अलीकडच्या काळात पत्रकारितेतील सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन कमी होत असून, व्यापारी दृष्टिकोन वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे धोरण संबंधित मालकाचे असते की, बातमीदार, संपादक वर्गाचे असते ते माहीत नाही. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सनसनाटी निर्माण करण्याची स्पर्धाच सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना कानपिचक्या दिल्या.
दोन दिवसांपूर्वी हजारे यांच्या प्रतिक्रियेवर आधारित राजकीय बातम्या काही प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचे खंडन करताना हजारे यांनी ब्लॉगवर एकूणच माध्यमविश्वाला उद्देशून मते व्यक्त केली आहेत. ‘लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारितेत जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. मात्र यातील काही लोकांना या क्षेत्राच्या मूळ तत्त्वांचा विसर पडलेला दिसतो. सनसनाटी बातम्यांच्या नादात काही वेळा अनेक गोष्टींचा विपर्यास केला जातो. दोन दिवसांपूर्वी काही राजकीय नेत्यांच्या पक्षांतराबद्दल काही पत्रकारांनी आपल्याला प्रश्न विचारले. आपण टाळत असूनही पुन्हा पुन्हा संबंधितांची नावे घेऊन प्रश्न विचारले गेले. तरीही आपण त्यांची नावे टाळून एकूण सर्वच राजकीय पक्ष, पक्षांतरे आणि आणि लोकशाही यासंबंधी मत व्यक्त केले. असे असूनही आपल्या विधानांचा संबंध या नेत्यांची नावे घेऊन जोडला गेला. हजारे भाजपवर नाराज असल्याच्या बातम्याही आल्या. प्रत्यक्षात आपण कोणत्याच पक्षाचे नावही घेतले नाही,’ असे अण्णांनी स्पष्ट केले.
(मटावरून साभार )