अक्कलकोट मेळाव्याची तयारी पूर्ण

0
1183

माहिती महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

मराठी पत्रकार परिषदेच्या अक्कलकोट मेळाव्याची तयारी पूर्ण

मेळाव्यास मोठया संख्यनें उपस्थित राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन 

मुंबई दिनांक 2 (प्रतिनिधी)  परिषदेचे माजी अध्यक्ष पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा  आणि राज्यातील परिषदेशी संलग्न 354 तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांचा भव्य मेळावा शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट येथे संपन्न होत आहे.या मेळाव्याचे उद्दघाटन माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक,गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते होत असून परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन होईल मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक हे असतील..अशी माहिती परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनी  दिली आहे.

ग्रामीण भागात तालुका पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघ संघटनात्मक कार्याबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत समाजहिताचे अनेकविध उपक्रम राबवत असतात.त्यांच्या कार्याची नोंद राज्यपातळीवर घेणे आवश्यक होते.त्यामुळे परिषदेच्यावतीने पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या नावाने उल्लेखनिय कार्य करणार्‍या जिल्हा संघांना तसेच परिषदेचे माजी अध्यक्ष रोहिणीकार वसंत काणे याच्या नावाने तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देण्यास सुरवात केली आहे . .पुरस्कारांचे हे पाचवे वर्षे आहे.आतापर्यंत उल्लेखनिय कार्य करणार्‍या 36 तालुका संघांना आणि पाच जिल्हा संघांना सन्मानित करण्यात आले आहे.

यावर्षीचा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार  सांगली जिल्हयाला देण्यात येत आहे.पश्‍चिम महाराष्ट्रात महापूर आला तेव्हा जिवाची पर्वा न करता सांगली जिल्हा पत्रकार संघाच्या अनेक सदस्यांनी लोकांना मदत केली.तसेच परिषदेच्या सर्वच आंदोलनात हिरीरिने सहभाग नोंदवत पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठीच्या लढयात मोठे योगदान दिले.त्यांच्या या कार्याबद्दल निवड समितीने त्यांची निवड केली आहे.

आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारासाठी यावेळी कोकण विभागातून रायगड जिल्हयातील पेण,कोल्हापूर विभागातून चंदगड,पुणे विभागातून भोर,नाशिक विभागातून येवला,लातूर विभागातून कंधार,औरंगाबाद विभागातून अंबड,अमरावती विभागातून शेगाव आणि नागपूर विभागातून कुही तालुक्याची निवड करण्यात आली आहे.या सर्व पुरस्कार प्राप्त संघांना शाल,श्रीफळ,मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित कऱण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा आणि मेळाव्याचे उद्घाटन माहिती महासंचालक श्री.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्यांचे मौलिक मार्गदर्शन यावेळी पत्रकारांना लाभणार आहे.एस.एम.देशमुख यांचे प्रमुख भाषण होणार असून परिषदेच्या पुढील कार्याची दिशा ते स्पष्ट करतील.अशी माहिती परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे.मेळाव्यास राज्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे सरचिटणीस संजीव जोशी विभागीय सचिव बापुसाहेब गोरे,सोलापूर जिल्हा पत्रकार संघ आणि अक्कलकोट तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे. .मेळाव्यास येणार्‍या पत्रकारांना प्रत्येकी 150 रूपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.त्यामध्ये राहण्याची,भोजणाची व्यवस्था केली जाईल.7 तारखेला जे पत्रकार पोहोचणार आहेत त्यांनी 9422651516 या क्रमांकावर फोन करून सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस पी.पी.कुलकर्णी यांना कल्पना द्यावी.राज्यातील बहुतेक तालुक्यातून अक्कलकोटसाठी थेट बसेस आहेत.जे पत्रकार रेल्वेने येतील त्यांना सोलापूर स्टेशनवर उतरून बस स्थानकात जावे लागेल.तेथून प्रत्येकी 15 मिनिटांना अक्कलकोटसाठी बसेस आहेत.सोलापूर ते अक्कलकोट अंतर साधारणतः 40 किलो मिटर आहे.राहण्याची व्यवस्था श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदीर समितीच्यावतीने करण्यात आली आहे.तसेच समितीच्या पॉलिटेक्नीक कॉलेजच्या भव्य हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न होत आहे.किरण नाईक,शरद पाबळे आणि बापुसाहेब गोरे यांनी नुकतीच अक्कलकोटला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली.अक्कलकोट तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकर्‍यांशी देखील त्यांनी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here