..

“घाबरू नका, पण सावध राहा” हे शब्द दिवसभरातून किती तरी वेळा कानावर पडत असले तरी मनावर असलेलं भितीचं सावट कमी होत नाही.. स्वतःच्या काळजी बरोबरच दूरवर असलेल्या आपल्या प्रियजनांच्या काळजीनंही मन सैरभैर होतं हे वास्तव आहे.. दिवसभर टीव्हीवरच्या बातम्या एेकून तर आणखीनच अस्वस्थ होत राहतं.. बरं दिवस रात्र घरातच थांबावं लागत असल्यानं करायचं तरी काय हा प्रश्नही असतो..
माझ्यापुरता मी यावर तोडगा काढला आहे.. माझा मित्र परिवार महाराष्ट्र भर पसरलेला आहे.. त्यातले बहुसंख्य पत्रकारच आहेत.. हे सारे जवळचे मित्र असले तरी त्यांच्याशी कधी फारसा थेट संवाद होत नाही.. घरी आहे, कामही नाही ही संधी घेत मी दररोज किमान 25 मित्रांना फोन करून त्यांची खयाली खुशाली विचारतो.. SM चा फोन आला म्हणून मित्राना आनंद होतो आणि आपल्याला फार दिवसांनी मित्राबरोबर बोलता आलं याचं मलाही समाधान लाभत…पत्रकार चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी ही “संवाद यात्रा” महत्वाची भूमिका बजाऊ शकते असा मला विश्वास आहे.. माझा दिवस आनंदात जातो..
सध्या गावाकडं असल्यानं सकाळ संध्याकाळ शेतात असतो.. शेतात उन्हाळी कामं सुरू आहेत.. मात्र आज शेतातलं बाजरीचं पीक पाहून दिवस आनंदात गेला.. हिरवीगार बाजरी आणि लांबसडक कणसं पाहत बाजरीच्या भोवती किती तरी वेळ भटकत राहिलो.. रखरखतं आणि 40 डिग्री सेल्सिअसचया पुढंचं उन्हात हिरवीगार डोलणारी बाजरी.. विचार करा किती बरं वाटलं असेल.. मजा आली आज..दोन वर्षांपूर्वी शेतात नारळाची व इतर 100 झाडं लावली आहेत.. त्यांना पाणी देण्याचं काम मीच करतोय.. खत घालणं, गवत काढणं ही कामं करताना सारा कोरोना वगैरेचा खरंच विसर पडतो.. काम केल्याचं समाधान आणि आनंदही मिळतो.. शिवाय जेवणही मस्त जातं.. आईच्या हातचं जेवण असल्यानं पोटात चार घास जास्तच जातात..
पत्रकार असलो तरी मी आता बातम्या पाहणं जवळपास सोडून दिलंय.. “कोरोनाचा आकडा वाढतो आहे, आणि सरकार आपल्यापरीने कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करते आहे” .. या दोनच बातम्या कितीवेळा आणि किती दिवस पहायच्या? मी दिवसा एक आणि रात्री दोन मस्त टीव्हीवर चित्रपट पहात बसतो.. आयुष्यभर दगदग आणि धावपळीमुळे सिनेमा, नाटकं पाहताच आली नाहीत.. त्याचा बॅकलॉग सध्या भरून काढतोय.स्वामी समर्थ आणि देवपावला या दोन मालिका आई न विसरता पाहते.. घरात एकच टीव्ही असल्यानं या मालिका मलाही पहाव्या लागतात.. धार्मिक मालिका लोक का पाहतात हे या मालिकांमुळे उमजायला लागलंय..
गावात असलो तरी चळवळीचं काम सुरूच आहे. परिषदेचे पदाधिकारी रोज संपर्कात असतात.. कुठं रक्तदान शिबिराचे नियोजन कर, कुठं पत्रकारांच्या मदतीसाठी घरी बसून नियोजन कर, हे सुरूच आहे.. त्यातही वेळ चांगला जातो..
पत्रकार चळवळीसाठी दर महिन्याला किमान दोन अडीच हजार किलो मिटर प़वास होतो.. गेला महिना घरातच असल्यानं कोंडलयासारखं झालंय हे खरंच.. त्यामुळं कधी एकदा या कोरोनाला हद्दपार करण्यात आपल्याला यश येतंय असं झालंय.. अर्थात त्यासाठी सरकारी सूचनांचे प्रत्येकानं पालन केलंच पाहिजे.. मी करतो आपण ही करा.. एवढीच विनंती..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here